38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeलेखदेवेंद्र भुजबळ : माणसे जोडणारा अधिकारी !

देवेंद्र भुजबळ : माणसे जोडणारा अधिकारी !

महाराष्ट्र शासनाच्या वतीने
१९ ते २४ डिसेंबर हा आठवडा
“सुशासन आठवडा” म्हणून साजरा करण्यात येत आहे.यानिमित्ताने एखादा शासकीय अधिकारी लोकाभिमुख राहून काम करत असेल तर तो इतरांच्या मनात कसे कायमचे घर करून राहतो, हे मिशन आयएएस चे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी लिहिलेल्या पुढील लेखावरून दिसून येईल.
– संपादक

नागपूरच्या दैनिक तरुण भारतमध्ये माझी आठ नऊ वर्षांपूर्वी लेखमाला सुरू होती. विषय होता,” स्पर्धा परीक्षा सक्सेस मंत्रा “.हा लेख वाचून मला अनेकांचे फोन येत होते .

असाच एक फोन आला तो सरळ मंत्रालयातून .तो फोन होता श्री देवेंद्र भुजबळ यांचा. तेव्हा ते महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात माहिती संचालक म्हणून कार्यरत होते .सर्वप्रथम त्यांनी माझे अभिनंदन केले .त्यांना माझी लेखमाला आवडली होती . त्यांनी मला लोकराज्य, महान्यूज साठी लेखन करण्याची विनंती केली.

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातून फोन येतो,एक अधिकारी मला शासनाच्या नियतकालिकांमध्ये लिहिण्याची विनंती करतो ,
ही गोष्ट मला अभूतपूर्व अशी वाटली. मंत्रालयातील एखाद्या अधिकाऱ्याने नागपूरचा पेपर वाचणे व मला फोन करणे म्हणजे नवलच. देवेंद्र भुजबळ साहेबांचा परिचय झाला तो असा.

असे कितीतरी लोक भुजबळ साहेबांनी आपल्या कार्यकाळात जोडलेले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हा माणूस लोकाभिमुख आहे. आमची मैत्री अजून घट्ट होत गेली .

एक दिवस भुजबळ साहेबांचा फोन आला .ते म्हणाले,
महाराष्ट्र शासनाच्या दूरदर्शन वरील “जय महाराष्ट्र ” या लोकप्रिय कार्यक्रमासाठी आम्हाला तुमची मुलाखत हवी आहे.हे ऐकून मला धक्काच बसला .जय महाराष्ट्र
कार्यक्रम म्हणजे अतिशय लोकप्रिय कार्यक्रम. केंद्रीय मंत्री ,मुख्यमंत्री ,मंत्री तसेच महाराष्ट्र व देशातील दिग्गज लोकांच्या मुलाखती जय महाराष्ट्र मधून प्रसारित झालेल्या. त्यामुळे मला तो माझा बहुमान वाटला. मी लगेच त्यांना होकार दिला . भुजबळ साहेब पुढे म्हणाले, आम्हाला आकाशवाणीवरील दिलखुलास या कार्यक्रमासाठी देखील तुमची मुलाखत हवी आहे .

त्या प्रमाणे ठरल्याप्रमाणे, ठरलेल्या दिवशी मी अमरावती येथून मुंबई गाठली. मंत्रालयात सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नसतो .
मी मंत्रालयाच्या गेटवर पोहोचल्यानंतर श्री देवेंद्र भुजबळ यांना फोन केला . त्यांनी लगेच मला आत घ्यायला गाडी पाठवली. मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क कार्यालयात त्यांची व माझी अशा प्रकारे पहिली भेट झाली.ही पहिलीच भेट लवकरच घट्ट मैत्रीत रूपांतरित झाली .

चहापान झाल्यानंतर देवेंद्र भुजबळ साहेबांनी त्यांच्या सहकार्‍यांना बोलावून मला आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये नेण्यासाठी सूचना केली.त्या दिवशी दिवसभर आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या स्टुडीओमधून माझ्या मुलाखतींचे रेकॉर्डिंग झाले.

