महाविकास आघाडी सरकार नसून तर बांद्रा-बारामती सरकार-आ. संभाजी पाटील निलंगेकर
शिरुर अनंतपाळ/प्रतिनिधी:राज्यातील सरकार शेतकरी व मराठवाडा विरोधी आहे. सामान्य नागरिकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत.राज्यात कार्यरत असणारे सरकार हे महाविकास आघाडी नव्हे तर बांद्रा-बारामती विकास आघाडी सरकार असल्याची टीका आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिघोळ, साकोळ,सुमठाणा येथील विविध विकास कामे व अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या लोकार्पण समारंभात आ.निलंगेकर बोलत होते.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे,उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळुंके,कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे,माजी उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रामचंद्र तिरुके,जि.प.सदस्य व संघटन सरचिटणीस संजय दोरवे,शिरूर अनंतपाळ पं.स.सभापती डॉ.नरेश चलमले, शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील ,माजी आमदार राम गुंडिले,प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयश्री पाटील,पं.स.सदस्या वर्षा भिक्का,चेअरमन दगडू साळुंके,माजी जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश बिराजदार,
भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले,माजी सभापती बापुसाहेब राठोड,नागेश चलमले, यांची यावेळी उपस्थिती होती.
राज्य सरकारवर टीका करताना आ.निलंगेकर म्हणाले की,शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून या सरकारची स्थापना झालेली आहे.दोघेही केवळ आपापल्या मतदारसंघाचा व आपल्या भागाचा विकास करून घेण्यात मश्गुल आहेत. राज्यातील जनतेशी या सरकारला कसलेही देणे-घेणे नाही.सलग दुसऱ्या वर्षी राज्यातील शेतकरी संकटात आहे पण सरकारकडून मदत केली जात नाही.गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सरकारने भरपाई दिली नाही.यंदा मराठवाड्यातील अडीचशेहून अधिक मंडळात अतिवृष्टी झाली.त्यालाही मदत मिळाली नाही.पीकविमा मिळत नाही.यामुळे हे कुचकामी सरकार आहे. राज्याच्या विविध भागांच्या विकासासाठी सरकार मदत देत असते पण मराठवाड्याच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. नुकसानीची पाहणी करताना हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करणाऱ्या सरकारने पीकविमाही दिलेला नाही,असे ते म्हणाले.
सरकारकडून केवळ आश्वासनेच दिली जातात वास्तविक कामे होतच नाहीत.विशिष्ट विभागाचा विकास करण्यासाठी सरकार काम करत आहे.शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर पंचनाम्याचे देखावे केले जात आहेत.मदत करण्याऐवजीe काहीतरी बोलून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही आ. निलंगेकर यांनी केला.
या दौऱ्यात मतदारसंघातील विविध भागांची पाहणी,विकास कामांचे लोकार्पण आ. निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.ठिकठिकाणी त्यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवादही साधला .