लातूर, दि (प्रतिनिधी):धकाधुकीच्या जीवनात प्रत्येकजण ताण- तणावाखाली वावरतो आहे. ताण-तणाव घालवण्यासाठी युवा पिढी विविध व्यसनात गुरफटत चालली आहे. हे ताण-तणाव कमी करायचे असतील आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर नित्य नेमाणे योगा केला पाहिजे, असे सांगत राज्याचे पोलीस महासंचालक (होमगार्ड) भूषणकुमार उपाध्याय यांनी आनंदी जीवन कसे जगावे याची गुरुकिल्लीच दिली.
रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने डिस्ट्रिक्ट ३१३२ ची १४ वी दोन दिवसीय कॉन्फरन्स नुकतीच दयानंद सभागृहात संपन्न झाली. ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर आपल्या तासाभराच्य विवेचनात उपाध्याय यांनी स्वअनुभव सांगत आणि अनेक दाखले देत तणावमुक्त जीवन जगण्याच्या टीपस् दिल्या. पोलीस सेवेत असतांना अनेक ताण-तणावाला सामोरे जावे लागते. कारागृह अधीक्षक म्हणून काम करतांना आणि कैद्यांसोबत वावरतांना आपल्याला अनेक प्रसंगाला, तणावाला सामोरे जावे लागले. अशावेळी आपल्यात योगा कामाला आला. कैद्यांना योगाचे धडे दिल्यामुळे त्यांच्या जीवनातही आमूलाग्र बदल झाले, असेही उपाध्याय यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
मंचावर जीएसटी कमिन्शर सुरेंद्र मानकोसकर , मुरादाबाद येथील जेष्ठ विधिज्ञ गजेंद्रसिंह धामा, रोटरीचे प्रातपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, ऍड. सविता मोतीपवळे, शशिकांत मोरलावार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या व्याख्यात तणावमुक्त जीवन व आनंदी जीवन जगण्यासाठी योगा सारखे दुसरे साधन नाही असे सांगत सोप्या पद्धतीने योगा कसा करावा? हे सविस्तरपणे सांगितले. ताण-तणावामुळे बीपी, शुगर, हार्ट अटॅक सारखे अनेक आजार सर्वांना बळावत आहेत. अशा आजारांना जवळ येऊ दयायचे नसेल तर, योगाची कास धरली पाहिजेअसे ते म्हणाले.
भूषणकुमार उपाध्याय पुढे बोलतांना म्हणाले की, ८० टक्के आजार हे मानसिक असताना तणावाच्या परिस्थितीमुळे आपण ते ओढवून घेतो. नकारात्मक गोष्टीमुळे ते जडतात. नकारात्मक गोष्टीचा त्याग केला आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घेतली तर, सर्वांचे जीवन आनंदी होईल २० ते २५ वयोगटानंतर अनेकजण आजारापेक्षा हा मानसिक आजार अधिक धोकेदायक असतो. त्यासाठी शारीरिक स्वास्थयाबरोबरच मानसिक स्वाथ्य सुद्धा जपले पाहिजे.
आनंदाच्या शोधात जग -सुरेंद्र मानकोसकर
याच सत्रात लातूरचे सुपुत्र जीएसटी कमिशनर सुरेंद्र मानकोसकर यांनी ‘आनंदी जीवनाचे रहस्य’ या विषयावर व्याख्यान देतांना सचिन तेंडुलकर, मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील प्रसंग सांगत आनंदी जीवन जगण्याची ‘जादुकी झप्पी’ सांगितली. अतिशय प्रभावी पद्धतीने त्यांनी व्याख्यान रंजक केले. त्यांच्या व्याख्यानाने प्रभावित झालेल्या रोटरीयननी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत दाद दिली.
‘अनाथाश्रम, वृद्धाश्रमाची वाढती संख्या ही चिंतनीय बाध आहे. आनंदी जीवन जगण्याच्या नादात आपण आनंद हरवून बसलो आहोत असे सांगत सुरेंद्र मानकोसकर यांनी कुटुंब, संसार व मित्र हे आनंदाचे ठिकाण आहे. पती – पत्नीचे पवित्र नाते जपा, निर्णय घ्यायला मुलांना शिकवा, मुलांना प्रश्न विचारू द्या असा सल्लाही दिला. खर सुख हे आईच्या मिठीत आहे. आईची कूस यासारखी दुसरी आनंद देणारी दुसरी जागा नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
एक सजग मित्र, अभ्यासू संपादक आणि माणसे जोडणारा रोटेरियन अशी ओळख असणारे रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या कल्पक नेतृत्वाचे भूषणकुमार उपाध्याय व सुरेंद्र मानकोसकर या दोघांनाही मुक्त कंठाने कौतुक केले. ‘उत्सव ‘ ही थीम घेवून आयोजित केलेली ही कॉन्फरन्स ‘लातूर पॅटर्न ’म्हणून रोटरीच्या इतिहासात ओळखली जाईल, असेही ते म्हणाले.