- भाग :२.
दरिद्री नारायणाच्या सेवेचे ध्येय
दैनिक मँचेस्टरचा वार्ताहर म्हणून काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळत होत्या. त्यावेळी वृत्तपत्र चालवण्यासाठी जाहिराती घेतल्या जात होत्या. जाहिराती घेण्यासाठी वृत्तपत्र चालवले जात नव्हते. साहजिकच वृत्तपत्राच्या कार्यालयात संपादकीय विभाग प्रमुख होता आणि त्यावर कुणाचाही अंकुश नसायचा. जाहिरातीसाठी बातमीशी तडजोड नाही ही भूमिका होती. त्यामुळे वार्ताहर, उपसंपादक यांना स्वातंत्र्य होते. वार्ताहरांच्या कामाचे मूल्यमापन त्यांच्या लेखनावर होत असे आणि त्यांना जाहिरातींचं टार्गेट नव्हतं. यामुळे काम करताना मजा यायची.
पण, असे असले तरी बातम्यांसाठी मिळणारे मानधन खूपच कमी असायचे. जाहिरातींसाठी कमिशन मिळायचे पण ते बिल वसूल करुन भरल्यावर…!! हे उत्पन्न इतके तुटपुंजे असायचे की कुणाला सांगितले तरी खरे वाटणार नाही. त्यावेळी आजच्यासारखे पावला पावलावर वार्ताहर नव्हते. त्यामुळे अनेकदा बातमीसाठी आम्हाला अजूबाजूच्या गावात जावे लागायचे. हा प्रवास बहुदा सायकलनेच असायचा. कधी कधी तर सायकल भाडेही परवडायचे नाही मग डबल सीट जायचा पर्याय आम्ही वापरायचो. पण, बातमी सोडायची नाही ही जिद्द मनात असायची….!!
जाहिरात विभागाचा दबाव नसायचा पण स्थानिक वार्ताहराला सोबत घेऊन जाहिराती मिळवण्यावर भर असायचा. दैनिक मँचेस्टरच्या जाहिरात विभागाचे चंद्रकांत मिठारी माझ्याकडे यायचे आणि आम्ही चक्क सायकलवरुन फिरुन जाहिराती मिळवायचो. मला दैनिक मँचेस्टरच्या जाहिरात विभागाचे नागेश, नाना घोरपडे, संपादकीय विभागाचे महेश ताकभातेंसोबतच किरण कापसे, अनिल सराफ, चंद्रकांत कित्तुरे यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. या सगळ्यांनी माझी पत्रकारिता बहुआयामी केली. तिला पैलू पाडले आणि माझी लेखणी समृध्द बनविण्यात मोलाचा वाटा उचलला.
एक दिवस असाच दैनिक मँचेस्टरच्या कार्यालयात गेलो होतो. दैनिकाचे मालक, संपादक श्री वसंतराव दत्तवाडे कार्यालयात होते. महेश ताकभाते यांनी मला त्यांच्यासमोर नेऊन उभे केले. “हे आपले जयसिंगपुरचे नवे वार्ताहर… आनंद कुलकर्णी…!!” महेश ताकभाते यांनी ओळख करुन दिली. साहेबांनी बसायला सांगितले. बोलता बोलता विषय घराकडे आला. “भाऊ, बापू तुमचे कोण ?” त्यांनी प्रश्न विचारला आणि मी चमकलोच. माझ्या वडिलांना आणि काकांना मालक, संपादक घरच्या नावाने ओळखतात हे पाहून एकीकडे आनंद झालाच पण दुसरीकडे लगेच जबाबदारीची जाणीव झाली.माझे लिखाण संपादकांकडून मुद्दाम वाचलं जायचं, मला ते सूचना करत. नंतर ही मर्जी इतकी होती की ते मला विषय द्यायचे आणि बातमी लिहून घ्यायचे. आता मी दैनिक मँचेस्टर चे काम करीत नाही पण श्री दत्तवाडे साहेबांचे प्रेम तसेच आहे. आजही कधी कार्यालयात गेलो आणि त्यांची भेट झाली तर, “काय आनंदा….!” असं म्हणून ते सगळी चौकशी करतात.
एव्हाना दैनिक मँचेस्टर साठी वार्ताहर म्हणून काम करायला लागून तीन महिने झाले होते. एक दिवस दपारी पोस्टमन आला आणि त्याने सही घेवून मला दीडशे रुपये दिले. दैनिक मँचेस्टरच्या कार्यालयातून ती मनिऑर्डर आली होती आणि त्यावर लिहिले होते, “आपले तीन महिन्यांचे मानधन पाठवले आहे…!!” १९८७ ची घटना आहे ही…!! पत्रकारितेतील ती माझी पहिली कमाई…!! तीन महिने केलेल्या मेहनतीच्या तुलनेत तोकडीच होती पण घामाच्या पैशाचे मोल जाणवून देणारी होती. एक मात्र मान्य केले पाहिजे की पैसे कमी असतील पण दैनिक मँचेस्टर ने पैसे दिले नाहीत असं मात्र कधीच घडलं नाही.
पत्रकारितेसाठी मी दिवसभर भटकायचो, लिखाण करायचो, तहान, भूक, ऊन, वारा, पाऊस कशाचीच पर्वा करायचो नाही. पहिल्या तीन महिन्यातील माझी मेहनत आणि मिळालेला मोबदला बाबांना खूप अस्वस्थ करुन गेला. “दाद्या, तुझे हा व्यवसायातील मानधन म्हणजे मान मोडून काम केले तरी धन नाही ़़. दुसरं काही तरी बघ…!!” असं बाबा मला म्हणाले खरं पण तीन महिन्यात लेखणीची नशा हळूहळू माझ्या मेंदूत भिनत गेल्यानं मी पत्रकारिताच सुरु ठेवायचे ठरवले होते. कितीही त्रास होऊ द्या, पैसे कमी मिळाले तरी चालतील पण लेखणी खाली ठेवायची नाही, असा निर्धारच केला होता मनाने…..!! माझे बहुतेक सगळे मित्र वेगवेगळ्या व्यवसायात जाऊन लक्ष्मीची उपासना करत असताना मी मात्र या दरिद्री नारायणाच्या सेवेलाच आयुष्याचे ध्येय बनविण्याचा प्रयत्न करीत होतो….!!!
आनंद वामन कुलकर्णी
जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
भ्रमणध्वनि – ७७४४९६४५५०