★एरवी करतात प्रवक्त्यांशी स्पर्धा★
सडेतोड
●राजेंद्र शहापूरकर●
औरंगाबाद : महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवरबाज नेता अशी ओळख असलेल्या देशातील बुर्जुग ‘राष्ट्रवादी’ नेते शरद पवार यांचे ‘अग्निपथ , अग्निवीर’ योजनेच्या संदर्भातील मौन राजकीय निरीक्षकांना आश्चर्यचकीत करणारे आहे.
शरद पवार दीर्घकाळ केंद्रात मंत्री होते , नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळात दोन-एक वर्ष संरक्षणमंत्री होते. त्यामुळे ते खरे तर अधिकारवाणीने संरक्षण मंत्र्यालयाच्या या योजनेबद्दल बोलू शकतात पण ते बोलत नाहीत यामागचे गौडबंगाल समजत नाही
बरे पवारकाका कधी बोलतच नाहीत असेही म्हणता येणार नाही.गेल्या विधानसभा निवडणुकीतील पावसात भिजून भाषण केल्यापासून पवारांनी ‘पुणेरी पगडी , पेशव्याकडून छत्रपतीना नियुक्ती , देवाचा बाप ‘ आदी विषयावर मोठ्या हिरीरीने सार्वजनिक व्यासपीठावर आत्मज्ञान दिलेले आहे. हल्ली तर या अशा वक्तव्या संदर्भात त्यांची त्यांचेच सेनेतील अग्रदूत संजय राऊत यांच्याबरोबर जणू स्पर्धा सुरू असंल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
परवा सेनादलाच्या तिन्ही प्रमुखानी पत्रकार परिषद घेऊन ‘अग्निपथ’ चा संपूर्ण इतिहास कथन केला आहे.म्हणजे ‘अग्निपथ’ ही योजना कुणा एकाच्या मनात आली आणि रात्रीतून जाहीर करण्यात आली असा प्रकार झालेला नाही. १९८९ पासूनच भारतीय लष्करात या बाबत विचारविनिमय सुरू होता. तरुण व तडफदार तसेच कर्तव्यनिष्ठ मनुष्यबळाची सैन्याला गरज भासत होती. या योजनेवर ३०-३२ वर्ष सर्वबाजूने काम करण्यात आल्यानंतर ती जाहीर करण्यात आली आहे.याच काळात नरसिहराव मंत्रिमंडळात शरद पवार देशाचे संरक्षणमंत्री होते. असे असताना देशभर या योजना विरुद्ध हिंसाचाराचे थैमान या सुरू असताना पवारांचे बोलणे आवश्यक होते पण त्यांनी तर हिंसाचाराचा निषेध करणारे चार शब्द उच्चारलेले दिसत नाहीत. राष्ट्रपती आणि पंतप्रधानपदावर डोळा ठेवून असलेल्या अशा नेत्याला ज्येष्ठ तरी कसे म्हणावे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.पवारांच्या मौनामागे राजकारण असेल ते चुकीचे आणि अशावेळी अयोग्य ठरते कारण कोणाच्याही राजकारणापेक्षा देश मोठा आहे हे या ज्येष्ठ नेत्यांना कुणीतरी सुनावण्याची गरज आहे , म्हणून हा प्रपंच !
लेखन: राजेंद्र शहापूरकर