दिशा समितीच्या बैठकीत माजी मंत्री आ.निलंगेकरांचा इशारा
लातूर/प्रतिनिधी ः- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे जलजीवन मिशन होय. या उपक्रमाच्या माध्यमातून हर घर नल, नल से जल, देण्याचा मानस व्यक्त करण्यात आलेला असून या मिशनचे काम अत्यंत दर्जेदार आणि जलदगतीने होणे अपेक्षीत आहे. मात्र लातूर जिल्ह्यात या कामाबाबत अनेक तक्रारी असून काम अतिशय संथ गतीने होत आहे. त्यामुळे या कामात कोणतीही दिंरगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.
लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खा. सुधाकर श्रृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक सोमय मुंडे आदींची उपस्थिती होती. या बैठकीत केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या योजना व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
देशातील प्रत्येक नागरीकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन हाती घेण्यात आलेले आहे. पंतप्रधान मोदी यांचा अतिशय महत्वकांक्षी असलेला हा प्रकल्प संपूर्ण देशभरात राबविला जात असून लातूर जिल्ह्यातही या अभियानाच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात आलेली आहेत. हर घर नल, नल से जल मिळण्यासाठी हा उपक्रम अधिक गतीने व दर्जेदार कामाने पुर्ण होणे अपेक्षीत असल्याचे सांगून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यात मात्र या कामाबाबत अनेक तक्रारी असल्याचे निदर्शनास आणून दिले. या मिशन अंतर्गत होणारी कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे सांगून हे काम संथ गतीने होत असल्याच्या तक्रारीही नागरीकांकडून होत आहेत. त्यामुळे या कामाचा दर्जा सुधारून ही कामे अधिक गतीने होणे आवश्यक असल्याचे सांगितले. हे अभियान लोकांसाठी अतिशय महत्वाचे असल्याने या कामामध्ये कोणतीही दिंरगाई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी दिला.
केंद्रीय रस्ते निधीच्या माध्यमातून होणारे रस्ते व राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण व्हावीत याकरीता प्रशासनाने संबंधीत गुत्तेदारांना सुचना करून ही कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी त्यांना कालबद्ध कार्यक्रम आखून द्यावा अशी सुचना दिली. त्याचबरोबर या निधीच्या माध्यमातून होणार्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधीत गुत्तेदाराची कांही रक्कम प्रशासनाने जमा करून घ्यावी असेही सांगितले. जेणेकरून या रस्त्याची दुरुस्ती करणे सोपे जाईल आणि गुत्तेदारांवरही जरब बसेल. त्यामुळे कामाचा दर्जाही सुधारण्यास मोठी मदत होईल असे सांगितले. निलंगा ते औराद शहाजनी या महामार्गाचे काम जोपर्यंत गुणवत्तापुर्ण होणार नाही तोपर्यंत या महामार्गावर टोल सुरु होणार नाही असे सांगून या महामार्गाचे काम लवकरात लवकर दर्जेदार करण्यासाठी संबंधीताना प्रशासनाने सुचना द्याव्यात असेही माजी मंत्री आ. निलंगेकरांनी सांगितले. मान्सून लांबलेला असून जिल्ह्यात संभाव्य उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेत प्रशासनाने मनेरगाच्या माध्यमातून घर तेथे शोषखड्डा तसेच जलस्त्रोत्र रिर्चाज करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घ्यावेत आणि शहरी भागात रूफ वॉटर हार्वेस्टींग अभियान हाती घ्यावे अशी सुचना केल्या. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घेऊन याबाबत उपाययोजन करण्यासाठी ठोस पाऊले उचलावी अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केले. बैठकीच्या सुरुवातीत केंद्र शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.