- आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
- लातूर/प्रतिनिधी: सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असून या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवाच्या कालावधीत दुचाकी रॅलीच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसाक्षरता अभियान राबवणार आहोत.या माध्यमातून १३५० गणेश मंडळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
माहिती देताना आ. निलंगेकर म्हणाले की, लातूर जिल्ह्यावर पाण्याच्या बाबतीत कायमच अन्याय झालेला आहे.वास्तवात प्रति माणसी १३५ ते १४० लिटर पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. पण जिल्ह्यातील नागरिकांना केवळ ५० ते ५५ लिटर पाणी मिळते. शेती व उद्योगांनाही पाणी मिळत नाही.हा विषय जनतेपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात आज पर्यंत ५० टक्के पाऊसही झालेला नाही.पिके हातची गेली आहेत.पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नसून भूजल पातळी खालावली आहे.यासाठी तात्कालिक उपाययोजना आवश्यक आहेत.दुरगामी उपाययोजना करण्यासाठी अधिक कालावधी लागतो. कमीतकमी काळात उपाययोजना करून जिल्ह्याला दुष्काळापासून वाचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,सांस्कृतिक सेलचे प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे,प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव,युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश गोमसाळे,अजित पाटील कव्हेकर,डॉ. लालासाहेब देशमुख,
उदय पाटील,महेश कौळखेरे आदींची उपस्थिती होती. चौकट १ ….
१ हजार युवकांचा
रॅलीत सहभाग ….
दि.१९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जलसाक्षरता रॅली पोहोचणार आहे.निलंगा येथून या रॅलीस प्रारंभ होणार आहे.शिरूर अनंतपाळ,देवणी,उदगीर, अहमदपूर,लातूर ग्रामीण, औसा या मतदारसंघातून प्रवास झाल्यानंतर लातूर शहरात रॅलीचा समारोप होणार आहे.रॅलीसाठी आजवर ५०० दुचाकी व १ हजार युवकांची नोंदणी झालेली आहे.कांही युवक खास रॅलीत सहभागी होण्यासाठी पुण्याहून येत आहेत.जिल्ह्यातील १३५० गणेश मंडळापर्यंत रॅलीच्या माध्यमातून जलप्रबोधन केले जाणार आहे.रोज १०० ते ११० किलोमीटर असा अंदाजे ८०० किलोमीटरहून अधिक प्रवास या काळात केला जाणार असल्याचे आ.निलंगेकर म्हणाले.

- मांजरा खोऱ्यात सोडावे पाणी …
समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात सोडण्याचा निर्णय शासकीय पातळीवर घेण्यात आलेला आहे.हे पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात सोडावे,अशी आपली मागणी असल्याचे आ.निलंगेकर यांनी सांगितले.गोदावरी खोऱ्यातील पाणी लातूर जिल्ह्यात पोहोचू शकत नाही.त्यामुळे मांजरा खोऱ्यातच पाणी सोडणे गरजेचे आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून त्याला आपला विरोध आहे.या संदर्भात शासकीय पातळीवर योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना केलेल्या असल्याचेही आ.निलंगेकर यांनी सांगितले.
अराजकीय चळवळ …
जलसक्षरता अभियान ही राजकीय चळवळ नाही.जिल्ह्यातील एक सामान्य नागरिक म्हणून आपण हे अभियान राबवित असल्याचेही आ.
निलंगेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना सांगितले.