आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने….
८० गावांमधील समाजमंदिर दुरुस्ती व सुशोभीकरण कामांसाठी ४ कोटींचा निधी…
औसा – औसा विधानसभा मतदार संघातील सर्व समाज मंदिराची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याची आवश्यकता पाहाता आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे औसा मतदारसंघातील ८० गावांमधील समाजमंदिर दुरुस्ती व सुशोभीकरण कामांसाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांना मतदारसंघातील दौऱ्यात अनेक ठिकाणी समाज मंदिराची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आले.याबाबत स्थानिक नागरिकांकडूनही या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत असल्याने मतदारसंघातील संपूर्ण गावातील समाज मंदिराची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने त्यांनी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पाठपुरावा करून यासाठी निधीची मागणी केली होती.यानुसार पहिल्या टप्प्यात औसा विधानसभा मतदारसंघातील ८० गावांमधील समाजमंदिर दुरुस्ती व सुशोभीकरण कामांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून मतदार संघातील नादुरुस्त झालेल्या व वापरात नसलेल्या समाजमंदिरांची दुरुस्ती व रंगरंगोटी करुन, तिथे वृक्षलागवड करून तसेच तिथे लाईट, बैठक व्यवस्था, कंपाऊंड वॉल व पेव्हर ब्लॉक इ सुविधांची निर्मिती करून समाजमंदिरांचा प्रार्थना स्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे.सदरील निधी मंजूर केल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.
उर्वरित गावांनाही लवकरच निधी….
संपुर्ण मतदारसंघातील समाज मंदिर दुरुस्ती व सुशोभीकरण कामांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या टप्प्यात मतदारसंघातील ८० गावांमध्ये हा निधी देण्यात आला असून पुढच्या टप्प्यात उर्वरित सर्वच गावांसाठी या योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे.
…….