…..तर गावे ओस पडतील – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
जलसाक्षरता अभियान;
दुसऱ्या दिवशीही रॅलीस प्रतिसाद
निलंगा/प्रतिनिधी: गुणवत्तेची खाण असणाऱ्या लातूर जिल्ह्यात पाण्याअभावी उद्योगधंदे नाहीत.नोकरी व रोजगाराची सोय नसल्याने येथील तरुणांना नाईलाजाने शहरांची वाट धरावी लागत आहे.यामुळे आगामी कांही वर्षात जिल्ह्यातील गावांत केवळ वृद्ध मंडळी शिल्लक राहून गावेच्या गावे ओस पडतील,अशी भीती आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.
आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वात मंगळवारपासून सुरू झालेल्या जलसाक्षरता अभियानात दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तालुक्यातील नणंद,मदनसुरी,मुदगड एकोजी,कासारशिरसी या गावांना दुचाकी रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या.
प्रत्येक गावात श्री गणेशाची महाआरती केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आ.निलंगेकर म्हणाले की, गुणवत्तेच्या बाबतीत लातूर जिल्ह्याचा देशात नावलौकिक आहे परंतु पाण्याच्या बाबतीत नेमके याच्या उलट आहे.लातूर हे गुणवत्तेची खाण असले तरी उच्चशिक्षित युवकांना येथे नोकरी मिळत नाही. कमी शिकलेल्या तरुणांना गावात उद्योगधंदे नसल्यामुळे रोजगार मिळत नाही.पाणी नसल्यामुळे उद्योजक जिल्ह्यात येण्यास तयार नाहीत.परिणामी जिल्ह्यातील तरुणांना नोकरी व रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांकडे जावे लागत आहे.आजही जिल्ह्यातील हजारो तरुण इतर ठिकाणी काम करून उदरनिर्वाह भागवत आहेत.भविष्यात ही संख्या वाढण्याची भीती असून त्यामुळे गावात तरुणच शिल्लक राहणार नाहीत.परिणामी गावोगाव केवळ वृद्ध मंडळीच दिसून येतील.यासाठी जिल्ह्यात पाण्याची सुविधा असणे गरजेचे आहे.आपण जलसाक्षर होऊन पाण्याचा योग्य वापर करायला शिकले पाहिजे.
आ.निलंगेकर म्हणाले की,दुष्काळी स्थिती दूर करण्यासाठी राज्य शासन समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात देण्यास तयार आहे.हे पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात सोडण्यासाठी आपण जनरेटा उभारला पाहिजे,असे आवाहनही आ.निलंगेकर यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी,प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे,नणंद येथे जेष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर,दगडू साळूंके,
संजय दोरवे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सोसायट्यांचे पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पाण्याचा हक्क मागणारा आमदार …
लातूर जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आ.निलंगेकर सातत्याने प्रयत्नशील आहेत. यापूर्वीही इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या माध्यमातून त्यांनी जलसाक्षरतेसाठी कार्य केलेले आहे.आता शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या पाण्यातील आपला हक्काचा वाटा पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे अभियान राबविले जात आहे.मराठवाडा आणि त्यातही लातूर,बीड व धाराशिव हे तीन जिल्हे अधिक प्रभावित असतानाही आ.निलंगेकर वगळता इतर लोकप्रतिनिधींनी अद्याप याबाबत फारशी हालचाल केल्याचे दिसत नाही. आपल्या हक्कासाठी भांडणारे,प्रयत्न करणारे संभाजीराव पाटील हे एकमेव आमदार असावेत, अशी चर्चा ग्रामीण भागात होऊ लागली आहे.
पाण्याचा वाटा ठरवून द्यावा….
शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.या माध्यमातून एकूण १३५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार आहे.हे पाणी देतानाच शासनाने त्याचा जिल्हा निहाय वाटा ठरवून द्यावा. त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होणार नाहीत.ज्या भागात नदीपात्रात बारमाही पाणी राहते किंवा मिळते त्या भागातील शेती समृद्ध आहे.उद्योगधंदेही तेथे आहेत पण या तीन जिल्ह्यात पाणी नसल्यामुळे रोजगाराचा अभाव आहे.मांजरा व तेरणा नदीपात्रात पाणी राहिले तर आपल्या जिल्ह्याचाही विकास होईल,असे मत आ.
निलंगेकर यांनी मांडले.
२४८ पाठिंबा पत्रे….
आ.निलंगेकर यांनी मंगळवारी (दि.१९) जलसाक्षरता अभियानास सुरुवात केली.बुधवारी सकाळपर्यंत अभियानाला पाठिंबा देणारी २४८ पत्रे त्यांना प्राप्त झाली आहेत. विविध गावातील ग्रामपंचायती,सेवा सहकारी संस्था, गणेशोत्सव मंडळे,महिला बचत गट यांच्यासह विविध संस्था व संघटनांकडून ही पत्रे देण्यात आली आहेत. हक्काचे पाणी मिळावे यासाठी ही मंडळी आ.निलंगेकर यांच्या पाठीशी उभी आहेत.