सिनेमा सिनेमा
आई, तू दोन रुमाल घेऊन जा सोबत. तुला नाही सहन होणार. असं सांगून माझ्या मनाची तयारी करणाऱ्या माझ्या मुलाला मी 'द काश्मिर फाइल्स' बघताना फार रडले नाही याचं आश्चर्य वाटलं. काश्मीर प्रश्नावरची माझी भावनिक गुंतवणूक माझ्या घरच्यांना सतत दिसत होती. त्यामुळे त्यांना माझी काळजी वाटणं स्वाभाविक होतं. पण चित्रपट बघताना मला जाणवत होतं की मी हे जे काही स्क्रीनवर बघते आहे ते मला आधीच माहिती आहे. कितीदा तरी हे मी माझ्या बंद डोळ्यांसमोर बघितले आहे. हा आक्रोश माझ्या कानांपर्यंत तीस वर्षांपूर्वीच पोहोचला आहे. पण ही दृश्य, हा आक्रोश हळूहळू मी माझ्या मनाच्या तळाशी दडपून टाकला. तो जाऊन बसला खोल खोल, माझ्या अंतर्मनात. पण त्याला आवाज फुटला नाही कधीच. जे बोलल्याने कोणाच्या कानातून मनापर्यंत झिरपत नाही ते सांगण्याची इच्छा हळूहळू मरून जाते. कोणीच ऐकत नाही, साधी सहानुभूती नाही, तदअनुभूती ( empathy )तर खूपच लांबची गोष्ट झाली.
1990, मी तेव्हा अभाविपची कार्यकर्ती म्हणून सक्रिय होते. सुनीता खेर आणि सुनीता मिस्त्री नावाच्या दोन काश्मिरी तरुणी काश्मीर खोऱ्यातला नरसंहार बघून, भोगून भारतभरातल्या लोकांना त्याचा 'आंखो देखा हाल' सांगायला प्रवास करत होत्या. ज्या कहाण्या मी त्यावेळी त्यांच्या तोंडून ऐकल्या त्याची माझ्या मनात तयार झालेली दृश्यं आणि त्यांच्या शब्दातला तो आक्रोश हे दोन्ही मनात तसंच साचलेलं होतं. या चित्रपटाने त्यावरचा सगळा पसारा, कचरा, धूळ बाजूला केली आणि वयाच्या विसाव्या वर्षी दाबून टाकलेल्या या दुःखाला वाचा फोडली. त्यानंतर 'चलो कश्मीर ' या आंदोलनात देशभरातल्या दहा हजार विद्यार्थ्यांबरोबर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवायला गेलेल्यांमधे एक मीही होते. तेव्हाच जम्मूतल्या विस्थापितांच्या छावण्यांमधे जाऊन पुन्हा एकदा तो आक्रोश ऐकला.
लाखो काश्मिरी पंडितांनी भयंकर नरसंहार अनुभवला. या यातना, या पिडा त्यांनी शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर भोगल्या पण 'ज्याचे त्याचे भोग' असं सहजपणे म्हणत संपूर्ण देशाने त्यांना साधे माणूसपणाच्या नात्यातूनही अव्हेरले. हा अस्वीकार, हा नकार त्या क्रूर नरसंहाराइतकाच दुष्टपणाचा होता. यात काश्मिरी पंडितांच्या तीन पिढ्या होरपळून निघाल्या. त्यांना काश्मिरातून हुसकावून लावल्यानंतर काश्मीरची काय दुरवस्था केली मुस्लिमांनी तेही आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत.
'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटात फक्त थोडीशी झलक बघायला मिळते काश्मीरी मुसलमानांच्या क्रौर्याची. प्रत्यक्ष निसर्गानेच सौंदर्य आणि बुद्धी बहाल केलेल्या काश्मिरी पंडित स्त्रियांवरचे हैवानी अत्याचार यात दाखवलेच नाहीत. लहान मुलांवरचे अत्याचार यात दिसले नाहीत. एका रात्रीत झालेले हजारो लोकांचे भयग्रस्त पलायन दिसले नाही. आपल्या लेकीसुनांची अब्रू वाचावी म्हणून, त्यांचे भयंकर हाल होऊ नयेत म्हणून स्वतःच्या हातात चाकू- कुर्हाडी घेऊन गरज पडली तर त्यांना संपवण्याची मानसिक तयारी केलेले हतबल बाप-भाऊ यात दिसले नाहीत. ते आम्ही बघितले निर्वासितांच्या छावण्यांमध्ये. संपन्न कुटुंबांना छोट्या-छोट्या तंबूमध्ये निकृष्ट अन्नधान्य खाताना बघून आणि काहीही चूक नसताना असं अपमानित जिणं जगताना बघून जे दुःख झालं होतं तेही गेली तीस वर्षे हृदयाच्या एका कप्प्यात बंदिस्त करून ठेवलं होतं. त्याला या चित्रपटाच्या निमित्ताने आशेचा प्रकाश दिसला.
