पुण्यात शिकत असाल, चौकस असाल, जिज्ञासा जागी असेल तर तुमची समर नखाते सरांशी गाठ अटळ आहे. आणि ती झाली नसेल तर आपल्यात काही गडबड आहे, हे नक्की. कला , विज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य, वास्तुकला, व्यवस्थापन कुठेही असाल तरी याना पर्याय नाही.
ते कधी सायकल तर कधी स्कूटरवरून साधा झब्बा घातलेले शुभ्र धवल दाढीधारी नखाते जेव्हा कोणत्याही महाविद्यालयात शिरतात. तेव्हा चैतन्य पसरत. अनेक मुलंमुली वाट पाहत असतात. कथा, कविता, नाटक, चित्रपट अशा वेणा घेऊन ते येतात. त्यांचं कठोर विश्लेषण हातात पडतं. आपल्याला प्रश्न पडत नाहीत. आपण थांबतो त्यापुढील प्रवास सर घडवून आणतात. मुख्य म्हणजे आपल्याला आपली आत्मप्रेमग्रस्तता व आपली इयत्ता दाखवून देतात.
दृश्य-कला माध्यमांचे भाष्यकार व अनेक दिग्दर्शकांचे दिग्दर्शक प्रा.समर नखाते म्हणतात, “नार्सिसस स्वत:ची प्रतिमा पाहत बसला, ती निदान वास्तव (रिअल इमेज) होती. स्वत:विषयीच्या प्रतिमा रंगवणं व त्यात रमणं, तशी स्वप्नं पाहणं, ह्यात ती प्रतिमा काल्पनिक असते. त्याचा फायदा घेऊन जाहिरात क्षेत्रानं आपल्याला व्यापून टाकलं. मग पडद्यांवरील प्रतिमांतून चित्रपटांनी स्वप्नांमधील आकर्षक प्रतिमा दाखविल्या आणि त्यात दर्शकाला रमवलं. पुढे संगणक व चलतध्वनी ह्यांमुळे तर आपलं आयुष्य हे पडदामय होऊन गेलं. आता मी कसा आहे? हे प्रक्षेपित (प्रोजेक्ट)करण्याची, `दाखविण्याची’ केविलवाणी व हास्यास्पद धडपड म्हणजे स्वप्रतिमा! छायाचित्रातून, कॅमेरा मागील डोळा हा त्याच्या दृष्टीने काहीतरी दाखवित असतो. स्वप्रतिमा घेणाऱया कॅमेऱयामागे डोळा कोणाचा असतो? बरं इतकं आधुनिक तंत्रज्ञान असूनही एकही स्वप्रतिमा हे उत्तम छायाचित्र न होता बेंगरुळ, बावळट व हास्यास्पद असतात. याचं कारण तंत्रज्ञान हे काही कलात्मक `दृष्टी’ देऊ शकत नाही. स्वप्रतिमा हाच मुख्य व्यवहार आणि आहार (सेल्फिव्होरस) झालेल्या असंख्य लोकांनी मेंदू नामक अवयवाचा अजिबात वापर करायचं सोडून दिलं आहे.”
ते प्रत्येकावर प्रेम करतात व काळजी पण लाड करत नाहीत. ते कठोर असतात. व्यक्तीकेंद्री विचारांची टवाळी करतात. सरांना कधीही , कोणीही फोन करू शकत. सर सर्वांशी तेवढ्याच आत्मीयतेने बोलतात. कितीतरी जणांचे अतिशय वैयक्तिक भावनिक प्रश्न असतात. त्यांच्यामुळे किती आत्महत्या टळल्या हे सांगता येणार नाही.
ते आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात. बाहेरून आत आल्यावर प्रक्रिया काय होते? मग बाहेर काय व कस येतं याचा विचार करायला लावतात. आत्मशोधाच्या मार्गावर राहायचं असेल तर सरांची भेट अनिवार्य आहे.
४० वर्षापासून अनेकांना समृद्ध करणारे नखाते सर आज एक्काहत्तरीत प्रवेश करीत आहेत.
सर, सलाम !