मृदू भाषेच्या सुमधूर शब्दांनी अतिथी समाधानी होत असेल तर अशा अस्थापनाचे वर्तमान व भवितव्य चांगलेच असते याची अनुभूती आजच्या प्रेम, जिव्हाळा आदरयुक्त भेटीने मिळाली. पिंज-यातील पाळीव बिबट्या येरझा-या घालत होता. गेली कित्येक दिवस त्याच्या अंगावर मृदू स्पर्शाचा हात फिरत नव्हता म्हणूनच आज तो अस्वस्थ होता असे मला वाटले. प्रकाश आमटे कर्करोगाने ग्रस्त होते म्हणून त्यांची व लोक बिरादरीतील पाळीव प्राण्यांची गळाभेट दुर्मिळ झाली होती म्हणूनच ते प्राणी अस्वस्थ वाटत होते असे मला जाणवले. माझ्या आयुष्यात योगायोग व भाग्य या कल्पनांना दुजोरा देणारी घटना प्रत्यक्षात उतरली म्हणून हे लिहिण्याचा प्रयत्न.
चंद्रपूर येथे जन शिक्षण संस्थान तर्फे आयोजित दोन दिवसीय क्षमता बांधणी कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून गेलो होतो. कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाला व अमोल गायकवाड व प्रकाश सायंकर यांनी हेमलकसा या श्री.प्रकाश आमटे यांच्या जगप्रसिद्ध लोक बिरादरी संस्थेला भेट देण्याचा प्रस्ताव मांडला ज्याला मी लगेच होकार दिला.
चंद्रपूर ते हेमलकसा हे १७० कि.मी. चे अंतर पार करताना एक दोन बॅचेस ना भेटी दिल्या व बरोबर २.३० वाजता हेमलकसा येथे पोचलो. पाहताक्षणीच प्रभाव पडावा असे ते नयनरम्य ठिकाण डाॅ.प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी यांच्या २३ डिसेंबर १९७३ पासूनच्या अविश्वसनीय व अजोड कार्याची पावती देत होते.
बाबा आमटे यांचे कुष्टरोग्यांचे आश्रयस्थान ‘आनंदवन’ ची ख्याती बालपणापासूनच ऐकत आलो होतो. गेल्या १०-१५ वर्षात त्यांचे चिरंजीव प्रकाश आमटे यांच्या नावासमोर हेमलकसा येथे स्थापित ‘लोक बिरादरी’ या संस्थेची महती ऐकत होतो आणि उद्या ते तीर्थक्षेत्र पाहण्याचा योग जुळून आला होता, म्हणून खुप आनंद होत होता. नुकतेच प्रकाशजींची कर्करोगाच्या दुर्धर आजाराने मुक्ती होण्यास सुरुवात झाली आहे व त्यांना विश्रांती घेण्याची डाॅक्टरांची सूचना होती. तरीसुद्धा मला व पत्नीला त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळाला हे आमचे भाग्य.
माणसांची सुश्रुषा करत असताना जखमी हिंस्र प्राण्यांची सुश्रूषा ठेवून त्या प्राण्याच्या ठायी प्रेम, जिव्हाळा निर्माण करणे यासाठी प्रकाशजी च्या रुपाने देवदूतच पृथ्वीतलावर अवतीर्ण झाला होता. त्यांची व आमची प्रत्यक्ष भेट व्हावी हा योगायोग व स्वतः प्रकाशजी, त्यांच्या सुविद्य पत्नी, डाक्टर सुपुत्र व त्यांची पत्नी (ज्या फोंड्याच्या साधले कुटुंबाच्या सुपुत्री आहेत) तसेच दुस-या सुपुत्राची पत्नी यांची भेट झाली हे आमचे भाग्य आहे याची प्रचिती आम्हाला आली.
कर्करोगाशी दोन हात करत नुकतेच केमो थेरपीच्या प्रचंड वेदनांचा छळ सहन करून शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होणारे प्रकाशजी कळीकाळावर मात करून पुढे येणारे योद्धाच म्हणावे लागतील. हेमलकसा या दुर्गम वनवासी क्षेत्रातील लोकांच्या भावभावनांशी खेळ मांडत हेमलकसा येथील त्याच वनवासी लोकांच्या सेवेसाठी, वनवासींच्या सहकार्याने आणि परिश्रमाने विदर्भातील गडचिरोली या नक्षलग्रस्त क्षेत्राचा कायापालट करणारे प्रकाशजी च्या पायी नतमस्तक होण्याचे माझ्या भाग्यात होते हेच खरे!
२३ डिसेंबर १९७३ रोजी स्थापित लोक बिरादरी प्रकल्प चा स्वयंसेवक मोहन ने स्वागत करून आमचे मन जिंकले होतेच त्याचबरोबर इतर स्वयंसेवकांचा व्यवहार सुद्धा तितकाच आनंद देणारा आहे याचा अनुभव घेतला. दुर्धर आजाराशी संघर्ष करताना सुद्धा आम्ही दूर गोव्यातून आलोय म्हटल्यावर आम्हाला भेटीसाठी वेळ देणारे प्रकाशजी खरेच चालतेबोलते समाजप्रिय समाजपुरुष आहेत याची प्रचिती आली. त्यांनी केलेल्या आवाढव्य व अविस्मरणीय कार्यासमोर आमचे जन शिक्षण संस्थान गोवा मधील कार्य हे क्षुल्लकच पण त्याची जुजबी माहिती दिली व मी सोबत ‘ अखंड भारत का आणि कसा? हे पुस्तक घेऊन गेलो होतो, तेच त्यांना सप्रेम भेट दिले. सौ. व श्री. प्रकाश आमटेंच्या चरणी आम्ही उभयता नतमस्तक झालो व या अविस्मरणीय भेटीचा आनंद चाखत पुढे मार्गस्थ झालो. जन शिक्षण संस्थान चंद्रपूर चे संचालक श्री.अमोल गायकवाड व कार्यक्रम अधिकारी श्री.प्रकाश सायंकार आणि कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
श्रीहरी आठल्ये ,गोवा