प्रिय वि.मं.दाणेवाडीस….
कुठून सुरुवात करु....? समजतच नाही. आज तुही दुःखीच दिसलीस. नेहमीसारखं स्वागत नाही केलेस. चेहरा पडलेलाच होता. पटकन निघणारी कुलपं आज रुसून बसली.... कसाबसा दरवाजा उघडला आणि पंखा लावायला बटण दाबले पण तो सुद्धा आज नाराज..खिडक्या उघडताना त्याही नाराजीने कुरकुरल्या...नेहमी आरशात पाहून स्मितहास्य करणारी तिजोरी.. तिनेही नाराजीने स्वागत केलं...केरसुणी, सुपली ने बंड पुकारुन कोपरा धरला होता...त्यांना जाऊन अंजारुन गोंजारुन वर्गखोली साफ करुन घेतली...नेहमी टवटवीत, बोलका असणारा फळा आज निस्तेज आणि अबोल दिसला. खडूचा बॉक्स टेबलवर पालथा पडला होता....टेबल, खुर्ची सारेच मौनात. कुणीच आज हसून दाद दिली नाही. मग सगळ्यांनाच सांगितले , " हो, बदली झालीय जावंच लागेल." असं म्हणून इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका अनावर झाला. मन मोकळं केलं.
गेल्या सात वर्षातील तुझ्यासोबतचा जिव्हाळा डोळ्यासमोर तरळला. इथे नवीन रुजू झाले तेव्हा खूप रडले होते. जुन्या शाळेतील मोठा स्टाफ, मोठी इमारत, मोठा पट त्यापेक्षा इथं सगळं इवलंस. द्विशिक्षकी शाळा. कसं राहायचं इथं…? म्हणून रडायला येत होतं. पण जसा तुझा लळा लागला अन् आपला धागा जुळला…तसं खूप काही चांगलं घडत गेलं. शाळा सुटली की तुझ्याशी संवाद सुरु व्हायचा. तुला नटवण्याचा कल्पना तुलाच सांगायची. तेव्हा तू हसायची…लाजायची…सावधही करायची. हे शक्य नाही म्हणायची…पण पाठबळही द्यायची..हळूहळू तुझं रुपडं बदलत गेलं…तुझी नव्याने ओळख निर्माण झाली…तुझ्या कुशीत आणि शिक्षकांच्या मायेत शिकणारी लेकरं गुणवंत होऊ लागलीत. पालकांचा, ग्रामस्थांचा विश्वास वाढू लागला.गावातील प्रत्येकालाच अभिमान वाटावा असं माळरानावर , टेकडीवर एक सुंदर चित्र तुझ्यारुपाने रेखाटलं गेलं…त्याकामी शेकडो हात पुढे आले. टेकडीवरचं हे नंदनवन पाहून समाधान वाटायचं.
शिस्त व निष्ठेने काम करण्याच्या तत्वाने एक चांगलं प्रशासन राबवण्याची संधी दिलीस. प्रशासनाचे विविध धडे तुझ्या जवळ बसून शिकताना नवचैतन्य लाभायचं…!
राबवलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून तुझं नाव होऊ लागलं…अगदी जिल्हास्तरापर्यंत आपण धडकून आलो..!! तुझ्यामुळे अनेक सन्मान लाभले.
पण खरं सांगू का..? कितीही वेळ झाला तरी तुझ्या सहवासात कशाची भीती वाटली नाही..शाळा भरवण्याची आपली घाई असायची पण सुटण्याची घाई कोणालाच नसे. आम्ही शिक्षक , विद्यार्थी सारेच रेंगाळत असायचो तुझ्यापाशी. वाचणारे, लिहिणारे, खेळणारे विद्यार्थी पाहून तुला सा-यांचं कौतुक वाटे.
कोणत्याही पालकांची कधीही तक्रार येऊ दिली नाहीस. शाळा दूर माळरानावर पण विद्यार्थ्यांचे छोट्या मोठ्या अपघातांचे गालबोट लावू दिले नाहीस. पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या या माळावर तू कधी पाण्याची कमतरता भासू दिली नाहीस. शाळेतील प्रत्येक वस्तूचे तू रक्षण केलेस. तू एक अद्भूत शक्ती होऊन सोबत राहिलीस. अर्थात तू सुरक्षाकवच बनूनच पहारा देत होतीस.
गेल्या सात वर्षात खूप चांगली साथसोबत केलीस…पण आज जो दिवस यायला नको होता तो अखेरीस उगवलाच..आणि तो म्हणजे कार्यमुक्तीचा. मस्टरला शेवटची सही करताना डोळे डबडबले.आज तुझा जड अंतःकरणाने निरोप घेताना खूप भरुन आलं.तुझ्या सहवासातील हा कार्यकाल अविस्मरणीय राहील. तुला अजून फुललेलं, बहरलेलं पाहायचं आहे..ही इच्छा पूर्ण होऊ दे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.
©®सौ.विद्या नलवडे , कोल्हापूर .