“एकविसाव्या शतकातील शहर” अशी सार्थ ओळख असणारे नवी मुंबई शहर, सातत्याने देशातील तिसरे सर्वात स्वच्छ , सुंदर शहर म्हणून भारत सरकारचा पुरस्कार मिळवीत आहे.या शहरात अनेकानेक भूषणावह संस्था,उपक्रम आणि व्यक्ती आहेत.
आज ओळख करून घेऊ या मराठी साहित्य,संस्कृती व कला मंडळ या संस्थेची. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री सुभाष कुळकर्णी यांची प्रत्यक्ष मुलाखत आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेली माहिती या आधारे हा लेख लिहिला आहे.त्यामुळे प्रारंभीच श्री सुभाष कुळकर्णी यांचे मनःपुर्वक आभार मानून मंडळाची वाटचाल पुढे देत आहे.
नवनिर्माणाधीन नवी मुंबईत मराठी अस्मिता जोपासण्याच्या विचाराने प्रेरित झालेल्या ८ तरुणांनी एकत्र येऊन
८ फेब्रुवारी, १९७९ रोजी
“मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ” नावाच्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची स्थापना केली. वार्षिक ₹ १२/- वर्गणी घेऊन सभासद नोंदणी सुरू झाली. पहिल्या सहा महिन्यांत २०० सभासद झाले. सर्व सभासद एकत्र येऊन त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी म्हणून व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे ठरले. परंतु, त्यासाठी जागेचा मोठा प्रश्न उभा राहिला. वाशी सेक्टर १ येथील शाळेचे प्राचार्य श्री. प्रधान यांनी जागेचा प्रश्न एका झटक्यात सोडविला. शाळेचे सभागृह अशा कार्यक्रमांसाठी विनाशुल्क वापरावयास देण्याचे त्यांनी मान्य केले.
त्या वेळी महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक संचालक होते,
श्री. विश्वास मेहेंदळे. त्यांच्या भेटीगाठी घेऊन मार्गदर्शनाचा लाभ घेतला. पहिला कार्यक्रम होता ‘वसंत व्याख्यानमाले’चा. स्वत: विश्वास मेहेंदळे यांचे मराठी संस्कृतीविषयी व्याख्यान, सुहासिनी मुळगावकर यांचा सांगीतिक प्रवास, बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण, वि.आ. बुवा यांचे कथाकथन अशा प्रकारे वसंत व्याख्यानमालेमुळे वाशी परिसरात मंडळाची प्रसिद्धी झाली आणि सभासदसंख्या वाढू लागली. सभासदांची कौटुंबिक सहल, स्पर्धा, वार्षिक संमेलन असे कार्यक्रम होतच होते.
असे उभे राहिले सभागृह
स्वतःच्या प्रशस्त जागेची गरज ओळखून मंडळाने
सिडकोकडून १९८२ साली सेक्टर ६, वाशी येथे १,०८२ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड विकत घेण्याचे ठरवले. या भूखंडाची किंमत साठ हजार रुपये होती. मंडळाकडे फक्त पंचवीस हजार रुपये होते.त्यामुळे कार्यकारी मंडळातील प्रत्येक सभासदाने पदरचे १-२ हजार रुपये देऊन प्रथम भूखंड ताब्यात घेतला. सिडकोच्या अटींअनुसार तीन वर्षांत इमारत बांधणे बंधनकारक होते. देणगीरूपाने पैसे जमविणे त्या काळी कठीण होते. कारण, येथे राहावयास आलेले नागरिक घरासाठी काढलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते.
सांस्कृतिक संचालक
श्री. विश्वास मेहेंदळे यांना भेटून मंडळाच्या आर्थिक समस्येविषयी माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की, “भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे नोंदणीकृत संस्थांना बांधकामासाठी मदत मिळते, त्यासाठी अर्ज करा.” त्यांच्या मार्गदर्शनानुसार अर्ज केला आणि महिन्याभरात पन्नास हजार रुपये, चार हप्त्यांत मिळतील असे कळले. मात्र, त्यासाठी अशी अट होती, की आम्ही केलेल्या कामाची बिले सादर केल्यानंतर आणि झालेल्या कामाचा तपशील त्यांना कळविल्यानंतर पैसे मिळणार होते.
