*आजचा शिक्षक दिन काही वेगळाच होता.*
कोविडच्या संकटाने अनेकांचे नुकसान झाले. लहान मुलांचे बालपण करपून जात होते. आधी कोविडची दहशत. मुक्तपणे आनंद लुटण्याचे हे वय. मनमुरादपणे आपल्या मित्रांच्या सोबत दंगा करत जीवन जिवंत अनुभवातून समृद्ध करण्याचे हे वय. *शाळा बंद आणि शिक्षण चालू* या गोंडस वाक्याच्या पार्श्वभूमीवर मुलं मोबाईल च्या विळख्यात अडकली.
खरं तर अशा परिस्थितीत धाडसाने मुलांना आधार देत शिकते करणारे शिक्षक गरजेचे होते. भोवताल इतक्या दहशतीचे ग्रस्त होता की कुणाचे असे धाडस करण्याची हिंमत पण नव्हती. कित्येक महिने शांत बसल्यावर प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी मात्र काही तरी करण्याचे ठरवले. *शिक्षक दिनाचे औचित्य साधून हिमतीने निसर्गाच्या मुक्त सहवासात शालेय मुलांचे शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला.* पालक मुलांना पाठवतील का ? अशी मनात शंका होती. काही पालक मात्र आमच्या पेक्षा जास्त धाडसी निघाले. काल रात्री प्रचंड पाऊस झाला. शिबिराचे स्थळ विवेकवाडीच्या ऐवजी अंबाजोगाई घ्यावे असा विचार मनात होता.
“नाही दादा !! विवेकवाडीतील शिबीर काही औरच असणार. आपण अंबाजोगाई नाही घ्यायचे.” माझ्या पेक्षा अधिक धाडसी राम शेप फारच निग्रहाने मला म्हणाला.
प्रत्यक्ष मुलं आल्यावर मी त्यांना विचारले, ” प्रचंड पाऊस झाला आहे. गाडी चिखलात फसू शकते. पाऊस परत जोरात आला तर आपण अडकून पडू…”
मी असे भीतीचे चित्र मुलांच्या समोर उभे केले.
“अजिबात नाही अंबाजोगाई शिबिर घ्यायचे. शिबिर विवेकवाडीतच होणार. आम्ही नाही भीत…” अगदीच दुसरीतील श्रीरंग पासून सर्वांनीच निर्धाराणे मला आपला निश्चय सांगितला.
*आत्मविश्वास असणारे प्रबोधक बांधव सोबत असताना मग कशाची भीती.* आम्ही सर्वांनी विवेकवाडीकडे कूच केली.
विवेकवाडीचा आसमंत देशभक्ती पर गीतांनी निनादु लागला. भरपूर सारे गटकार्य,सांघिक खेळ,निर्सगाच्या सहवासात अंगतपंगत आणि मग मुक्तपणे झाडांवर खेळण्याचा आनंद.
नयन सुरवातीला थोडा शांत वाटत होता. समूहात राहण्याची सवयच त्याची मोडलेली. काही काळातच तो सुसाट मोकळा झाला. मोबाईलच्या विश्वात अडकलेला मल्हार आज निर्सगाच्या जैव्य विविधता समजून घेताना हरपून गेला होता.
सांघिक खेळात तर खऱ्या अर्थाने उत्साहाचे उधाण आले. काड्यांचा बुद्धिबळ खेळताना तर मुलं भान हरपून गेली.
*आपल्यात असणाऱ्या अभिजात पूर्णत्वाचे प्रगटी करण म्हणजे शिक्षण.* ह्या स्वामी विवेकानंदाच्या वाक्याची पूर्ण प्रचिती येत होती. शिक्षक केवळ उत्प्रेरक म्हणून कामाचा.
*संपर्क,सहवास आणि सामूहिक कृतीतून शिक्षण हे जवळपास दिड वर्षाने अनुभवले.* धाडसी प्रबोधक,पालक व विद्यार्थी यांच्या सोबत *निर्भयतेचा संस्कार स्वतःवर करून घेणारा आजचा शिक्षक दिन काही वेगळाच होता.*