अध्यात्मिक-सामाजिक-राजकीय-चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या हस्ते आज आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन
लातूर ;दि.२४( वृत्तसेवा)— आज लातूर येथील पहिल्या किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे समाजातील सर्व स्तरातील नामांकितांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील असलेल्या नामांकित सुप्रसिद्ध किडनी तज्ञ डॉ.प्रमोद प्रभू घुगे यांच्या आंबेजोगाई रोड लागत जुन्या रेणापूर नाक्यावरील यशोदा सिनेमागृहासमोरील बसस्थानक क्रमांक – 2 च्या शेजारील लातूर येथील एकमेव अशा भव्य-दिव्य हॉस्पिटलचे आज दिनांक 25/02/24 – रविवार रोजी संध्याकाळी ठीक 4.00 ते रात्री 10.00 वाजेच्या दरम्यान विविध रंगतदार कार्यक्रमांसह स्नेहभोजनाच्या दर्जेदार मेजवानीसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून या दैदिप्यमान सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.श्री.डॉ. भागवतरावजी कराड यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून लातूर येथील सहकार महर्षी तथा माजी राज्यमंत्री श्री.दिलीपरावजी देशमुख उपस्थित राहणार आहेत.

तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेते श्री.मकरंदजी अनासपुरे यांच्यासह डॉ.सुधीरजी निकम हे लाभलेले असून प्रमुख उपस्थितीत राज्याचे आरोग्यमंत्री मा.ना.श्री.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, लातूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री मा.ना.श्री.गिरीशजी महाजन, बीडचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री मा.ना.श्री धनंजयजी मुंडे, क्रीडामंत्री मा.ना.श्री.संजयजी बनसोडे, न्यूज-18 लोकमतचे सहसंपादक श्री. विलासजी बडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष श्री. वसंतरावजी मुंडे यांच्यासह अनेक आजी-माजी खासदार-आमदार मंडळींची उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी आवर्जून ह.भ.प. सद्गुरु श्री.गहिनीनाथ औसेकर महाराज, भगवानगडाचे महंत ह.भ.प. डॉ.नामदेव शास्त्री महाराज, अणदुरचे शिवयोगी शिवाचार्य महाराज यांच्यासह शिक्षण महर्षी प्रा.डॉ. विश्वनाथरावजी कराड यांचे शुभाशीर्वाद लाभलेले आहेत.

या अनोख्या अशा भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्यास लातूरसह भोवतालच्या बीड-धाराशीव-परभणी जिल्ह्यासह पंचक्रोशीतून मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित राहणार असून दुरदुर पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना-पॅथींच्या बहुसंख्य डॉक्टर मंडळींची उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाला आणि या एकमेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला पाहण्यासाठी या सोहळ्याच्या अनुषंगाने सर्वांनी हेच आमंत्रण-निमंत्रण समजून या उद्घाटन सोहळ्यास यावे असे आवाहन आयकॉनचे संचालक दाम्पत्य डॉ. प्रमोद घुगे व डॉ.सौ.प्रतिभा प्रमोद घुगे यांच्यासह संपुर्ण घुगे-केंद्रे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे….!