ही होती ‘मॅचिंग ग्रॅंट’, याचा अर्थ मंडळाकडे पन्नास हजार रुपये असणे आवश्यक होते.
मात्र शिल्लक होते फक्त बावीस हजार रुपये. अचानक एक शक्कल सुचली. आपल्या सभासदांकडून कमीतकमी एक हजार रुपये किंवा अधिक रक्कम तीन वर्षे मुदतीकरिता बिनव्याजी ठेवीच्या स्वरूपात मागावी आणि ‘रंगभवन’ किंवा दादरच्या ‘अमर हिंद मंडळा’प्रमाणे ‘ओपन एअर थिएटर’ बांधावे, म्हणजे कार्यक्रम करता येतील. इतर समारंभाला भाड्याने देऊन येणाऱ्या उत्पन्नातून बिनव्याजी ठेवीच्या रूपात जमविलेले पैसे परत करता येतील. झाले, सर्व सभासदांना कळविण्यात आले आणि बोलता बोलता पुढील तीन महिन्यांत सव्वा लाख रुपये जमा झाले.
भारत सरकारकडून मिळालेले पन्नास हजार व मंडळाने जमविलेले सव्वा लाख अशा प्रकारे पावणेदोन लाख रुपयांत ५० फूट लांब व २५ फूट रुंद आकाराचे स्टेज आणि त्याच्या बाजूला १० फूट रुंदीच्या दोन खोल्या तयार झाल्या.
सुरुवातीला वर्षभर स्टेजवर छप्पर नव्हते. बाजूच्या खोल्यांवर सिमेंट शीट्सची छपरे बसविली. या वास्तूचे ‘साहित्य मंदिर’ असे नामकरण करण्यात आले आणि संस्थेची कचेरी या वास्तूमध्ये स्थापन झाली. अशा प्रकारे साहित्य मंदिराचा प्रवास सुरू झाला.
१९९४ मध्ये साहित्य मंदिराच्या बाजूला असलेल्या नवी मुंबई बंगाली असोसिएशन येथे कार्यक्रम करण्यास सुरुवात झाली. साहित्य मंदिर हे ओपन एअर थिएटर असल्याने दोन्हीकडे एकाच वेळी कार्यक्रम असले की आवाजाचा त्रास व्हायचा, म्हणून आपले सभागृह बंदिस्त करावे असा विचार करण्यात आला. त्यानुसार प्लॅन तयार करण्यात आला.
या बंदिस्त सभागृहाच्या कामाच्या खर्चाचा अंदाज त्या वेळी २५ लाख रुपये होता. मंडळाकडे फक्त एक लाख रुपये होते. मग करणार काय ? हा मोठा प्रश्न होता.पण मंडळाच्या स्वच्छ आणि पारदर्शक कामामुळे नावलौकिक झाल्याचा फायदा मिळाला.
पुन्हा एकदा बिनव्याजी ठेव योजनेद्वारे पैसे उभे करण्याचे ठरले. त्याप्रमाणे कमीतकमी पाच हजार रुपये, पाच वर्षे मुदतीकरिता मंडळाकडे ठेवावेत आणि सभागृह परिपूर्ण झाले, की होणाऱ्या उत्पन्नातून पैसे परत करता येतील, असे आवाहन करण्यात आले. न भूतो न भविष्यती असे, सहा महिन्यांत एकोणीस लाख रुपये, बिनव्याजी ठेवींच्या स्वरूपात जमले.मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने पाच लाख रुपये देणगी दिली. थोडी रक्कम हितचिंतकांकडून देणगीरूपाने मिळाल्याने बंदिस्त सभागृहाचे काम पुढील आठ महिन्यांत पूर्ण झाले.
अशा प्रकारे साहित्य मंदिर सभागृहाला आकार आला. परंतु, ॲकॉस्टिकचे काम पैशांअभावी होऊ शकले नाही. त्या वेळी या कामाचा खर्च वीस लाखांच्या घरात असल्याचा अंदाज मिळाला.
