भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून प्रामुख्याने ओळख होते. ही त्यांची ओळख अत्यंत मर्यादित स्वरूपाची आहे असे मला नेहमी वाटे. मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यरत असताना डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील अन्य थोर पैलूवर प्रकाश टाकण्याची संधी मला मिळाली त्या अविस्मरणीय अनुभवांची ही एक आठवण. त्याचं असं झालं की 1988 वर्षी मी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम हा अभ्यासक्रम करण्यासाठी गेलो होतो .तेव्हा मी दूरदर्शन मध्ये हे करार पत्रीत कलाकार स्टाफ आर्टिस्ट म्हणून कार्यरत असल्याने मला अध्ययन रजा मिळू शकली नाही जी नियमित शासकीय कर्मचाऱ्यांना मिळू शकते. म्हणून मी अन्य स्वरूपाची रजा घेऊन हा अभ्यासक्रम करण्यासाठी गेलो. अभ्यासक्रमाचे पहिले सत्र नोव्हेंबर मध्ये संपले .मी रजेवरून परत दूरदर्शनमध्ये रुजू झालो. त्याचवेळी माझे वरिष्ठ अधिकारी निर्माते सुधीर पाटणकर यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित हिंदी माहितीपट राष्ट्रीय प्रसारणासाठी बनविण्याची जबाबदारी केंद्राने सोपविली. बैठकीतून आल्यावर किती प्रचंड मोठी जबाबदारी सोपवली आहे हे पाटणकरांना कळून चुकले होते. त्यामुळे ते विचार मग्न झाले होते. ते कक्षात येताच मी त्यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी कारण सांगितले. यावर मी त्यांना म्हणालो , तुम्ही मला दोन दिवसांचा वेळ द्या. पूर्ण विचार करून आपण काय ते ठरवू या! त्या दोन दिवसात विचारांती माझ्या लक्षात आले की बाबासाहेबांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून. वस्तुतः याशिवाय ते विचारवंत, समाज सुधारक, शिक्षण प्रसारक, कामगार नेते, धर्मशास्त्र अभ्यासक, अर्थतज्ञ ,संपादक अशा विविध भूमिकांतून प्रभावीपणे वावरलेले आहेत. या विविध पैलूंपैकी मला सर्वाधिक भावला तो म्हणजे शिक्षणाचा पैलु. खरे पाहता बाबासाहेबांनी स्वतः अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले होते .परदेशात जाऊन डॉक्टरेट मिळविली होती .या त्यांच्या उच्च शिक्षणामुळे त्यांना त्यांचे पुढचे जीवन आनंदात आणि आरामात घालविणे सहज शक्य होते. परंतु, शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी देश बांधवांना शिक्षित करण्यासाठी शिक्षण प्रसारणाचे काम हाती घेतले.
औरंगाबाद येथे १९८८साली विद्यापीठात शिकत असताना जो मराठवाडा तेव्हाही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला समजला जात असे ,अशा मराठवाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारे १९४८ साली मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. हे पाहून मला बाबासाहेबांविषयी अतोनात आदर वाटू लागला. अन्यथा त्याकाळी मराठवाड्यातील तरुण-तरुणींना उच्च शिक्षण घ्यावयाचे असल्यास नागपूर ,पुणे, मुंबई ,हैदराबाद अशा दूरच्या ठिकाणी जावं लागायचं. इतक्या दूर जाऊन शिक्षण घेण्याची अनेकांची तेव्हा ऐपत नसायची. त्यामुळे मराठवाड्यातील हजारो तरुण उच्च शिक्षणापासून वंचित राहत होते. त्यांच्या अडचणी ओळखून बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मराठवाड्यातील पहिले मिलिंद महाविद्यालय सुरू करून अत्यंत दूरदृष्टी दाखवली.
