वर्षभर योग करणे आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक…
– डॉ. विलास सपकाळ
एमजीएममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
छत्रपती संभाजीनगर, दि. २१ : जगभरात आज ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा विचार घेऊन नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत असून आरोग्यदायी जीवनासाठी योग एक दिवस न करता तो वर्षभर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी यावेळी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या योग विज्ञान विभागाच्या वतीने आयोजित ‘योग उत्सव कार्यक्रम’ विद्यापीठाच्या जेएनईसी लॉन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्री. सपकाळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, अनुराधाताई कदम, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पतंजली योग समितीच्या श्रीमती मंजुषा शुक्ला, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.खैरे म्हणाले, गेल्या नऊ वर्षापासून एमजीएम विद्यापीठ आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करीत आले आहे. जगभरात आज स्वामी रामदेवबाबा यांच्यामुळे योगाचा प्रसार आणि प्रचार झालेला आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी योग करणे गरजेचे असून ‘योग उत्सव’ हा उपक्रम सर्वांना आदर्शवत असा आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस या वर्षीसुद्धा योग विज्ञान विभाग, एमजीएम विद्यापीठ, शिवसेना छत्रपती संभाजीनगर, पतंजली योग समिती, एमजीएम रेडिओ व अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आयुष्य मंत्रालय भारत सरकार द्वारा सूचित पूरक हालचाली, योगासने, प्राणायाम व ध्यान यांचा सराव योग शिक्षक गंगाप्रसाद खरात यांनी करून घेतला. यामध्ये श्री. खरात यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. आज झालेल्या या प्रशिक्षण वर्गामध्ये आयुष्य मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे दिलेल्या मार्गदर्शन सुचनानुसार एक तासांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये सूक्ष्म आसणे, योगासने, ध्यान, प्राणायाम आदींचा समावेश होता. तसेच यावेळी सहभागी योग साधकांना मान्यवरांच्या हस्ते आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून प्राप्त सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
—