१९९६ साली वाशीमध्ये सिडकोने विष्णुदास भावे नाट्यगृह तयार केले. ते वातानुकूलित आणि सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याने साहित्य मंदिरामध्ये इतर संस्थांचे कार्यक्रम होणे दुरापास्त झाले. त्याच सुमारास वाशी नगरात लग्न इत्यादी समारंभांसाठी सुमारे ३० हॉल तयार झाले. त्यामुळे अशा समारंभांपासून मिळणारे उत्पन्नही साहित्य मंदिराला कमीतकमी मिळू लागले. त्याचा विपरीत परिणाम झाला. काही बिनव्याजी ठेवीदारांनी पैसे परत मिळण्यासाठी फारच आग्रह धरला. अशा परिस्थितीत सभागृहाचा काही भाग एका आधुनिक व्यायामशाळेला महिना पस्तीस हजार रुपये भाड्याने दिला. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून काही जणांचे पैसे परत केले. परंतु, ही ‘व्यावसायिक कृती’ असल्याचे सांगून ‘सिडको’ने मंडळास नोटीस देऊन संपूर्ण साहित्य मंदिर परिसराला सील लावले. चार महिन्यांनंतर जिमच्या मालकाने, जिमचे सर्व सामान बाहेर काढल्यानंतर सिडकोने साहित्य मंदिर इमारतीचे सील काढले. हा आम्हां कार्यकर्त्यांना मोठा धक्का होता; परंतु कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागले आणि साहित्य मंदिर पूर्ववत केले. नेहमीप्रमाणे कार्यक्रम सुरू झाले. संस्थेवर आलेला हा काळा ढग विरून गेला.
पुढे वर्ष २००८मध्ये साहित्य मंदिराच्या ॲकॉस्टिकचे काम पूर्ण करण्याचा बेत केला. पुण्याचे ॲकॉस्टिक स्पेशालिस्ट आर्किटेक्ट श्री. प्रदीप गिरी यांनी पाहणी करून अहवाल सादर केला. खर्चाचा अंदाज होता रुपये पंचवीस लाख. पुन्हा डोळे पांढरे झाले. पण जिद्द होती. त्या वेळचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांना साकडे घातले. त्यांनी चौदा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. बाकीची रक्कम देणगीरूपात जमविण्याचे ठरविले.
सहा महिन्यांनी नाईक साहेबांकडून चौदा लाखांचा धनादेश मिळाला. मधल्या काळात आम्ही पाच लाख रुपये देणगीद्वारे जमा केले. त्यामुळे उत्साह आणि हुरूप अधिकच वाढला.पैशांचा ओघ लागला. नाईक साहेबांनी आणखी पाच लाख रुपये दिले. कार्यकारी मंडळातील सभासदांनी घरोघर फिरून आणखी एकतीस लाख रुपये देणगीद्वारे जमा केले. अशा प्रकारे एकूण पासष्ट लाख रुपये, सहा महिन्यांच्या काळात जमवून साहित्य मंदिर इमारतीचा कायापालट केला गेला.
आता साहित्य मंदिर सभागृह फक्त नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सभा यांच्याकरिता वापरण्यात येते. लग्न, मुंजी अशा समारंभांसाठी हे सभागृह देण्यात येत नाही. सभागृह वातानुकूलित असून याची आसनव्यवस्था ५१५ इतकी आहे.
वाचनालय
सुरुवातीला एका खोलीत ‘साहित्य मंदिर वाचनालय’ सुरू करण्यात आले. पुस्तके खरेदीकरिता पैसे महत्त्वाचे होते. त्यामुळे सभासदांना, ‘त्यांनी वाचलेली, परंतु घरातील कपाटांत ठेवलेली पुस्तके वाचनालयासाठी भेट द्यावीत,’ असे आवाहन केले. काही दिवसांत ५०० पुस्तके जमा झाली आणि ‘साहित्य मंदिर वाचनालय’ सुरू झाले.
या वाचनालयास १९९१ मध्ये शासनाचा क वर्ग व २००४ मध्ये ब वर्ग व आता तर अ वर्ग वाचनालय असा दर्जा मिळाल्याने त्या त्या वर्षांपासून सर्व संबधित शासकीय लाभ मिळत आहेत.
साहित्य मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले,त्यावेळी
वाचनालयासाठी १,१०० चौ. फूट जागा राखून ठेवण्यात आली. ह्या नूतनीकरणासाठी प्रा. अश्विनी बाचलकर यांनी बारा लाख रुपये देणगी दिली. त्यांच्या इच्छेनुसार साहित्य मंदिर वाचनालयाचे नाव बदलून त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय असे नामकरण करण्यात आले.