या महाविद्यालयामुळे मराठवाड्यात उच्च शिक्षणाची क्रांती झाली असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही .म्हणूनच माहितीपटासाठी विषयाचा विचार करताना मला बाबासाहेबांच्या शैक्षणिक पैलू वरच संपूर्ण माहितीपट असावा ,असे वाटू लागले. वरिष्ठांची चर्चेअंती याच विषयावर माहितीपट करण्याचे निश्चित झाले .माहिती पटाचे स्वरूप विचारात घेता त्यासाठी सर्व तपशील संशोधन पूर्ण परिपूर्ण असणे गरजेचे होते. त्यासाठी संशोधनाचे काम प्राध्यापक गोविंद पानसरे यांना देण्यात आले. त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित संहिता लेखन प्राध्यापक रतनलाल सोनग्रा यांनी केले. माहितीपटाच्या चित्रीकरणास आम्ही औरंगाबादला सुरुवात केली. चित्रीकरण पथकात निर्माते सुधीर पाटणकर, निर्मिती सहायक देवेंद्र भुजबळ,कॅमेरामन के. गणपती, ध्वनिमुद्रक किशोर जोशी, सहाय्यक ए के सारस यांचा समावेश होता . नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाची वास्तु ,तेथे उपलब्ध असलेली दुर्मिळ छायाचित्रे, बाबासाहेबांच्या विविध वस्तू, प्राचार्यांची आणि विद्यार्थ्यांची मनोगतं, तत्कालिन मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे निवेदन ,पुणे ,महाड ,मुंबई येथील शैक्षणिक वास्तूंचे चित्रीकरण व संकलन करून पुढे ६डिसेंबर१९८८ रोजी रात्री नऊ वाजता दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात हा माहितीपट प्रसारित झाला. डॉक्टर बाबासाहेबांनी विद्यार्थी दशेत कसे शिक्षण घेतले, समाजाला शिक्षित करण्यासाठी कसे परिश्रम घेतले ,शैक्षणिक संस्था कशा उभारल्या ,त्यांना या कामी मिळालेले इतरांचे सहाय्य ,त्यांची ग्रंथसंपदा, त्यांनी लिहिलेले ग्रंथ या सर्व महत्त्वाच्या शैक्षणिक बाबींचे दर्शन सुमारे तीस मिनिटाच्या या माहितीपटाद्वारे अत्यंत संवेदनशीलपणे दाखविण्यात आले. त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. रात्री नऊ ही वेळ प्राईम टाईम असायची. म्हणजेच या वेळेत सर्वाधिक दर्शक दूरदर्शन पहात. या माहितीपटाविषयी देशातील विविध भागातून खूप भावपूर्ण प्रतिक्रिया आल्या .या माहितीपटामुळे बाबासाहेबांच्या एका पैलूचे थोडेफार का होईना दर्शन घडविण्याची आपल्याला संधी मिळाली याबद्दल मला नेहमीच समाधान वाटत आले. तसेच बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य किती अचंबित करणारे आहे हेही लक्षात आले. दरम्यान, मी भारत सरकारच्या दूरदर्शन सेवेतून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाल्याच्या सेवेत ऑक्टोबर १९९१ रोजी अलिबाग येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रुजू झालो.जून १९९३ मध्ये माझी बदली मंत्रालयात झाली. दूरदर्शनचा पूर्वानुभव असल्याने माझ्याकडे जास्त करून तेच काम असे. डॉक्टर बाबासाहेबांच्या ऐतिहासिक ,शैक्षणिक कार्याची नोंद घेऊन १४जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला .या नाम विस्तारासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी शासनाने प्रत्यक्ष निर्णय जाहीर करण्याच्या काही दिवस आधी विविध मान्यवरांची मनोगते दररोज मुंबई दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित करण्याचं ठरविले. या मान्यवरांच्या मनोगतांचे चित्रीकरण, संकलन माहिती खात्यामार्फत होत असे. तर प्रसारण दूरदर्शनवरून संध्याकाळी बातम्यांचा आधी होत असे. त्या समन्वयाची जबाबदारी माझ्यावर होती. प्र. स. महाजन हे आमचे संचालक होते.तर दुरदर्शनकडून सहायक केंद्र संचालक वसंतराव भामरे या प्रसारण विषयक काम पहात होते.पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासह डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव झाले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला मिळालेली ही मानवंदनाच होय. या महामानवाला जयंतीनिमित्त माझी मनःपूर्वक महावंदना.