या चित्रपटाच्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊनही या कश्मीर फाइल्सने काय साध्य केलं असा प्रश्न जर कोणाला पडला असेल तर त्याचं उत्तर म्हणजे सर्व राजकीय, राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक पैलूंवर या अत्याचारांचा स्वीकार आणि या सर्व स्तरांवर त्याला मान्यता मिळणं हे आहे. आणि त्याहीपलीकडे जाऊन एक मानसतज्ञ म्हणून मला जाणवलेला भाग म्हणजे या चित्रपटाने मानसिक व भावनिक स्तरावर लाखो लोकांना मोकळं केलं आहे.
ज्यांनी हे सर्व हत्याकांडाचे दुःख सोसले, प्रचंड अत्याचार भोगले आणि समाज त्याकडे लक्ष देत नाही म्हणून ज्यांची वर्षानुवर्ष तडफड झाली त्यांनी आज सुटकेचा निःश्वास सोडला. आमच्या दूर्दशेच्या कहाण्या देशातल्या करोडो जनते पर्यंत पोहोचल्या. आमच्यावरील अत्याचारांना नाकारले होते किमान आज माझ्या देशाने ते मानले. ही भावना त्यांच्या मनाला दिलासा देणारी आहे यात शंकाच नाही. ही त्यांच्या भोगलेल्या मानसिक त्रासावरील उपचारांची ( therapy ) सुरुवात आहे असे म्हटले पाहिजे.
दुसरा वर्ग आहे ज्यांना काश्मिरात काय घडलं याची माहिती होती. त्यातल्या काहींनी शक्य होतं त्या सिस्टीम मधून गेली तीस वर्ष काश्मिरी पंडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्न खूपच तोकडे पडत होते. आपल्या प्रयत्नांना फारसे यश येत नाही याचा त्रास त्यांना होत होता. त्यांच्याही अगतिकतेचा आज काश्मिर फाइल्स मुळे निचरा व्हायला सुरुवात झाली आहे.
तिसरा वर्ग तो ज्यांना काश्मिरी पंडितांच्या हालांची, काश्मिरातल्या बिघडलेल्या परिस्थितीची सातत्याने माहिती होती, पुरेशी जाण होती. पण ते परिस्थितीपुढे हतबल होते. ही हतबलता मनाला पदोपदी प्रचंड छळत असते. या हतबलतेचा त्रास माझ्यासारख्या हजारो लोकांना आजतागायत होत होता. कधीतरी अचानक माझ्या मनात यायचं फक्त हिंदू आहे म्हणून बलात्कार व्हावा याचं दुःख कधी कळणार समाजाला? या स्त्रियांचा आक्रोश फक्त आसमंतातत विरून जातो? आणि आपल्याला माहिती असूनही आपण तो कोणाला सांगू शकत नाही. फक्त सांगून तो कोणापर्यंत पोहोचत नाही याचा त्रास वेगळाच. अशा लोकांच्याही मनात साचलेल्या दुःखाला, त्यांच्या अश्रुंना आज वाट मिळाली. मात्र आता हे अश्रू एकाकी नाहीत तर समाजाचे आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब मानता येईल.
आणि चौथा वर्ग ज्यांना हे काश्मिरातले अत्याचार माहितीच नव्हते. स्वतःच्या अनभिज्ञतेतून बाहेर पडून या प्रश्नाच्या आकलनाकडे ते जात आहेत. समाजाच्या एकत्रित येण्याचा प्रवास सुरू झाला आहे.
मानसशास्त्रात आम्ही म्हणतो की एखादी समस्या आपल्या क्षमतेपलीकडली आहे असं वाटलं की आपण ती नाकारतो. पण त्या समस्येचा स्वीकार केला की ती सोडवण्यात यश येते. या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून 'द काश्मीर फाईल्स' कडे बघायला हवे.
अर्थात नकाराकडून स्वीकाराकडे जाणाऱ्या या प्रवासामागे संघ परिवाराचे अथक परिश्रम आहेत. आपल्या पंतप्रधानांची खंबीर भूमिका आणि विवेक अग्निहोत्री यांची हिम्मत आहे. आता संपूर्ण देश त्यांच्यामागे उभा आहे.
Hats Off to team The Kashmir Files.
वैशाली व्यवहारे देशपांडे
पुणे
लेखन:वैशाली व्यवहारे -देशपांडे ,पुणे