या वाचनालयातील
३१ मार्च, २०२२ अखेर, एकूण पुस्तके, ग्रंथसंख्या वर्गवारीनुसार पुढीलप्रमाणे आहेत-
कादंबरी : ३१,०८७ कथासंग्रह : ५,६६०
कविता : ४४७
नाटक : १७०
विज्ञान : ५,९८९
भविष्य :१,१७५
धार्मिक :२२४
संकीर्ण : ३,८४४
संदर्भ : ७,६०५
महिला विभाग :६३७
बालविभाग : १,१९२
या वाचनालयात मराठी बरोबरच हिंदीतील १२२ आणि इंग्रजीतील १,४४० पुस्तकेही आहेत.
सध्या वाचनालयाचे
प्रौढ ७४५, बाल ३२७ आणि मासिके वाचक १४७, असे एकूण १२१९ सभासद आहेत.
बालवाचकांसाठी
मागील पाच वर्षांपासून
१५ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी विनाशुल्क विभाग सुरू आहे. अशा सभासदांकडून २०० रु. अनामत रक्कम घेतली जाते. ती १५ जूननंतर परत करण्यात येते. बालवाचक एका वेळी एक पुस्तक घरी नेऊन वाचू शकतात.
एक वैशिष्ट्य म्हणजे वाचनालयातील सर्व कर्मचारी वर्गाचा प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि एक लाख रुपयांची हॉस्पिटलायझेशन पॉलिसी सुरू केली आहे. तसेच, प्रत्येकाच्या भविष्याची तजवीज म्हणून फंड अकाउण्टही सुरू करण्यात आले आहे. अशा प्रकारे, कर्मचाऱ्यांचा विमा आणि फंड अकाउण्ट सुरू करणारी नवी मुंबईमधील ही पहिलीच सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे.
मराठी माणसाची ‘नाटकवेडा’ अशी ख्याती आहे. १९८६ मध्ये, डिसेंबर महिन्यात लालन सारंग यांचे ‘तांदूळ निवडता निवडता’ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ‘बिघडले स्वर्गाचे दार’ ही दोन नाटके साहित्य मंदिर सभागृहात करण्याचे ठरले. त्यावेळी वाशीमध्ये नाटकासाठी नाट्यगृह नव्हते. बऱ्यापैकी मराठी माणसे राहावयास आली होती. त्यामुळे नाट्यरसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री होती. स्टेजवरील जमिनीवर लाद्या नव्हत्या. मातीचे सारवलेले स्टेज आणि वर छप्परही नव्हते. ‘ओपन टू एअर’ अशी परिस्थिती. ‘उघडले स्वर्गाचे दार’ नाटक चालू असताना पात्रांच्या चालण्यातून स्टेजवरील धूळ मधूनच उडायची. त्या वेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी उत्स्फूर्तपणे केलेला विनोद आठवतो, “कोण म्हणतो स्वर्गात स्वच्छता आहे? स्वर्गातही धूळ आहे!”
एक हजार खुर्च्या बसतील अशा प्रकारच्या ‘ओपन एअर’ साहित्य मंदिरात दोन्ही नाटकांना उत्तम प्रतिसाद मिळाला. मंडळालाही उत्पन्नाचा मार्ग मिळाला.
त्यानंतर १९९५ पर्यंत, दरवर्षी मे महिन्यात आणि डिसेंबरात प्रत्येकी चार नाटकांचा महोत्सव व एखादे बालनाटक, असा उपक्रम सुरू झाला. त्या काळात वाशीतील लोकसंख्याही बऱ्यापैकी वाढली होती. जवळच नेरूळ शहराचा विकास झाला. तिकडची मराठी माणसेसुद्धा नाटके पाहण्यासाठी येऊ लागली.
नाट्य महोत्सवाद्वारे साधारणपणे पावणेदोनशे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग साहित्य मंदिरात झाले.
१९९१ मध्ये पु.ल. देशपांडे आणि सुनीताताई यांनी साहित्य मंदिरात बा.भ. बोरकर यांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम केला. त्याच्या आठवणी आजही रसिक श्रोते बोलून दाखवितात.
