निलंगा/प्रतिनिधी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प येथे सौरऊर्जा प्रकल्प उभा करुन निलंगा शहर पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर कार्यन्वीत करावी अशी मागणी करुन या करिता 70 लाख रुपयाच्या निधीस मंजूरी मिळावी यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्र व्यवहार केलेला होता.
या मागणी नुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी 70 लाख 13 हजार 500 रु मंजूर करण्यात आलेले आहेत. सदर प्रकल्प उभारल्याने निलंगा नगर पालिकेला विद्यूत देयकावर होणारा लाखो रुपयांच्या खर्चाची बचत होऊन निलंगा शहर पाणीपुरवठा आत्मनिर्भर होण्यास मोठी मदत होणार आहे.
निलंगा नगर पालिकेच्यावतीने निलंगा शहरास 24 तास पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरासाठी औसा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाणी शुध्दीकरण यंत्रणा किल्लारी येथे आहे. शहरास पाणी शुध्द करुन पाणीपुरवठा करण्यासाठी विद्यूत देयकावर दरमहा लाखो रुपयांचा खर्च होत आहे. तसेच विद्यूत देयक भरण्यास विलंब झाल्यास महावितरण कडून विद्यूत जोडणी खंडीत करण्याचा प्रकार सात्तयाने होतो. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हि बाब लक्षात घेऊनच माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहर पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारला जावा आणि या करीता निधीची तरतुद करण्यात यावी अशी मागणी करुन यासाठी पत्रव्यवहार केलेला होता.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेली मागणी आणि त्यासाठी केलेला पाठपूरावा यामुळे निलंगा शहर पाणीपुरवठा योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी जिल्हा वार्षीक नियोजन समितीतून 70 लक्ष 13 हजार 500 रु मंजूर करण्यात आलेले आहेत. सदर निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन व माजी मंत्री आ. निलंगेकर यांचे निलंगा शहरातील नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. या सौरऊर्जा प्रकल्प उभारणीमुळे निलंगा नगर पालिकेचे पाणीपुरवठा योजनेसाठी विद्यूत देयकावर होणारा लाखो रुपयांच्या खर्चाची बचत होऊन पाणीपुरवठा योजना उर्जेसाठी आत्मनिर्भर होण्यास मोठी मदत होणार आहे.