आपण अध्यात्माला मनोरंजनाचे साधन बनवून टाकले
प.पू.विद्यानंदजी सागर बाबा
दुसऱ्या दिवशीच्या कथेस जनसागर ओसळला
भारतभरातून आलेल्या साधू- संतांचा उचित सन्मान
लातूर ;दि.१५(वृत्तसेवा )-अध्यात्म ही गोष्ट सहजतेने घ्यायची नाही .अध्यात्म हे मनोरंजनाचे साधन नाही; परंतु आपण अध्यात्माला मनोरंजनाचे साधन बनवून टाकलेआहे, त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराज पाहून कथा- कीर्तने होऊ लागली. मनोरंजनाच्या साधन म्हणून गावोगावी कथा- कीर्तन होऊ लागलेत. अशा प्रकारातून आपल्याला खरा आत्मीक आनंद प्राप्त होणार नाही .खरा आत्मिक, परमार्थिक आनंद मिळवायचा असेल तर सत्याची कास धरा, असे आवाहन प.पू. विद्यानंदजी सागर महाराज बाबा यांनी केले.
श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समितीच्या वतीने मानव कल्याण एंव विश्वशांतीसाठी लातूरमध्ये सात दिवशीय श्री श्री अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्र महायाग एवं श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशीच्या आशीर्वचनात पूजनीय बाबा बोलत होते. आज देशभरातून आलेल्या साधु -संतांचा व्यासपीठावर उचित सन्मान करण्यात आला. तसेच कथेच्या प्रारंभी गजराजाच्या सोंडेतून श्रीफळ वाढवण्यात आले. या गजराजाने कथास्थळी येऊन आपल्या सोंडेने पूजनीय विद्यानंदजी सागर बाबा यांना पुष्पहार अर्पण करून नमनही केले .कथास्थळी उभा करण्यात आलेले कारंजे, अश्व, गजराज, भव्य व्यासपीठ पाहून जणू लातूर नगरीमध्ये स्वर्गच अवतरला आहे की काय, असा भास निर्माण होत असल्याचे तसेच यज्ञ शाळेतील पवित्र वातावरण पाहून भक्ती भावाने अंगभर रोमांच उभे राहत असल्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया असंख्य भावीक भक्तांनी व्यक्त केल्या .त्याचप्रमाणे दररोज अन्नदानही करण्यात येत असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भाविक भक्त म प्रसादाचा लाभ घेत आहेत. आजच्या कथेमध्ये बाबांनी भागवत ग्रंथाचे महत्त्व सांगितले. मानव कल्याणासाठी नि:ष्काम भक्ती दर्शवणारा भागवत ग्रंथ आहे. नि:ष्काम भक्ती, नि:ष्काम सेवा, समर्पण भाव भगवान परमात्म्याला प्रसन्न करणारे आहेत, असे सांगत बाबांनी यज्ञाचे महत्त्वही विशद केले. यज्ञ करणे ही बाब तशी सहजासजी प्राप्त होणारी नाही, त्यासाठी आपार पुण्य करावे लागते. लातूर नगरीमध्ये होत असलेल्या या अष्टोत्तर शत कुंडात्मक यज्ञात दररोज जास्तीत जास्त भाविकांनी आपली समर्पणाची आहुती द्यावी ,असे आवाहनही यावेळी बोलताना केले.
साधु-संतांचा उचित सन्मान
यावेळी देशभरातून आलेल्या साधू संतांचा व्यासपीठावर बोलवून उचित सन्मान करण्यात आला. यामध्ये स्वामी राघवानंद गिरीजी महाराज (राजस्थान ),स्वामी सुरेशानंद गिरीजी महाराज( ऋषिकेश ),स्वामी गोविंदानंद गिरीजी (हरिद्वार ), स्वामी शिवांक गिरीजी महाराज( हरिद्वार), स्वामी नित्यानंदजी गिरीजी महाराज (शिर्डी), स्वामी राजेश्वरानंदजी महाराज (झासी), स्वामी हरि नारायण गिरीजी( हिमाचल प्रदेश ),स्वामी गोरक्षानंद गिरीजी महाराज (मुंबई ),स्वामी पूर्णानंद गिरीजी महाराज( मध्य प्रदेश), स्वामी पूर्णानंद गिरीजी महाराज (मध्य प्रदेश), स्वामी कैवल्य गिरीजी महाराज (हरिद्वार), स्वामी शंकरानंद गिरीजी महाराज (काशी )आदींचा समावेश होता .यावेळी यज्ञास बसलेल्या 108 यजमानांच्या हस्ते कथा समाप्तीनंतर भागवत ग्रंथाची आरती करण्यात आली.
