सतराशे आशा वर्कर ना सेफ्टी किटचे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते वाटप…
लातूर,-( प्रतिनिधी )-अतिशय तुटपुंज्या वेतनावर ग्रामीण भागातील कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर भगिनी यांनी कोरोणा काळात अतिशय प्रभावीपणे काम केले आहे, बाहेरून आलेल्या नागरिकांच्या नोंदी ठेवून, कोणास कोरोना ची लक्षणे असतील तर तात्काळ संपर्क करून त्यांचे ऑक्सिजन आणि तापमान तपासणी करणे, मोहिमेत नोंदणी करणे , इथपासून ते मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीचे यशस्वीपणे पालन करत आपल्या कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर भगिनींना ऑक्सफाम इंडिया या कंपनीच्या माध्यमातून सेफ्टी किट चे वाटप जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करत आहोत असे उद्गार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी काढले.
यावेळी पुढे बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले की, आपल्या जीवावर उदार होऊन ग्रामीण भागातील सर्व नोंदी ठेवत असताना आशा वर्कर यांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी याकरता या सेफ्टी किट चे वाटप जिल्हाभरातील सतराशे आशा वर्कर भगिनींना करण्यात येणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात आता या किटचे वाटप करत आहोत.
राज्य शासनाने आशा वर्कर यांच्या मानधनात वाढ करावी असा ठरावही लातूर जिल्हा परिषदेने घेतला असून तो राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. या किट वाटप कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, कृषी व पशुसवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे,मा. समाजकल्याण सभापती संजय दोरवे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे,ऑक्सफॅम इंडिया चे परमेश्वर पाटील, पंडित सुकणीकर,आदींसह पंचायत विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आशा वर्कर यांना सेफ्टी किट चे वाटप करण्यात आले.