औसा ; ( राम कांबळे यांजकडून )
मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी प्रत्येकाला ईश्वराची भक्ती आणि अध्यात्माची ओढ असणे गरजेचे आहे. ईश्वर भक्ती आणि अध्यात्माची ओढ हाच मानवी जीवनाच्या कल्याणाचा राजमार्ग आहे असे प्रतिपादन श्रीक्षेत्र काशी जगद्गुरु श्री श्री 1008 मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. औसा येथील वीरशैव समाज बांधवांच्या वतीने श्री क्षेत्र काशी जगद्गुरु यांच्या नियुक्ती बद्दल अड्ड पालखी मिरवणूक सोहळा व गौरव समारंभा नंतर धर्मसभेला संबोधित करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना काशी जगद्गुरु म्हणाले होटगी मठाचे आमचे मार्गदर्शक आणि हिरेमठ संस्थांचे गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच हिरेमठ संस्थानचे मार्गदर्शक षब्र 108 डॉ श्री शांत वीर शिवाचार्य महाराज यांच्या प्रयत्नामुळे श्री काशी क्षेत्राच्या जगद्गुरु पदावर विराजमान करण्याचा सन्मान डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिला. हिरेमठ संस्थानच्या माध्यमातून दरवर्षी शिवदीक्षा सोहळ्याच्या माध्यमातून हजारो भाविकांना धर्माची शिकवण दिली जाते. त्यामुळे औसा येथील हिरेमठ संस्थान च्या या कार्याने आपण प्रभावित झालो आहोत. हिरेमठ संस्थान हे भक्तगणांना ज्ञानअमृत देणारे आध्यात्मिक शक्ती केंद्र आहे. असे सांगून संस्थांच्या धार्मिक व आध्यात्मिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.
प्रारंभी लातूरवेस हनुमान मंदिर येथून शेकडो महिलांनी डोक्यावर अमलत अमृत कलश घेऊन तसेच महिला भजनी मंडळ व पुरुष भजनी मंडळाने हर्ष उल्हास यामध्ये काशी जगद्गुरु यांच्या अड्ड पालखी मिरवणुकी मध्ये उत्साह भरला होता. यावेळी जिंतूर येथील षब्र 108 श्री अमृतेश्वर महाराज व डॉ शांतवीर शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाचन झाले. संस्थानचे पिठाधिपती बाल तपस्वी ष ब्र 108 श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांनी धर्मसभेचा संबोधित करताना भक्तगणांनी आत्मकृपा गुरुकृपा ईश्वर कृपा आणि शास्त्रकृतीच्या माध्यमातून आपली प्रगती करावी असे आवाहन केले. हिरेमठ संस्थान येथे आयोजित धर्मसभेला लातूर, निलंगा, उदगीर, औसा, लोहारा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यासह अनेक गावातून हजारो शिष्यगण महिला पुरुष व युवक उपस्थित होते.
अत्यंत थोड्या वेळामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करून भव्य दिव्य गौरव सोहळा आयोजित केल्याबद्दल श्रीक्षेत्र काशी पिठाचे जगद्गुरु यांनी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, व वैजनाथ इळेकर तसेच महाप्रसादाचे अन्नदाते बाबू आप्पा उटगे व वीरशैव युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज हलकुडे यांनी केले.