शेतकऱ्यांच्या ऊस चोरी प्रकरणात दोषींना
पाठिशी घालण्याचा मांजरा परिवाराचा प्रयत्न
शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही – राजेश कराड
लातूर दि.०६
– गाळपास आलेल्या ऊसाची वाहतूक ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून केलेल्या चोरीच्या प्रकरणात दोषींना पाठीशी घालण्याचा मांजरा परिवाराचा प्रयत्न असून याबाबत विचारणा करण्यास गेले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. शिवाय पोलीस बंदोबस्त तैनात करून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असून शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे भाजपाचे नेते राजेश कराड यांनी बोलून दाखविले.
मांजरा कारखान्याचे शेतकरी सभासद डॉ. हनुमंत कराड यांचा ऊस कारखान्याच्या तोडणी कार्यक्रमानुसार तोडण्यात आला. कारखान्याकडे देण्यात आलेल्या एकूण ऊसा पैकी ४९ टन ऊसाची वाहतूक ठेकेदार आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी संगणमत करून चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याबाबत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे बंधू राजेश कराड हे पूर्वकल्पना देऊन सदरील प्रकरणी चौकशी करण्यासाठी मांजरा कारखाना मुख्य कार्यालयात गेले असता कसल्याही प्रकारची समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊन कार्यकारी संचालक यांनी वेळकाढूपणाची भूमिका घेतली. उलट पूर्वकल्पना दिल्याने मोठा पोलिस फौजफाटा कारखाना साइटवर तैनात करण्यात आला होता असे सांगून भाजपा नेते राजेश कराड म्हणाले की, पोलीस बंदोबस्त लावून शेतकऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे यावरून दिसून आले. माझ्या कुटुंबातील उसाची चोरी होऊन मीच दोषी आहे की काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. शेतकऱ्यांनी काहीच विचारू नये हीच भूमिका कारखाना प्रशासनाची दिसून आली.
समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने ऊस चोरी प्रकरणात संबंधित वाहतूक ठेकेदार कारखाना कर्मचारी यांच्यावर प्रशासनाने काय कारवाई झाली, ऊस तोडणीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शेतकरी सभासदांचा तोडूणी कोड किती दिवस राहतो, शेतकऱ्यांचा वैयक्तिक कोड प्रत्येक तोडणी कार्यक्रमानुसार बदलतो का तोच कायम राहतो, गटावरील कर्मचाऱ्यांकडून पावती देताना चूक झाली असेल तर दुरुस्ती साठी किती कालावधी लागतो, मेघराज नागोराव शिंदे या शेतकऱ्याच्या नावे किती ऊस आहे २०२१-२२ या गळीत हंगामासाठी असलेल्या उसाच्या नोंदीचा आणि चालू गळीत हंगामात आत्तापर्यंत आलेल्या ऊसाचा तपशील देण्यात यावा, तोडणी वाहतूक ठेकेदार आणि कर्मचारी ऊस तोडणीसाठी व वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करीत आहेत त्याशिवाय तोड होत नाही. याबाबत काय कार्यवाही करणार अशी विचारणा एका लेखी निवेदनाद्वारे कार्यकारी संचालक यांच्याकडे राजेश कराड यांनी केली आहे.
चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने यापूर्वीही ऊस चोरीचे प्रकार घडले असतील अशी भावना शेतकऱ्यांत निर्माण झाली असून पारदर्शकतेचा कारभार म्हणून टेंभा मिरवणार्या मांजरा परिवाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रकार होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देऊन भाजपा नेते राजेश कराड म्हणाले की, स्वतःला सहकार महर्षी समजणाऱ्यांनी ऊस चोरीच्या प्रकरणात कार्यरत असलेली साखळी शोधून काढावी, शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवून न्याय द्यावा अन्यथा येत्या काळात शेतकऱ्यांना आक्रमकपणे आंदोलन करावे लागेल असे बोलून दाखवले.