वाढदिवस विशेष
उपेक्षितांचा नेता, गोरगरीबांचा कैवारी जिल्ह्यातील सत्ताधिश व लब्ध प्रतिष्ठीतांच्या विरुद्ध मागील २५ वर्षापासून शड्डू ठोकून ताठ मानेने वावरणारा एकमेव नेता म्हणजे आ. रमेशअप्पा कराड. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाच्या मुशीतून तयार झालेला एक सामान्य कार्यकर्ता, कधीही निष्ठा न विकणारा कार्यकर्ता म्हणजे रमेशअप्पा कराड. आज बरेच पुढारी त्यांना राजकीय जन्म देणार्या नेत्यांना विसरुन गेले व वेगवेगळ्या चुलीवर आपली राजकीय पोळी शेकून घेत असल्याचे दिसते, काहीतर आपल्या नेत्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून राजकीय नेतृत्व बदलत आपले राजकीय संसार थाटून राजकीय दुकान चालवताना दिसतात. परंतु आजही आ. रमेशअप्पा कराड हे त्यांचे राजकीय गुरु स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्मरण केल्याशिवाय कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमास सामोरे जात नाहीत. अशा नेत्याचा मा. आ. रमेशअप्पा कराड तथा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी लातूर यांचा आज वाढदिवस.
वास्तविकत: आ. रमेशअप्पा कराड यांचा जन्म एका समृद्ध अशा वारकरी कुटुंबात मौजे रामेश्वर ता. लातूर येथे आई स्व. कौसल्या व वडिल काशिराम (नाना) कराड यांच्या पोटी दि.३० मे १९६७ रोजी झाला. लहानपणीच आईचे छत्र हरवले. परंतु वै. पुर्णब्रम्ह योगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड (आत्या) यांच्या सानिध्यात आप्पांच बालपण गेलं. आप्पा हे त्यांच्या भावंडातील जेष्ठ पुत्र होत. जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे आदरणीय काका प्रा. डॉ. विश्वनाथ दादाराव कराड यांच्या सहवासात व संस्कारात आप्पांची वाढ झाली आणि त्या वारकरी, दानी कुटुंबीयांकडून आप्पांना लहानपणापासून त्यागाची, सामाजिक कामाची शिकवण मिळाली व ती शिकवण त्यांनी कायम अंगीकारली. आप्पांनी त्यांचे शालेय शिक्षण तसेच पदवी पर्यंतचे शिक्षण हे रामेश्वर तथा पुणे येथे घेतले. पुणे येथे शिक्षण घेत असतानाही गावाकडची नाळ आप्पांनी कधीही तुटू दिली नाही, त्यामूळे शेतात काम करणे, स्व:त औत धरणे, दारे धरणे, ट्रक्टरद्वारे शेत नांगरणे, दुध काढणे इत्यादी सर्व शेतीची कामे आप्पांनी स्व:त केली आहेत. इतकच नव्हे तर आप्पांनी स्व:त दुधाचा व्यवसायही केलेला आहे, त्यामूळे त्यांना शेतीतील प्रत्येक गोष्टीची त्यातील बारकाव्यासह माहिती आहे. रमेशअप्पा राजकारणात आले नसते तर ते एक उत्कृष्ट शेतकरी झाले असते. परंतु पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामेश्वर येथे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी देण्यात आली. काकांचा आदेश सिरसावज्ञ मानून आप्पांनी त्या ठिकाणी त्यांचे शैक्षणिक कार्य चालू केले.
नंतरच्या काळात आप्पांवर लातूर येथिल वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय उभारणीची जबाबदारी सोपविण्यात आली व ती जबाबदारी आप्पांनी आवाहन म्हणून स्विकारली. आपण पाहतो की आप्पांच्या देखरेखीखाली अतिशय सुंदर व दिमाखदार अशी वैद्यकीय महाविद्यालयाची वास्तु दिमाखात उभी राहिलेली दिसते. त्यामूळे आजही आप्पा एखाद्या निष्णात इंजिनीअर ने सांगावे असे एखाद्या इमारतीचे डिझाईन, इलिवेशन व बांधकामासाठी लागणारा खर्च अचूक सांगताना दिसतात. नुसते मेडिकल कॉलेज उभे करुन आप्पा थांबले नाहीत तर त्यांच्या नेतृत्वात गरजुंना व परिसरातील लोकांना उत्तमातील उत्तम इलाज हा अल्प दरात उपलब्ध करुन दिला जातो. तसेच लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील एकूण ७२ हजार कुटुंबांना दत्तक घेवून पुर्णब्रम्हयोगिनी त्यागमुर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजने अंतर्गत गरजुंना त्यांच्या गावातून स्वखर्चाने आणून त्यांचा इलाज करून त्यांना घरापर्यंत पोहचविले जाते. आप्पांनी त्यांच्या अंतर्गत असणार्या संस्थांना कधीही पैसे कमावण्याचे कुरण होऊ दिले नाही.
कराड परिवारातर्फे व आदणीय प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली असे एक नाहीतर अनेक उपक्रम गोरगरीबांसाठी राबविले जातात. आजही दरवर्षी आषाढी यात्रेनिमीत्त पंढरपूरला येणार्या भाविकांसाठी वाखरी येथे सलग तीन दिवस अन्नछत्र उभे करुन अन्नदान केले जाते. तसेच हजारो लोकांची राहण्याची सोय मोफत केली जाते. एवढेच नव्हे तर आळंदी, नांदेड (वडेपुरी) येथे कराड कुटुंबीयांतर्फे बर्याच प्रसंगी अन्नछत्र चालविले जाते व या गोष्टींवर आप्पांचे बारकाईने लक्ष असते. त्यामूळे कराड कुटुबीयांचे व आ. रमेशअप्पांचे नाव महाराष्ट्रात अभिमानाने व आदराणे घेतले जाते.
आप्पा खरतर अपघाताने राजकारणात आले, राजकारणात आल्यावर आप्पांची लढत लातूरच्या सत्ताधारी साखर सम्राटाबरोबर लागली. मागील ५० वर्षापासून राजकारणात असणार्या धनदांडग्या घराण्याबरोबर लढत देणे म्हणजे थट्टा नव्हती, पाठीशी फक्त सामाजिक काम, कुटुंबाचा आधार, गोरगरीबांचा आशिर्वाद व मुंडे साहेबांसारखा नेता अशा शिदोरीवर गोरगरीब शोषित लोकांचा कैवारी म्हणून आप्पांनी एवढ्या मोठ्या राजकीय घराण्याबरोबर लढा देवून, संघर्ष करून स्वत:चा वेगळा असा ठसा निर्माण केला व गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी सतत सत्ताधार्यांच्या विरोधात संघर्ष केला व मुंडे साहेबांनी सोपवलेला रेणापूर मतदार संघ व तिथल्या गोरगरीब जनतेला एकत्र करून रेणापूर पंचायत समिती, रेणापूर नगर पंचायत, लातूर जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा रोवला व आपल्या नेत्याचे नाव उज्वल केले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा झालेला पराभव विसरुन सतत जनतेत राहून कार्यकर्त्यांना संभाळण्याचे व आधार देण्याचेकाम करत असताना जिल्ह्यात पक्ष संघटन मजबुत करुन पक्षाचे विविध कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले या सर्व कार्याची दखल घेवून पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. तसेच त्यांना विधान परिषदेवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. अशा प्रभुतीस जन्मदिनानिमीत्त परमेश्वर निरोगी व उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!
अॅड. मनोज ज्ञानोबा कराड
मु.पो.वांगदरी, ता.जि.लातूर