कवितेची अतिशय उत्तम समज, ती सादरीकरणातील आत्मीयता आणि आशय रसिकांपर्यंत पोचावा यासाठीचं हार्दिक आर्त दीपाली पत्की-दातार यांच्या काव्यवाचनातून भिडत होतं. महाकवी विंदा करंदीकर यांच्या कवितांचा ‘तसेच घुमते शुभ्र कबूतर’ हा मंचीय आविष्कार अक्षरशः भावोत्कट आणि कलात्मक होता. दीपालीताईंनीच याची संहिता लिहिली होती. विंदांच्या कविता समजून घेणं आणि त्यानंतर त्यांचा आविष्कार करणं ही अत्यंत कठीण गोष्ट त्यांच्या उत्कटतेमुळं श्रोतृवर्गाला खिळवून टाकणारी होती, हे या कार्यक्रमाचं मोठं वैशिष्ट्य आहे.
श्रुति विश्वकर्मा या सोलापूर सेवासदनच्या लाडक्या कन्येनं या कार्यक्रमाला संगीत आणि स्वर दिला होता. ‘मनात माझ्या उंच मनोरे उंच तयावर कबुतरखाना, शुभ्र कबुतर घुमते तेथे स्वप्नांचा खाऊनिया दाणा…’ तिच्या स्वरातून अर्थ वाहात येत होताच, ती सर्वांगानं गात होती. तिच्या मुद्रेवर आशयाचं चांदणं पडल्याचा भास होता. तिच्या गळ्यातून उमटणारे सूर तिचं गानसौंदर्य अधिक खुलवत होते. गाताना ती कविताच होऊन गेली होती आणि सुस्वराने रसिकांच्या श्रुती धन्य होत होत्या… ‘ओंजळीत स्वर तुझे’, ‘जन्माआधी जन्मे अगा माझे भय’, ‘असा मी असा मी कसा मी कळेना’… श्रुतीने गायलेल्या (आणि दीपालीसह सर्वांनीच सादर केलेल्या) या प्रत्येक कवितेबद्दल आणि तिने तिच्या समंजस गायकीतून उलगडलेल्या भावार्थाबद्दल विस्तारानंही लिहिता येईल, पण तिच्या मखमली, तलम, ताज्या टवटवीत स्वराने, त्यातील ऊर्जेने रसिक लुब्ध होऊन गेले. दीपाली आणि श्रुतीनं सादर केलेलं स्वरचित्र थक्क करणारं होतं. ही बंदिश संपूच नये असं वाटत होतं. विंदांनी हे गायन-वाचन ऐकलं असतं तर त्यांनीही या दोघींची पाठ थोपटली असती, यात अतिशयोक्ती नाही.
अनुप कुलथे यांनी केलेली व्हायोलिनची साथसंगत अप्रतिम होती. त्यांची वाद्यावरील हुकुमत आणि वादनातील सहजता, मूळ कवितेची उंची ठसवणाऱ्या पोषक जागा, कवितेच्या दोन कडव्यांमधील जागा भरून काढणारे वाद्यालाप वाखाणण्याजोगे होते. व्हायोलिनला स्वभावतः कारुण्य अधिक ठसवता येते, पण शब्दाशी संगत करताना अर्थाचे पदर उकलण्यासाठी अनुपने त्याचा अभ्यासपूर्ण वापर केला. श्रुतीचं गाणं सशास्त्र असलं तरी आशयापासून विभक्त झालेलं नव्हतं, तशीच व्हायोलिनची संगत एकजीव झालेली होती.
मुकुंद दातार यांची काव्यवाचनातील तन्मयता विलोभनीय होती. तर अक्षय वाटवे यांचा काव्यवाचनातील धीटपणा अचंबित करणारा होता.
सेवासदन संस्थेनं दिलेली शताब्दी महोत्सवाची सलामी रसिक सोलापूरकरांना अतिशय आवडली, यात शंका नाही.

- रजनीश जोशी