घारोळा सोसायटीत सलग पाचव्यांदा
चेअरमनपदी प्रदीप जाधव बिनविरोध
…..
वडवळ नागनाथ: चाकूर तालुक्यातील घारोळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सलग पाचव्यांदा प्रदीप नारायणराव जाधव यांची, तर व्हाईस चेअरमनपदी कल्याण वाळीव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
घारोळा येथे सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीसाठी बुधवारी (दिं.१५) सर्व नुतन संचालकाची बैठक घेण्यात आली. यावेळी चेअरमनपदासाठी प्रदीप जाधव तर व्हाईस चेअरमनपदासाठी कल्याण शिंदे यांचेच अर्ज आल्याने चाकूर येथील सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डी.एम.भुसे यांनी वरील दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे घोषीत केले. निवडीनंतर चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालकांचा ग्रामस्थांच्यावतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
या बैठकीला सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान जेष्ठ संचालक नागोराव रामराव पाटील, नारायण त्रिंबकराव जाधव, निवृत्ती रामराव जाधव, रामराव वैजनाथ जाधव, निवृत्ती नारायणराव जाधव, पाशा सयदसाब सयद, भागुराम अनंता बनसोडे, जनार्दन बसप्पा सुर्यवंशी, जनाबाई सोपान तोरे, दैवशाला साहेबराव जाधव, गटसचिव विठ्ठल वाघमारे उपस्थित होते.
सोसायटीची निवडणूकही बिनविरोध होण्याची पंरपरा सलग पाचव्यांदा गावाने कायम राखली असून, गेल्या महिन्यात सोसायटीच्या तेरा जागेसाठी १६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन जणांनी अर्ज मागे घेतले तर एकाने जातीचे प्रमाणपत्र न जोडल्याने त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. यामुळे सोसायटीमध्ये बारा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.