;33 खेळाडूंनी केले रक्तदान
लातूर – क्लब व क्रीडा संघटनांच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण विकास होत असतो. या दोघांनी समन्वय राखत खेळाची उंची वाढवावी असे प्रतिपादन ज्येष्ठ राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानोबा तिरुके यांनी शनिवारी केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय व महाराष्ट्र व्हॉलीबॉल क्लब यांच्या वतीने क्रीडा संकुलात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते कै. शिवहर पाळणे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व खेळाडूंच्या किट वाटप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच विक्रम पाटील, लिंबराज बिडवे, ज्येष्ठ खेळाडू लायकअली पठाण,माजी क्रीडाशिक्षक बाळासाहेब चाकूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शक तिरुके म्हणाले विविध शिबिरांच्या माध्यमातून खेळाडूंच्या कौशल्यात वाढ होते. त्यामुळे दीर्घकालीन शिबिरे राबविणे गरजेचे आहे त्यासाठी विशेषता संघटनांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात क्लब वाढीसाठीही माजी खेळाडूंनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यासह विक्रम पाटील व बाळासाहेब चाकूरकर यांनी स्वर्गीय शिवहर पाळणे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी व्हॉलीबॉलच्या आजी व माजी तीस खेळाडूंना किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लातूर विभागीय सचिव म्हणून निवड झालेले दत्ताभाऊ सोमवंशी यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय खेळाडू प्रल्हाद सोमवंशी, पप्पू भालेराव, जगन्नाथ तत्तापुरे, यश हाके,नसरू फुलारी यांचाही सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्रा कैलास पाळणे यांनी केले तर आभार महेश पाळणे यांनी मानले. कार्यक्रमास महाराष्ट्र हॉलीबॉल क्लब व शहरातील हॉलीबॉल प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी गणेश हाके माधव रासुरे विठ्ठल कवरे विजय सोनवणे विशाल वगरे नानासाहेब देशमुख महेश शिंदे यांच्यासह क्लबच्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.

रक्तदान शिबिरास खेळाडूंचा प्रतिसाद..
शहरातील माऊली ब्लड बँकेच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरास खेळाडूंनी प्रतिसाद दिला असून 33 आजी-माजी खेळाडूंनी यावेळी रक्तदान केले. त्यासाठी बालाजी जाधव बालाजी नरहरे रोहिणी कातळे यांनी परिश्रम घेतले.