महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या ग्रँड इफ्तार मधून सामाजिक एकोप्याचा संदेश
लातूर/प्रतिनिधी:
लातूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे. सामाजिक एकोप्याचा विचार लातूरने राज्य आणि देशासमोर ठेवलेला आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आयोजित केलेल्या ग्रँड इफ्तार पार्टीतून लातूरचा हाच वारसा जपण्याचे काम करण्यात आले असल्याचे मत पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र दिनी (दि.१ मे ) महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शुभेच्छा देताना पालकमंत्री देशमुख बोलत होते. लातूर शहरातील कातपूर रोड येथील पार्वती मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी संपन्न झालेल्या या इफ्तार पार्टीस देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विरोधी पक्षनेते दीपक सूळ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, मोईज शेख, आयुब मणियार, अहमदखान पठाण, रविशंकर जाधव, राजा मणियार, चांदपाशा घावटी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय शेटे, जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रशांत पाटील, नवनाथ अलटे, ॲड.फारुख शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख, शासकिय रुग्णालय अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख, उपजिल्हाधिकरी डॉ सुनील यादव, तहसिलदार स्वप्नील पवार, अथरोद्दिन काजी, ॲड.समद पटेल, पृथ्वीराज सिरसाट, राजकुमार जाधव, मुफ्ती सोहेल, डॉ कल्याण बरमदे, डॉ हणमंत किणीकर, यांच्यासमवेत सर्वपक्षीय मान्यवरांसह, अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व असंख्य मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.
शुभेच्छा देताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आपणास भेटण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. शांतता आणि सलोख्याचा लातूरचा विचार त्यांनी समोर आणला आहे.लातूर हा शांतताप्रिय जिल्हा असून या इफ्तार पार्टीमधून त्याचेच प्रतिबिंब दिसून येत आहे. हिंदू-मुस्लिम एकोप्याचे हे उदाहरण लातूरकरांनी देशासमोर ठेवलेले आहे,असेही ते म्हणाले. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या रमजान ईद निमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनीही रमजान ईदच्या निमित्ताने उपस्थित उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व लातूरचे संस्कुती यापुढे अशीच जपली जावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
प्रारंभी महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, रमजानच्या पवित्र महिन्यात केलेली प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचते त्यामूळे लातूरचे आणि लातूरकरांचे भले व्हावे अशी प्रार्थना आपण सर्वजण मिळून करू. या महिन्यात रोजा म्हणजेच उपवास ठेवला जातो. जसा खाण्यापिण्याचा रोजा असतो तसाच डोळ्यांचा, मनाचा व कानाचाही रोजा असतो. कोणाचेही वाईट चिंतू नये, वाईट ऐकू नये आणि वाईट करू नये हीच शिकवण या माध्यमातून दिली गेली असल्याचे ते म्हणाले.या इफ्तार पार्टीस आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवर आणि उपस्थित नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. प्रारंभी मुफ्ती ओवेस यांच्याकडून दुवा पठण करण्यात आले.
यावेळी उपस्थित असंख्य समाजबांधवांना इफ्तार देण्यात आला. इफ्तार नंतर नमाजसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. या इफ्तार पार्टीस शहराच्या विविध भागातील मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सामाजिक सलोख्याच्या हा इफ्तार कार्यक्रम लक्षणीय ठरला.