आमदार धिरज देशमुख यांची भावनातळवार कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वनसिंधुताई तळवार यांच्या अवयवदानामुळे तिघांना मिळाले नवे आयुष्य
लातूर : एखाद्याने अवयव दान करणे हे समोरच्या व्यक्तीसाठी नवीन जीवन ठरते. हेच कार्य सिंधुताई सिद्राम तळवार यांनी केले आहे. त्या आपल्यातून गेल्या असल्या तरी त्या अवयवरुपी आजही आपल्यात आहेत. त्यामुळेच अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे मला वाटते, अशी भावना आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी येथे व्यक्त केली. प्रत्येकाने अवयवदाता बनावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
लातूरमधील बार्शी रस्त्यावरील गायत्री नगर भागात राहणाऱ्या सिंधुताई सिद्राम तळवार (वय ६४) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी व मित्र परिवाराने अवयवदानाचा निर्णय घेऊन तीन लोकांना नवीन आयुष्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार श्री. धिरज देशमुख यांनी तळवार कुटुंबियांची व त्यांच्या मित्र परिवाराची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. शिवाय, अवयवदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांच्या धाडसी निर्णयाचे स्वागत केले.
निरोगी अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे अनेक लोक आपल्याला सोडून जातात. हे मीही माझ्या व्यक्तिगत आयुष्यात जवळून पाहिले आहे. अवयव दानामुळे इतरांचे प्राण वाचू शकतात. त्यांचे आयुष्य पुन्हा फुलू शकते. त्यामुळे मृत्यूनंतर निरोगी अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहित करणे, याबाबत आणखी जनजागृती वाढणे महत्वाचे आहे, असेही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी लातूर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, शिवराज तळवार, विनोद तळवार, वर्षा तळवार, रेखा तळवार, वैजयंती तळवार, विजय कोळी, राजेश कोळी, विलास तळवार, चंद्रकांत कोळी, अमर तळवार, ‘माझं लातूर’चे विजय माळाळे, विवेक कोळी, शरणाप्पा कोळी, संजय कोळी, रामेश्वर गिल्डा, संतोष तगडे, गणेश ढगे, गणपत शिंदे, फाजल शेख, दत्तात्रय गिरी, उमाकांत भोसले, शिवराज स्वामी आदी उपस्थित होते.—