एकाच दिवशी १०शाळांच्या सहली :गोवा व जर्मनीचे पर्यटक हत्तीबेटावर
उदगीर–तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असलेल्या हत्तीबेटावर दत्त जयंती महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.उद्या दि. ७ डिसेंम्बर रोजी दत्त जयंती निमित्त हत्तीबेटावर भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान शनिवारी एकाच दिवशी हत्तीबेटावर शेजारच्या नांदेड व कर्नाटकाच्या सीमा भागासह लातूर जिल्ह्यातील १०शाळांच्या सहली हत्तीबेटावर आल्या होत्या. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हत्तीबेट फुलून गेले होते. याच दिवशी गोव्याचे १५ व जर्मनीच्या एका जोडप्याने हत्तीबेटावर येवून या गडावर फुललेल्या निसर्ग नंदनवनाचा आनंद घेतला.
दि.१ डिसेंम्बर ते ७डिसेंम्बर या कालावधीत होणाऱ्या दत्त जयंती सोहळ्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या स्वागतासाठी हत्तीबेट गडनगरी सज्ज झाली आहे.

दत्त मंदिराचे पुजारी रामपुरी महाराज व भानुदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त मंदिरासमोर धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. श्री स्वामी समर्थ मंदिरात उदगीरच्या गणेश मंदिराचे पुजारी रघुनाथ महाराज व श्री स्वामी समर्थ मंदिराचे व्ही. एस. कुलकर्णी,सीतारामदास त्यागी महाराज,विष्णू संपते यांच्या मार्गदर्शनाखाली गुरू चरित्राचे पारायण सुरू करण्यात आले आहे. सद्गुरू गंगाराम महाराज संजीवन समाधी मंदिराचे पुजारी गंगाधर गोसावी व श्रीराम चनावार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
शनिवारी १०शाळांच्या सहली आल्यानंतर रविवारी ३शाळांच्या सहली हत्तीबेटावर आल्या होत्या. रोजच शाळांच्या सहली व पर्यटक व भाविक भक्तांनी हत्तीबेट फुलून जात आहे.उद्या दत्तजयंती निमित्त हत्तीबेटावर भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी आरती व पूजा व दुपारी घुगरीची आरती व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. या यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी हत्तीबेट संस्थानच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.