- ◆विविध वार्ड, स्वच्छतागृहांची पाहणी; औषध साठ्याची पडताळणी ◆
- ●रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांच्याशी सुसंवाद ठेवण्याच्या सूचना
- ‘सीपीआर’विषयी ग्रामीण भागात जनजागृती करा ●
लातूर, दि. 06 -: येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्य सुविधेचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज आढावा घेतला. रुग्णालयातील प्रत्येक वार्ड, विभागाची त्यांनी पाहणी केली. सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी सुसंवाद ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच रुग्णालयातील आवश्यक सुविधा, उपलब्ध औषध साठ्याची माहिती घेतली. तब्बल तीन तास जिल्हाधिकारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी करीत होत्या.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी रुग्णालयातील सर्व स्वच्छतागृहांची पाहणी केली. तसेच ही स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध वार्डांची पाहणी केली. याठिकाणी उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी रुग्णालयातील सुविधांबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या एक महिलेच्या आईशी संवाद साधून तिच्या मुलीच्या तब्येतीबाबत विचारपूस केली.
‘सीपीआर’ विषयी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवा
हृदयविकाराचा झटका आल्याने होणारे मृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे, त्यांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना मार्गदर्शन करावे. यामध्ये हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे, अशा रुग्णांना वेळीच कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (सीपीआर) कसा द्यावा, याबाबतची माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
नेत्रदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करा
मोतीबिंदूसारख्या आजाराचे आणि डोळ्यांच्या इतर आजारांचे प्रमाण सध्या वाढत आहे. लहान मुलांमध्येही हे आजार दिसून येत आहेत. जिल्हा मोतीबिंदू आजारापासून मुक्त करण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने विशेष मोहीम राबवावी. तसेच मृत्यू पश्चात नेत्रदानासाठी जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी घेणार औषध साठ्याचा नियमित आढावा
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपलब्ध औषधी साठ्याची माहिती घेतली. तसेच ‘ई-औषध’ पोर्टलवर नियमितपणे ही माहिती अपडेट करण्याच्या सूचना दिल्या. यापुढे औषध साठ्याचा आपण नियमित आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज 1600 ते 1700 रुग्णांची तपासणी केली जाते. तसेच सुमारे 22 ते 25 प्रसूती होतात. यामध्ये सीझरचे प्रमाण 50 टक्केपर्यंत असते. रुग्णालयात आवश्यक औषधी साठ्यासाठी पुरवठा आदेश देण्यात आले आहेत, सीटी स्कॅनची सुविधा सुरु करण्यात आली आहे. तसेच नवीन एमआरआय मशीनसाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जोशी यांनी दिली.