हे मंडळ विविध उपक्रमात सक्रिय असते.
पावसाळा सोडला, तर बाकी आठ महिने साहित्य मंदिरात निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम, वर्षातून एकदा रक्तदान शिबिर, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या सहकार्याने तीन कॅन्सर डिटेक्शन कॅम्प्स, आरोग्य शिबिरे, व्याख्याने असे विविध कार्यक्रम होत असतात.मंडळाचे काही नियमित उपक्रम पुढील प्रमाणे आहेत.
वसंत व्याख्यानमाला :
१९८० ते १९९० पर्यंत सतत दहा वर्षे, दरवर्षी मे महिन्यात पाच दिवस वसंत व्याख्यानमाला चालविली. त्यामध्ये श्री. बाळासाहेब ठाकरे, मृणाल गोरे, श्री. मनोहर जोशी ही राजकारणी मंडळी, तसेच वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, सुहासिनी मुळगावकर, वि.आ. बुवा, डॉ. श्रीराम लागू यांसारख्या साहित्यिक वक्त्यांची भाषणे झाली.खंडित झालेल्या व्याख्यानमालेचे एप्रिल २०१० पासून पुनरुज्जीवन करण्यात आले. ह्या उपक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कथाकथन व वक्तृत्वस्पर्धा :
पहिली ते बारावी इयत्तेपर्यंत पाच गटांत, मराठी आणि इंग्रजी माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. साधारणपणे, ३० शाळांतील ३०० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतात. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन आणि पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी व बारावी अशा तीन गटांतील विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयावर वक्तृत्व सादर करावयाचे असते.
कराटे क्लासेस :
वीस वर्षे सातत्याने कराटे क्लासेसचे आयोजन केले जात आहे. कराटे खेळातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक मुले व मुलींनी या खेळात प्रावीण्य मिळविले आहे.
योग वर्ग :
सध्याच्या धकाधकीच्या काळात ‘आरोग्यासाठी योग’ हे सूत्र महत्त्वाचे झाले आहे. हे लक्षात घेऊन महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या वेळांमध्ये योगाचे वर्ग चालविण्यात येतात.
अनेक तरुण, तसेच ज्येष्ठ नागरिक या योगाच्या वर्गाचा लाभ घेतात.
विद्यार्थी सत्कार :
मंडळाच्या सभासदांच्या पाल्यांनी शालान्त परीक्षा आणि त्यावरील विविध परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविल्यास त्यांचा सत्कार करण्यात येतो.
ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र :
‘फेडरेशन ऑफ सीनिअर सिटिझन’च्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र शासनाची ओळखपत्रे मिळवून दिली जातात. आता पर्यंत ३०० व्यक्तींना अशी ओळखपत्रे मिळवून दिली आहेत. तसेच,
नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खास ओळखपत्रांचे अर्ज देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
अध्यात्म व विज्ञान चर्चासत्र :
प्रत्येक मंगळवारी, सायंकाळी ५.३० ते ७.०० वाजेपर्यंत साधारणपणे २५-३० सदस्य जमून ह्याविषयी चर्चा करतात.
पर्यावरण रक्षण :
बिसलेरी कंपनीच्या सहकार्याने प्लॅस्टिक कचरा व इ-वेस्ट सभासदांकडून संकलन करून ‘बॉटल फॉर चेंज’ प्रकल्पांतर्गत पुनर्निर्मिती करून पर्यावरण रक्षणात मंडळ सहकार्य करत आहे.
इ-श्रम पोर्टल :
केंद्र सरकारने २६ ऑगस्ट, २०२१ रोजी असंघटित क्षेत्रातील ३८ कोटी कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी इ-श्रम पोर्टल सुरू केले आहे. साहित्य मंदिर येथे नवी मुंबईतील श्रमजीवींसाठी कार्ड बनवून देण्याची व्यवस्था करण्यात आली. आतापर्यंत १,०१८ जणांची कार्डे तयार करून वितरित करण्यात आली.
महिला वाचकांचे चर्चासत्र :
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी, सायंकाळी ५.३० ते ७.०० वाजेपर्यंत महिला वाचक एकत्र जमून वाचलेल्या पुस्तकांविषयी चर्चा करतात.
