लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त पथक प्रमुखांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर, दि. 27 ( वृत्तसेवा ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यात विविध पथके स्थापन करण्यात आली आहे. या पथकांच्या प्रमुखांनी सजग राहून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक पथक प्रमुखांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांची यावेळी उपस्थिती होती.
निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक पथकाची जबाबदारी अतिशय महत्वाची आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व पथक प्रमुखांनी आपापली जबाबदारी समजून घेवून ती काळजीपूर्वक पार पाडावी. निवडणूक विषयक कामाला प्राधान्य देवून आपल्या पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा योग्य समन्वय ठेवून काम करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घ्यावी. आतापासूनच आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी सर्व पथक प्रमुख अधिकारी यांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत माहिती दिली. तसेच प्रत्येक पथक प्रमुख अधिकारी यांनी आपल्याला आवश्यक मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून निवडणूक कामकाजात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.
