मर्यादा असल्या तरीही कोविडवर
लस हाच विश्वासार्ह उपाय – डॉ. मुकुंद भिसे
सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व
मराठी विज्ञान परिषदेतर्फे कोरोना जागर उपक्रम
लातूर –
कोरोनाच्या लसीबाबत अनेकांच्या मनात शंका असल्या व लसीकरणाच्या कितीही मर्यादा असल्या तरी, सध्या तरी कोविडच्या गंभीर आजारापासून बचावासाठी लस हाच सर्वंकष रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन लातूरच्या एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील जनआरोग्य विभागप्रमुख डॉ. मुकुंद भिसे यांनी केले. कोरोना संदर्भातील विविध बाबींवरील जनमानसातील गैरसमज दूर व्हावेत यासाठी पानगाव येथील सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे आयोजित ‘कोरोना जागर’ दूरसंपर्क परिसंवादाच्या सहाव्या सत्रात ते बोलत होते.
आपल्या व्याख्यानात डॉ. मुकुंद भिसे यांनी लस म्हणजे काय, ती तयार कशी होते व शरीरात ती कशा प्रक्रियांनी प्रतिकारशक्ती निर्माण करते अशा अनेक शास्त्रोक्त बाबींवर विस्तृत विवेचन केले. तसेच, बहुचर्चित उपलब्ध कोव्हीशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक लसी, त्यांचे प्रकार आणि निर्मिती व प्रभावक्षमता याची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे, लस कधी घ्यावी व कधी घेवू नये – विशेषत: गरोदर, स्तनदा व मासिक पाळीच्या अवस्थेत लस घ्यावी किंवा नाही – याबाबतच्या अनेक प्रश्नांची सप्रमाण उकल अतिशय सोप्या भाषेत केली. जागतिक व राष्ट्रीय पातळीवर लस, लसीकरणाचे परिणाम, पद्धती, निरीक्षणे, सर्वेक्षणे यांचाही गोषवारा त्यांनी यावेळी सादर केला व अनेक गैरसमजुतीचे निराकरण केले. मिरज येथील शासकीय महाविद्यालयातील सुप्रसिद्ध तज्ज्ञा डॉ. प्रिया देशपांडे यांनीही तिसऱ्या लाटेची शक्यता, लसीची परिणामकारकता अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ‘नियम पाळणाऱ्यांची संख्या, नियम न पाळणाऱ्यांपेक्षा अधिक होईल तसतशी, प्रसाराच्या धोक्याची शक्यता कमी होत जाईल’ असे विधान डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले. लस घेतली, तरीही विषाणूच्या उत्परिवर्तन व प्रसारक्षमतेनुसार प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची गरज दोन्ही तज्ज्ञांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती विभागाचे कार्यवाह श्री. दिलीप हेर्लेकर, किशोर कुलकर्णी (मुंबई), अॅड. रजनी गिरवलकर, प्रा. राजेश कटके, प्रा. मनोहर कबाडे, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. जे.जे. देशपांडे, किशोर कुलकर्णी, डॉ. सदानंद कुलकर्णी अशा मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर श्रोत्यांची हजेरी होती. याप्रसंगी श्रोत्यांच्या असंख्य प्रश्नांना दोन्ही तज्ज्ञांनी अतयंत आस्थेवाईकपणे उत्तरे देवून शंकासमाधान केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. संतोष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले व पुढील रविवारी ‘कोविड पश्चात आरोग्य समस्या, निदान व उपचार’ या विषयावर डॉ. शिरीष पाटील यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली.
नागरीक, विद्यार्थी, शिक्षक व सुजाण नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.