लातूर/प्रतिनिधी:एक नागरिक म्हणून प्रत्येकाने देशासाठी काहीतरी केले पाहिजे.प्रत्येक नागरिकाने स्वतःवर स्वच्छतेचे संस्कार करून घ्यावेत.समाजोपयोगी कार्य करावे. कोणाचाही द्वेष करू नये. चांगल्या विचाराची,चांगल्या आचाराची किमान एक पणती लावावी.यातून समाजात निर्माण झालेला अंध:कार व काळोख पूर्णपणे निघून जाईल,अशी अपेक्षा प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने यांनी व्यक्त केली.
डॉक्टर्स डे च्या निमित्ताने एमडी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. विठ्ठल लहाने यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.खचाखच भरलेल्या दयानंद सभागृहात उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना डॉ.विठ्ठल लहाने यांनी स्वतःची ‘मन की बात’ सांगताना मलाही तुमच्यासाठी,देशासाठी काहीतरी करायचे आहे,समर्पित व्हायचे आहे,असे भावनिक उद्गार काढले. आज विद्यार्थी व पालक हे नाते काहीसे बदलले आहे.पालकांची भूमिका दिवसेंदिवस बदलत आहे,असे सांगताना पॅरेंट या शब्दातील प्रत्येक अक्षरामागची भूमिका त्यांनी उलगडून सांगितली.पी म्हणजे पोटेन्शिअल अर्थात स्वतःमध्ये असणारी क्षमता प्रत्येकाने ओळखावी. स्वतःमधील क्षमता ओळखल्यानंतर तिचा पूर्ण वापर करावा.इतरांशी तुलना करूच नये. जर तुलना झाली तर त्यापासून स्फूर्ती घ्यावी,असे ते म्हणाले.ॲबिलिटी,लायबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी,नोबिलिटी या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांनी स्पष्ट करून सांगितला. प्रत्येकावर काही ना काही जबाबदारी असते.ती जबाबदारी त्याने पार पाडली पाहिजे. स्वतःवर योग्य संस्कार करून घेतला पाहिजे.विद्यार्थ्यांनी शब्दांचा वापर जपून करतानाच स्वतःच्या कुटुंबाला स्वर्ग बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जबाबदारी घेतली तरच त्यातून मार्ग काढता येतो,असेही ते म्हणाले.
समाजातील प्रत्येक क्षेत्रात आज काळोख दाटलेला आहे.तो अंध:कार दूर करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी उचलण्याची, काहीतरी समर्पित करण्याची आवश्यकता आहे.मला देखील देशासाठी समर्पित व्हायचे आहे.आपण सर्वांनी समर्पणाची हीच भावना कायम ठेवली तर हा अंध:कार निश्चितपणे दूर होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. लहाने यांचा सत्कार करण्यात आला.एमडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.उदय देशपांडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू विषद केला. या कार्यक्रमास एमडी प्रतिष्ठानचे प्रा.शिवराज मोटेगावकर,संतोष बिराजदार, प्रा.किशोर पानसे,श्रावण चव्हाण, सागर शिवणे,शिरीष कुलकर्णी, संजय राजुळे,प्रशांत सूर्यवंशी,प्रा.सुहास माने,प्रा.रमेश भारती, ॲड.वैशाली लोंढे-यादव,अरविंद औरादे व आसिफ शेख यांच्यासह हजारो विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.प्रा.सुहास माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.