नेत्रदान व देहदान आवाहन :
नागरिकांना नेत्रदान व देहदानाचे महत्त्व पटवून देऊन, त्यांना तसे करण्याचे आवाहन केले जाते. त्यानुसार सुमारे १०० नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.
‘नवी मुंबई स्वयंसेवी संस्था समन्वय मंचा’चा एक घटक या नात्याने मंचाच्या विविध उपक्रमांत सहभाग.
‘साहित्य मंदिर’ मासिक :
मंडळाने सुरुवातीला ‘नवी मुंबई’ पाक्षिक सुरू केले गेले. नंतर त्याचे रूपांतर ‘साहित्य मंदिर’ मासिकात झाले. दर महिन्याच्या १५ तारखेला मासिकाचे प्रकाशन करून सभासदांना ते पोस्टाने घरपोच पाठविले जाते. न्यूज पेपर रजिस्ट्रेशन अॅक्टअनुसार त्याला मान्यता मिळाली आहे. हे मंडळाचे मुखपत्र असल्याने मंडळाच्या सर्व कार्यक्रमांविषयी या मासिकात माहिती छापली जाते. स्थानिक लेखकांना प्राधान्य देऊन त्यांच्या लेखांना प्रसिद्धी दिली जाते. तसेच, मंडळाच्या आगामी कार्यक्रमांची माहिती आणि झालेल्या कार्यक्रमांचे वृत्तान्त या मासिकातून प्रसिद्ध केले जातात. या मासिकाचे ‘पोस्टल रजिस्ट्रेशन’ केल्यामुळे २५ पैशांच्या स्टॅम्पने ते संपूर्ण भारतात, कोठेही पाठविता येते.
आनंदवन आणि मंडळ :
३१ ऑक्टोबर, २००९ रोजी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांचा सत्कार आणि ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर संवाद, असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आणि सध्या त्याचे संपूर्ण व्यवस्थापन डॉ. प्रकाश आमटे करीत असलेल्या ‘लोकबिरादरी’ या प्रकल्पाला साडेचार लाख रुपये लोकवर्गणीतून जमवून दिले.
अशा प्रकारे बाबा आमटे यांच्या ‘महारोगी सेवा समिती’, वरोरा या संस्थेशी मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळाचे नाते जुळले.
त्यानंतर मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्पांना भेट दिली. त्या वेळी असे लक्षात आले, की चंद्रपूर, हेमलकसा जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी बंधुभगिनींना कपड्यांचीसुद्धा आवश्यकता आहे. दारिद्र्यरेषेखालील या नागरिकांच्या अंगावर धड वस्त्रसुद्धा नसते. मंडळाचे मुखपत्र ‘साहित्य मंदिर’ या मासिकातून आवाहन करण्यात आले, की आपण वापरलेले, परंतु सुस्थितीत असलेले चांगले कपडे धुऊन, इस्त्री करून साहित्य मंदिरात आणून द्यावेत. ते चंद्रपूर, हेमलकसा जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासींपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येईल. नागरिक याला उत्तम प्रतिसाद देत असून आजपर्यंत २,१०० गोणी भरून कपडे आनंदवन येथे पाठविण्यात आले.
डॉ. विकास आणि
डॉ. प्रकाश आमटे यांनी वेळोवेळी वस्त्रदात्यांना आणि मंडळाला धन्यवाद दिले आहेत.
१६ डिसेंबर, २०१४ रोजी, आनंदवनामधील अंध, अपंग, विकलांग कलाकारांच्या ‘स्वरानंदवन’ वाद्यवृंदाचे आयोजन वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात केले होते. त्या प्रसंगी देणगीद्वारे जमलेल्या एकोणीस लाख रुपयांचा धनादेश डॉ. विकास आमटे यांना आनंदवनातील इमारतींच्या नूतनीकरणासाठी देण्यात आला.
पुन्हा ५ जानेवारी २०१९ रोजी ‘स्वरानंदवन’ वाद्यवृंदाचे आयोजन करून आनंदवन संस्थेला नऊ लाख रुपये देणगी मिळवून दिली.
