लातूर, दि.१५– सध्या जैन समाजात उपवर मुला- मुलींची संख्या कमी असून, सकल जैन समाजातील धूरिणांनी आणि पालकांनी रोटी- बेटी व्यवहारासाठी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रातच नव्हे तर, देशात तो एक आदर्श पायंडा पडेल असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.
श्री. दिगंबर जैन सैतवाल सेवा मंडळ संचलित जैन वधू- वर सूचक समिती, सोलापूर व श्री महावीर बहुउद्देशिय संस्था, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातुरातील मुक्ताई मंगल कार्यालयात रविवारी (दि. १५ रोजी ) ३८ व्या जैन, वधू- वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन औसा विधानसभा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जैन वधू- वर सूचक समिती (सोलापूर) चे अध्यक्ष प्रदीप पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटनच्या सत्रास जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, सौ. राजश्री पांढरे, कांचनमाला संगवे, भारत वर्ष दिगंबर जैन, तीर्थक्षेत्र कमिटी, महाराष्ट्र आंचलचे अध्यक्ष अनिल जमगे, श्री. महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, तथा स्वागताध्यक्ष राजीव बुबणे, सौ. सारिका बुबणे इत्यादींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
राज्यभरातून जवळपास पाचशेच्यावर वधू- वरांनी या मेळाव्यास नोंदणी केली असल्यामुळे कोरोना प्रतिबंधामुळे गत दोन वर्षे होवू न शकलेल्या या वधू- वर परिचय मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. जैन समाजातील उपवर वधू- वर आणि त्यांच्या पालकांनी मुक्ताई मंगल कार्यालय खचाखच भरले होते. संयोजन समितीच्या स्वयंसेवकांनी उत्तम नियोजन केल्यामुळे कुठलाही गोंधळ या मेळाव्यास पहावयास मिळाला नाही. स्वागत , परिचय , भोजन आदी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे राज्यभरातून आलेल्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आपल्या उद्घाटनपर भाषणात आ. अभिमन्यू पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ बेटी बचाव – बेटी पढाव ‘ या घोषणेचा उल्लेख करून, आज विविध जाती – उपजाती पोट जातीमध्ये आपला समाज विभागला गेला आहे. दिगंबर जैन, श्वेतांबर जैन आदी जैन समाजात रोटी- बेटी व्यवहार होत नाहीत. मुलींची संख्या कमी – कमी होत चालली आहे. परिणामी आंतरजातीय विवाह होत आहेत. हे टाळायचे असेल तर ‘बेटी बचाव- बेटी पढाव’ या नार्याबरोबरच सकल जैन समाजातील सर्वांनी एकत्र येवून रोटी – बेटी व्यवहार करावे. त्याची समाजाला खरी गरज आहे, असे आवाहनही केले.
राजीव बुबणे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात मेळाव्यास मिळालेल्या प्रतिसादाबहल समाधान व्यक्त केले. कोरोना प्रतिबंधामुळे दोन वर्षे मेळावा खंडीत झाला होता. आता लातूर पासून सुरूवात झाली असून, मराठवाड्यात सातत्याने असे वधू- वर मेळावे आयोजित केले जातील. लातूरतील मेळाव्यात आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील उपवरांचे विवाह जमले तर अशा निवडक ५ ते ७ उपवरांचे सामूहिक विवाह संस्थेच्यावतीने मोफत करण्यात येतील , अशी घोषणाही त्यांनी केली.
अनिल जमगे यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रारंभी राजीव बुबणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, स्मृतीचिन्ह बुके देऊन स्वागत केले. परळीचे जयगांवकर यांनी सन्मानपत्र देवून बुबणे यांचे स्वागत केले.
राजीव देशमाने व सौ. हेमा देशमाने यांनी प्रभावी पद्धतीने काम करून मेळावा यशस्वी केल्याबद्दल त्यांचाही सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सुचि पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप म्हेत्रे यांनी केले. शैलेश पांगळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या मेळाव्यास तेजमल बोरा, किशोर जैन, किशोर नाकिल, प्रफुल्ल शहा, प्रा. डॉ. सुनिता सांगोले, श्रीमती शोभा कोंडेकर, महेंद्र दुरुगकर, शिरिष घोडके ,प्रमोद संगावे , किरण देशमाने,अशोक कोटे, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.