विकासाची गंगा आणणार्या संभाजीरावांच्या पाठिशी उभे रहा-गुरूबाबा महाराज औसेकर
गुरुबाबा सांस्कृतीक सभागृहाचे उत्साहात लोकार्पण
निलंगा,-( प्रतिनिधी )- निलंगेकर परिवाराला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. माजी मुख्यमंत्रीडॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा राजकीय वारसा यशस्वीपणे पुढे चालविणारे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे 90 टक्के समाजकारण तर 10 टक्के राजकारण करतात. त्यांच्या माध्यमातून निलंगा शहरासह मतदारसंघात विकासाची गंगा आलेली असून त्यांच्या पाठिशी उभे रहावे असे आवाहन गुरुबाबा महाराज औसेकर यांनी केले आहे.
निलंगा नगरपालिकेच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या गुरुबाबा महाराज सांस्कृतीक सभागृहाचे लोकार्पण गुरुबाबा महाराज औसेकर व आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात गुरुबाबा महाराज औसेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गहिनीनाथ महाराज औसेकर, गोरख महाराज औसेकर, खा.सुधाकर शृंगारे, भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगरध्यक्ष मनोज कोळ्ळे, निलंगा भाजपाचे शहराध्यक्ष अॅड. विरभद्र स्वामी, प.स.सभापती राधा बिराजदार, माजी जि.प. अध्यक्ष पंडीत धुमाळ, सय्यद युसुफजानी कादरी, किरण उटगे, अशोक चिंते, अॅड. शाम कुलकर्णी, लिंबन रेशमे, शिवाजी रेशमे आदींसह नगरसेवक, पदाधिकारी व शहरातील प्रतिष्ठीत उपस्थित होते.
गुरुबाबा महाराज औसेकर महाराज म्हणाले की, राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात काम करताना अनेकांना पदे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी केवळ आपला आणि आपल्या कुटूंंबाचा विचार करण्यातच धन्यता मानलेली आहे. मात्र आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघ हेच आपले कुटूंब समजून या कुटूंबाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपले दिलेले वचन पुर्ण केलेले असून विशेष म्हणजे हे वचन पुर्ण करीत असताना त्यांनी जास्तीता निधीचा खर्च होत आहे याकडे लक्ष न देता या सभागृहाचे काम अधिक दर्जेदार व गुणवत्तापुर्ण व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले. वास्तविक निलंगेकर परिवाराला मोठी राजकीय पार्श्वभूमी असली तरी राजकीय पदे मिळाल्यानंतरही जमीनीवरच आपली पाऊले ठेवत सर्वसामान्यांसह वंचीतांसाठी काम करण्याची आ. संभाजी पाटील निलंगेकरांची तळमळ वाखण्याजोगी आहे. आ. निलंंगेकरांनी केलेल्या कामातून जो लोकसंग्रह जमविला आहे ती त्यांची संपत्ती असून त्यांचा मिळविलेला विश्वास ही आ. निलंगेकरांची पुंजी आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांचे आर्शिवाद त्यांच्या पाठिशी कायम राहतील आणि आगामी काळातही अधिक विकास व्हावा याकरीता सर्वसामान्यांनी आपली ताकद त्यांच्या पाठिशी उभी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
विकास कामे हे सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेऊन केली असल्याचे सांगत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जनसामान्यांची सेवा करण्याची संधी या कामाच्या माध्यमातून मला मिळाली आहे. जवळ लाखो रूपये असले तरी इच्छाशक्ती नसेल तर कुठलेच काम होत नाही.परंतु येथील लाखों लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी विकास साधू शकलो आहे. धार्मीक सांप्रदायाची परंपरा आपण पुढे असेच चालू ठेवणार असून राष्ट्रीय स्तरावर भविष्यात लातूर येथे राष्ट्रीय भजन-किर्तन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आ.निलंगेकर यांनी सांगितले.
खा.सुधाकर शृंगारे म्हणाले की विकासकामासाठी निधी आणण्याचे काम निलंगेकरच करू शकतात हे दाखवून दिले असून ते निलंगेकराना कसे जमते हे न उलगडणारे कोडे आहे. सातत्याने विकास निधी आणण्यासाठी दुरदृष्टी लागते ती दुरदृष्टी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे आहे. हायवे व रेल्वे प्रश्न मार्गी लावून लातूर जिल्ह्याला देशाच्या नकाशावर आ. निलंगेकर यानी झळकविले आहे.
आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विषयी गौरवद्गार काढताना गहिनीनाथ महाराज म्हणाले धर्माचे व जनतेचे पालन करणारे संभाजी म्हणजे आ. संभाजी पाटील निलंगेकर हे आहेत. जनतेचे हित करणार्यालाच राजा म्हणतात तसेच लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून जाणारे व सर्वांगीण विकास करणार्यालाच खासदारकी आमदारकी मिळत असते, म्हणून आपण पुण्यवान आहात आपल्याला आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासारखा आमदार मिळालेला असून त्यांनी आपल्या कामातून निलंगेकर घराण्याचा नावलौकिक देश व राज्यपातळीवर नेला आहे. हा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी आ. निलंगेकरांना आगामी काळातही सर्वसामान्य जनता भरभरुन आर्शिवाद देईल असा विश्वास गहिनीनाथ महाराज यांनी यावेळी व्यक्त केला.
गुरूबाबा महाराज सांस्कृतीक सभागृहाचे लोकार्पण दिपप्रज्वलन व फित कापून करण्यात आले तत्पुर्वी टाळ मृंदागाच्या गजरात समाधी स्थळापर्यंत भजन करत शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होती. या कार्यक्रमाचे प्रास्तविक शाम कुलकर्णी यानी केले तर सुत्रसंचलन व आभार सतीश हानेगावे यानी मानले.
निलंगा शहरातील सर्वधर्मियांचे श्रद्धांस्थान असलेल्या पिरपाशा दर्गा येथे उभारण्यात आलेल्या सभागृहाचे व निजामोद्दीन दर्गा शेडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने आ. संभाजी पाटील निलंगेकरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सय्यद युसुफजानी कादरी, नसिम खतीब, नगरसेवक इरफान सय्यद, शरद पेठकर, अकमल कादरी, सय्यद कादरी, अजगर कादरी, शफोद्दिन सौदागर आदींची उपस्थिती होती.