सौरऊर्जा प्रकल्प :
ऊर्जानिर्मितीकरिता इंधनाची आवश्यकता असते. पाणी, कोळसा, अणुइंधन, तेल अशा विविध प्रकारच्या इंधनांचा ऊर्जानिर्मितीकरिता वापर केला जातो. या नैसर्गिक स्रोतांची दिवसेंदिवस कमतरता होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्या किमतीतही भरमसाट वाढ झाली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अशा ऊर्जानिर्मितीमुळे पर्यावरणाची हानी होते. यावर उपाय म्हणजे सौरऊर्जा. भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात सूर्यप्रकाशाची कमतरता नाही व त्यासाठी किंमत मोजावी लागत नाही.
ऊर्जानिर्मिर्तीचा खर्च वाढला, की ग्राहकाला ऊर्जेकरिता किंमतही मोठी मोजावी लागते. आपल्या संस्थेने याकरिता पुढाकार घेऊन वर्ष २०१८मध्ये सौरऊर्जा प्रकल्प हाती घेऊन तो पूर्ण केला. २५ किलोवॅट प्रकल्पासाठी सोळा लाख रुपये खर्च झाला. त्यापैकी चार लाख रुपये सरकारकडून अनुदान मिळाले. याचा अर्थ, संस्थेचा खर्च फक्त बारा लाख रुपये झाला. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी मदत झाली आणि वीज बिलामध्ये सुमारे ४० ते ४५ टक्के कपात झाली. पुढील चार ते पाच वर्षांत झालेला खर्च भरून निघेल, अशी खात्री आहे. यासाठी निगा – दुरुस्तीचा खर्च जवळजवळ काही नाही. फक्त महिन्यातून दोन वेळा सर्व ८० पॅनल्स धुऊन स्वच्छ पुसायचे. जेणे करून त्यांवर धुळीचे कण साचून ऊर्जानिर्मिती कमी होणार नाही.
नेट मीटरिंग पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. याचा अर्थ, आपण निर्माण केलेली ऊर्जा महावितरण कंपनीकडे जाईल व आपल्याला लागणारी वीज महावितरणकडून मिळेल. महावितरण कंपनी आपल्याकडून घेतलेल्या प्रत्येक युनिटसाठी आपल्याला चार रुपये देते आणि आपल्याला चौदा रुपये दराने वीज विकते. नेट मीटरिंग पद्धतीमध्ये आपण उत्पादन केलेली वीज साठवून ठेवण्याची सोय नसते. त्यामुळे काही कारणास्तव महावितरणची वीज खंडित झाली असता आपल्याला होणारा वीजपुरवठा बंद होतो. याकरिता साहित्य मंदिर इमारतीमध्ये दोन इन्व्हर्टर्स बसविले आहेत. त्यामुळे अशा वेळी इमारतीमध्ये पूर्ण अंधार होत नाही.
डिझेल जनरेटर :
काही वेळा वीज खंडित होते. अशा वेळी साहित्य मंदिर सभागृहामध्ये जर कार्यक्रम चालू असेल, तर कार्यक्रम खंडित होतो. मंडळामध्ये असलेल्या इन्व्हर्टरवर फक्त स्टेजवरील दोन एलईडी लाइट्स व दोन माईक चालू राहतात. ही समस्या दूर करण्यासाठी १२५ किलोवॅट कपॅसिटीचा डीझेल जनरेटर, मार्च २०२०मध्ये खरेदी केला. त्यामुळे वीज खंडित होण्याची समस्या मिटली.
२००९ मध्ये संपूर्ण साहित्य मंदिर इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. साहित्य मंदिर सभागृह वातानुकूलित करण्यात आले .
अभ्यासिका :
गरजू विद्यार्थ्यांना शांत वातावरणात बसून अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
संस्थेचे मुखपत्र ‘साहित्य मंदिर’ मासिक प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध होत असून त्यामधून ग्रंथालयात समाविष्ट केलेल्या नवीन पुस्तकांची यादी प्रसिद्ध केली जाते.
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी एखादा दर्जेदार चित्रपट आणि चौथ्या शनिवारी एखाद्या साहित्यिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांना प्रवेश विनाशुल्क असतो.
मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळाची ही गौरवास्पद वाटचाल म्हणजे विलक्षण ध्येयवादी आणि ध्येयासाठी झटणारे कार्यकर्ते असले, म्हणजे कोणतीच गोष्ट अशक्य नसते, त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
लेखन:देवेंद्र भुजबळ
☎️9869484800