: …..चौकट…..
धर्म कार्यासाठी उच्च शिक्षित बनले संन्याशी!
या अष्टोत्तर शत कुंडात्मक महायाग आणि परमपूज्य विद्यानंदजी बाबा यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आगळे- वेगळे खास वैशिष्ट्य सर्वासमोर आले शोभायात्रेपासून बाबांच्या रथामध्ये सतत वावरत असलेले व त्यांच्या अवती-भवती वास्तव्यास असणारे दोन तेजपुंज साधू कोण आहेत ? याबद्दल अनेकांच्या मध्ये कुतूहल निर्माण झाले होते. आज याचा उलगडा झाला. आज कथेच्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याचा उलगडा उपस्थित हजारो भाविक भक्तांना झाला.
कथेच्या दुसऱ्या दिवशी भारतभरातून आलेल्या साधू -संतांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी या दोन तरुण उच्चशिक्षित साधूंचा परिचय सगळ्यांना झाला यातील एक तरुण आहेत त्यांचे नाव आहे , शिवांक गिरीजी महाराज .ते हरिद्वारवरून आलेले आहेत .शिवांक महाराजांनी अवघ्या नवव्या वर्षी संन्यास धर्म स्वीकारला .धर्मप्रसारासाठी संन्याशी झालेल्या या तरुण महाराजांनी केवळ धार्मिक कार्यात स्वतःला गुरफाटून घेतले नाही तर त्यांनी धर्म कार्याबरोबरच एम. कॉम ,एलएलबी पर्यंत पदवी देखील प्राप्त केली आहे .
दुसरे एक तरुण साधू आहेत त्यांचे नाव आहे स्वामी कैवल्य गिरीजी महाराज .ते हरिद्वार वरून आलेले आहेत .या तरुण साधुने संन्यास धर्म स्वीकारला आणि मेकॅनिकल इंजिनियर पर्यंत पदवी देखील प्राप्त केली आहे. उच्चशिक्षित असलेले हे दोन साधू -संन्याशी बनले आणि त्यांनी आपले पूर्ण आयुष्य धर्म कार्यासाठी या भारत मातेला अर्पण केले आहे. या दोन उच्च शिक्षित साधूंचा परिचय करून दिला जात होता आणि त्यांचा सत्कार होत होता तेंव्हा भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट करुन कथा मंडप डोक्यावर घेतले.
……चौकट…..
…आणि गजराजाने बाबांना पुष्पहार घालून केले नमन
या कथेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे कर्नाटकातील दावणगिरी येथून एका गजराजाला आयोजकाने आणले आहे. या गजराजांनी आपल्या सोंडेने श्रीफळ वाढवला आणि या गजराजाने चक्क कथा मंडपात येऊन पूजनीय विद्यानंद सागर बाबा यांना पुष्पहार अर्पण करून नमन केले .गजराज जेव्हा सोंडेने बाबांना पुष्पहार अर्पण करीत होता तेव्हा उपस्थित हजारो भाविकांनी हे विलोभनीय दृश्य याची देही याची डोळा पाहिले आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. सातही दिवस हा गजराज कथास्थळी वास्तव्यास आहे. बच्चे कंपनीसाठी आणि माता -भगिनींसाठी हे गजराज आकर्षणाचा विषय बनला आहे. हजारो बच्चे मंडळी व महिला या गजराजाची भक्ति भावाने दर्शन करून पूजा करीत आहेत.
. . चौकट .
साधू संतांनी नृत्याचा धरला फेर!
विद्यानंदजी सागर बाबा कथेच्या वेळी जेव्हा- जेव्हा भजन म्हणतात तेव्हा -तेव्हा उपस्थित स्त्री -पुरुष आपले देहभान हरपून नृत्यात तल्लीन होतात .देशभरातून आलेल्या साधु -संतांना देखील भजनात तल्लीन होण्याचा मोह आवरता आला नाही .’ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव -’या भजनावर नृत्याचा फेर धरला . स्वामी बालकानंद महाराज( आंध्र )आणि स्वामी राघववानंद गिरीजी महाराज( राजस्थान) यांनी तर फुगडी खेळली. भक्ती रसात स्वतःला तल्लीन करण्याची किमया अध्यात्मात आहे हेच यावेळी दिसून आले.