पर्यटनासाठी उजनी‘च्या प्रदूषणमुक्तीची गरज
धरणात रोज जमा होतो शेकडो टन मैला
रासायनिक सांडपाण्याने प्रचंड जल प्रदूषण
रजनीश जोशी
देशविदेशातील पर्य़टकांना आकर्षित करण्यासाठी उजनी धरण पर्यटन विकास करताना धरणाची आजची स्थिती ध्यानात लक्षात घेणे गरजेचे आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातून विविध नद्यांद्वारे भीमेवाटे उजनी धरणात रोज १३५.४८ टन मैला आणि विविध कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी जमा होते.
उजनी धरण परिसर निसर्गरम्य आहे, ही गोष्ट खरी आहे. विविध हंगामात अनेक परदेशी पक्षी येथे येतात. या परिसराचे पर्यटन स्थळात रूपांतर कसे करता येईल हे ठरवणाऱ्या आराखड्यासाठी सुमारे दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहेत. तथापि, लोअर भीमा क्षेत्रात म्हणजे धरणाच्या काठावर असलेल्या करमाळा, माढा, इंदापूर तालुक्यातील अनेक गावकऱ्यांना धरणातील प्रदूषित पाण्यामुळे जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

अप्पर भीमा क्षेत्रातील म्हणजे उजनी धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या पुणे व पिंपरी चिंचवड जिल्ह्यातून रोज सुमारे १८०० दशलक्ष लिटर सांडपाणी विविध उपनद्यांद्वारे भीमा नदीत सोडले जाते. त्यातील ६९७ दशलक्ष लिटर पाण्यावर शुद्धिकरणाची प्रक्रिया केली जाते. उर्वरित ५४१ दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया न करताच पात्रात सोडले जाते. त्यातून १ लाख ३५ हजार ४८० किलो म्हणजे १३५.४८ टन मैला (सेंद्रिय भार) जमा होतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणातूनच हे सिद्ध झाले आहे. असे असताना उजनी धरणातील पर्यटन आराखड्यासाठीच्या निधीचा फायदा कुणाला होणार, अशी विचारणा गावकरी करीत आहेत.
पुणे शहरातील मुळा-मुठेसह पवना, इंद्रायणी, कुकडी, भामा, घोड या सगळ्याच नद्या कमी-अधिक प्रमाणात नदीकाठच्या गावांतील मैला आणि उद्योगांमधील रासायनिक सांडपाणी भीमा नदीत आणून सोडत असतात. कारण या सगळ्या नद्यांचा विविध मार्गांनी भीमेशी संबंध आला आहे. त्यामुळे प्रदूषित रासायनिक पाणी, मैला, सांडपाणी संबंधित नद्यांमध्ये पोचण्याआधी त्यावर प्रक्रियेची गरज आहे.
०००

उजनी पर्यटन क्षेत्र गरजेचेच
सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर आणण्यासाठी उजनी धरण पर्यटन क्षेत्र होणे गरजेचे आहेच. तथापि, ते होण्याआधी त्यातील मुख्य अडसर दूर करण्याची गरज आहे. तसे न करता केवळ आराखडा मांडण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करणे ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक होईल.
०००