26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*आ. संभाजी पाटील यांच्या पुढाकारातून घरणी प्रकल्प होणार गाळमुक्त*

*आ. संभाजी पाटील यांच्या पुढाकारातून घरणी प्रकल्प होणार गाळमुक्त*


राज्यातील पहिल्याच प्रयोगाने वाढणार पाण्याची उपलब्धता
लातूर/प्रतिनिधीः– निलंगा मतदार संघाअंतर्गत असलेल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घरणी प्रकल्प गाळमुक्त करण्यासाठी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेतलेला आहे. जिल्ह्यासह राज्यात असलेल्या विविध पाणीप्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी होऊ लागलेली असून त्याचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह सिंचन क्षेत्रावरही होऊ लागला आहे. त्यामुळेच राज्यात प्रथमच सामाजीक संघटनेच्या सहकार्यातून आणि जिल्हा पाटबंधारे विभागाच्या मदतीने घरणी प्रकल्प गाळमुक्त करण्याचे नियोजन होत आहे. घरणी प्रकल्प गाळमुक्त झाल्यास पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होऊन पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीसुध्दा पाणी उपलब्ध होणार आहे. हा प्रयोग राज्यासाठी पथदर्शी ठरून राज्यभरातील विविध प्रकल्प गाळमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे.

वातावरणातील बदल आणि पर्यावरणाचा होणारा र्हास यामुळे पर्जन्यमानही दिवसेंदिवस कमी होऊ लागलेले आहे. पर्जन्यमान्याद्वारे उपलब्ध होणारे पाणी जलसाठ्यांमध्ये जमा करण्यात येते मात्र गेल्या अनेक वर्षापासून या जलसाठ्यांमध्ये गाळ निर्मिती होऊन त्यामध्ये दिवसेंदिवस भर पडू लागलेली आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शेतीसाठीही पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. राज्यातील जलसाठे गाळमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील असलेतरी यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. निधी योग्य प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने जलसाठे गाळमुक्त होण्यास मोठा विलंब लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदार संघात असलेल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घरणी प्रकल्प गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. याबाबत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी काही सामाजीक संघटनांशी चर्चा करून प्रकल्प गाळमुक्त करण्यासाठी आपण योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. तसेच याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या संकल्पनेबाबत चर्चा करून कमीत कमी खर्चात प्रकल्प गाळमुक्त करण्यासाठी आम्ही असा प्रयोग करीत असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मकता दाखविल्यानंतर आ. निलंगेकर यांनी जिल्हा पाटबंधारे विभागाच्या मदतीने हा प्रयोग राबविण्यास सुरुवात केलेली आहे.

घरणी मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून शिरुर अनंतपाळ व चाकूर शहरासह 12 खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येते. त्याचबरोबर या प्रकल्पातून पाण्याचा शेतीसाठी आणि सिंचनाकरीताही मोठा फायदा होईल. सदर प्रकल्प गाळमुक्त करण्यासाठी ड्रोन आणि बाथिमेट्रिक सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले असून यामुळे प्रकल्पात कितपत गाळ जमा आहे, याची अचुक माहिती प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने त्या गावाचे निराकारण होऊन प्रकल्पातील जलसाठ्याची क्षमता मोठ्या प्रमाणात होणार आहे. विशेष म्हणजे याकरीता कमीत कमी खर्च होणार असल्याने मोठा आर्थिक भारही सहन करावा लागणार नाही. एएम दत्ता लॉब प्रा.लि.या खाजगी कंपनीच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मदतीने हा प्रयोग पूर्ण होणार आहे. यामुळे प्रकल्प निश्चितच गाळमुक्त होईल, असा विश्वास पाटबंधारे विभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. प्रकल्प गाळमुक्त झाल्यास शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच अतिवृष्टी झाल्यास संभाव्य पुराचा धोकाही होणार नाही. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा पुढाकार आमच्यासाठी आत्मविश्वास वाढविणारा असल्याचे सांगून हा प्रयोग राज्यात प्रथमच होत असल्याचे जलसंपदा विभागाचे उपअभियंता मुगे यांनी सांगितलेले आहे. याकरीता खाजगी कंपनीचे आदित्य हिंगणे, प्रमोद वशीवाले, गजानन पाटील, अथर्व पवार, संपत पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता चिस्ती, कार्यकारी अभियंता रोहित जगताप व त्यांचे सहकारी आपले योगदान देत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यासाठी तो पथदर्शी ठरेल आणि राज्यातील जलसाठे गाळमुक्त करण्यासाठी हा निलंगा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवला जाईल, असा विश्वासही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]