*आ.प्रकाश आवाडे यांच्या मागणीचा साकल्याने विचार*

0
414


इचलकरंजी/प्रतिनिधी –
इचलकरंजीमध्ये श्री मूर्तींचे विसर्जन हे पंचगंगा नदीतच करण्यास परवानगी मिळण्यासंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना आदेश जारी केले आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात श्री मूर्तींचे विसर्जन हे पंचगंगा नदीतच करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


यंदा इचलकरंजी महापालिकेच्या वतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तीचे विसर्जन शहापूर खणीत करण्याचे नियोजन केले आहे. त्याला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी काल मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पंचगंगा नदीत विसर्जन करण्यास परवानगी मिळण्याबाबतचे निवेदन दिले.
निवेदनात, इचलकरंजी शहर व परिसरात पूर्वपरंपरेनुसार घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीतच केले जात होते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे शासनाने सण-उत्सवांवर शासनाने निर्बंध घातले होते. त्यानुसार सर्वांनी प्रशासनास सहकार्य केले. या काळात छोट्या गणेश मूर्तीचे बंधन असल्याने त्याचे विसर्जन शहरातील विविध भागातील सार्वजनिक जलकुंड व शहापूर खणीत करण्यात आले. यंदा राज्य शासनाने श्री मूर्ती उंचीची मर्यादा हटविण्यासह मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यास परवानगी दिल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

इचलकरंजी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) ते नदीवेस पर्यंत विसर्जनाचा मुख्य मार्ग असल्यामुळे पंचगंगा नदीतच गणपती विसर्जन करणे सर्वांच्या सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे घरगुती व सार्वजकि मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीतच करण्यास परवानगी द्यावी असे सांगितले.
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती जाणून घेत तातडीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना पंचगंगा नदीत श्री मूर्ती विसर्जनास परवानगी देण्याबाबतचे आदेश पारीत केल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here