निलंगा हा शेतकरी उत्पन्न वाढीसाठी काम करणारा महाराष्ट्रातील एकमेव तालुका
- माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर.
निलंगा (प्रतिनिधी ):
शेतीमधील प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्याला विद्यापीठात जावे लागते परंतु विद्यापीठातील व कृषी खात्यातील तज्ञ मंडळींना शेतकऱ्यापर्यंत आणण्याचे काम आपण केले आहे.समृद्ध शेतकरी अभियानातून निलंगा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याचे किमान पाच क्विंटल उत्पन्न वाढले तर साडेतीनशे कोटीचे उत्पन्न वाढणार आहे. आम्ही लोकहितासाठी काम करतो,लोकप्रियतेसाठी नाही,असे प्रतिपादन करून माजी मंत्री आ.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
निलंगा हा महाराष्ट्रातील एकमेव तालुका आहे की जेथे समृद्ध शेतकरी अभियानातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केला जातो,असेही ते म्हणाले.
दि.२ जून रोजी निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून, कृषी खात्यामार्फत समृद्ध शेतकरी अभियान व भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर बोलत होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी शास्त्रज्ञ प्रा. अरुण गुट्टे,वनस्पती कीटक शास्त्रज्ञ संदीप देशमुख,उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, आर एस पाटील,तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांची उपस्थिती होती.भाजपा प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, चेअरमन दगडू सोळुंके,माजी जि प उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे,उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार गणेश जाधव,गट विकास अधिकारी अमोल ताकभाते,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, संतोष वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की,यंदाच्या खरिप हंगामात सोयाबीन उत्पादनात सर्वाधिक उत्पन्न काढणाऱ्या तालुक्यातील शंभर शेतकऱ्यांचा महाराष्ट्र शासनाच्या कृषीभुषण पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार देऊन आपण सन्मान करणार आहोत.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे इतिहासात कधी नाही एवढे हाल कारखानदारानी केले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आपल्या भागाला समतोल देणारे एकमेव पीक सोयाबीन असून त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी आगामी पंधरा दिवसात कृषी कर्मचारी व तज्ञ शेतकऱ्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले.
कृषी संशोधक प्रा. अरूण गुट्टे यांनी बि.बि.एफ . पेरणी यंत्राचा सर्वाधिक शेतकऱ्यांनी वापर करण्याव्हे अवाहन करून सोयाबीन उत्पादन वाढीच्या पंचसुत्रीचा अवलंब करावा असे सांगितले. संदीप देशमुख यांनी कीड नियंत्रण सोयाबीनच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातीची माहीती दिली. प्रास्तविक तालुका कृषी आधिकारी राजेंद्र काळे यांनी केले तर आभार मंडळ कृषी आधिकारी हणमंत पाटील यांनी मानले.
यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.