माझ्यासाठी हे सर्व नवीन होते. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर रेकॉर्डिंग झाल्यावर मी परत मंत्रालयात आलो. देवेंद्र भुजबळ यांच्या
केबिन मध्ये अल्पोपहार झाला. आणि देवेंद्र भुजबळ यांच्या अधिकाऱ्यांनी मला सीएसटी रेल्वे स्टेशनवर शासकीय वाहनाने सोडले.पुढे ठरल्या दिवशी दूरदर्शनच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात माझी मुलाखत प्रसारित करण्यात आली.तर आकाशवाणीवरील दिलखुलास कार्यक्रमात माझी मुलाखत तीन भागात सलग तीन दिवस प्रसारित करण्यात आली होती.

मला हे सर्व आश्चर्याचे धक्के होते .मला मुंबईला बोलावण्यात येते काय, माझ्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात येते काय , कार्यक्रम झाल्यावर शासकीय वाहनाने मला रेल्वे स्टेशन पर्यंत पोहचून देण्यात येते काय,हे सर्व स्वप्नवत वाटत होते . पण यावरून मी देवेंद्र भुजबळ साहेबांचे मूल्यांकन केले . हा माणूस माणुसकीला जपणारा आहे. पुढे आमचे संबंध वाढत गेले .

एकदा नवी मुंबईचे नगरसेवक
श्री संजूभाऊ आधारवाडे यांनी पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी माझे व्याख्यान
आयोजित केले होते .त्या नुसार साधारणपणे 18 हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते .हा उपक्रम राबवण्यासाठी श्री देवेंद्र भुजबळ साहेबांचे आम्हाला भरपूर सहकार्य लाभले .मला ते सतत प्रोत्साहन देत राहिले. मी आयुष्यात त्यांना कधीही विसरू शकणार नाही .कारण माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांनी मला दूरदर्शनवरून जय महाराष्ट्र सारख्या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी निमंत्रित करून जणू माझ्या कर्याचाच बहुमान केला होता. माझी दूरदर्शन आणि आकाशवाणी वरील मुलाखत पाहून मला दोन हजारच्या वर फोन त्या वेळेस आले .

२०१५ सालची ही गोष्ट .श्री देवेंद्र भुजबळ यांनी मला जी दूरदर्शन व आकाशवाणी वर संधी दिली त्यामुळे मी आणि माझे काम महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यात पोहोचू शकलो.

श्री देवेंद्र भुजबळ साहेब
सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव व आदर्श ठेवून त्यांची ” मिशन आयएएस” चे राज्य समन्वयक या सेवाभावी ( विना मानधन ) पदावर नेमणूक करण्याचे आम्ही ठरविले.तसा प्रस्ताव माननीय श्री भुजबळ साहेबांसमोर ठेवला आणि त्यांनी तो लगेच स्वीकारला .शासकीय सेवेत असताना अनेक लोकांना जोडणारा हा माणूस मिशनमध्ये सहभागी झाल्यामुळे मिशन आयएएस चा केवळ गौरवच वाढला नाही,तर फार मोठीं गती प्राप्त झाली.

पूर्वी आमचे मिशन आयएएस हे फक्त अमरावती आणि महाराष्ट्राच्या काही भागांपुरते मर्यादित होते . त्या मिशनला त्यांनी पूर्ण भारतभर पसरवण्याचे प्रयत्न चालविलेले आहेत .

सातत्याने लेखन करणे , सातत्याने लोकांच्या संपर्कात राहणे, स्वतःहून फोन करणे, आलेला प्रत्येक फोन उचलणे, त्याच्याशी प्रेमाने बोलणे, त्याच्या अडचणीवर उपाय शोधणे हे काम त्यांच्या रक्तात भिनले आहे. असा हा खऱ्या अर्थाने देवाचा इंद्र असलेला देवेंद्र आणि बाहू मध्ये बळ असलेला भुजबळ हे दोन्ही शब्द त्यांनी आपल्या आचरणाने कर्तुत्वाने व दिलखुलास वृत्तीने खरे करून दाखविले आहेत.

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, समाजसेवेची आवड असणाऱ्या “मिशन आयएएस” चे कार्य गल्लीपर्यंत दिल्लीपासून
पोहोचवीणाऱ्या या व्यक्तिमत्वाचे आभार मानतो
आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतीतो.
प्रा डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक,मिशन आयएएस
(9869484800)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]