लातूरला औद्योगिक तसेच व्यापारी केंद्र म्हणून
विकसित करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत.
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
व्दारकादास शामकुमार ग्रुपच्या डी.एस.एक्सक्लूजीव नवीन शोरूमचे उद्घाटन
लातूर प्रतिनिधी : दि. २९ मार्च २०२२ :
शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या लातूरला आता औद्योगिक तसेच व्यापारी केंद्र म्हणून विकसित करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. याकरीता लातूरमध्ये गुंतवणूकदारांसाठी सुरक्षेची हमी देऊन रेड कार्पेट टाकण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
लातूर शहरातील अंबाजोगाई रोड येथील द्वारकदास शामकुमार ग्रुपच्या वतीने लातूर येथे तुकाराम पाटील यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या डी.एस.एक्सक्लूजीव वस्त्र दालनाचा शुभारंभ पालकमंत्री ना. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलत होते.
यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख पूढे बोलतांना म्हणाले, लातूरची प्रगती येथील नागरिकांनी स्वकर्तृत्वातून आणली आहे. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असलेल्या लातूरच्या प्रगतीला आणखीन मोठा वाव आहे. या विकासाच्या वाटचालीला उत्तम सामाजिक सलोखा आणि चांगली कायदा आणि सुव्यवस्था असल्यामुळेच गती मीळत आहे असून लातूरच्या विकासाची भूक मोठी आहे. हे ओळखून आपल्याला वाटचाल करावी लागेल असे सांगितले.
तसेच शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या लातूरला आता औद्योगिक तसेच व्यापारी केंद्र म्हणून विकसित करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. याकरीता लातूरमध्ये गुंतवणूकदारांसाठी सुरक्षेची हमी देऊन रेड कार्पेट टाकण्यात येईल. कृषी उत्पादनात आघाडीवर असलेल्या लातूरमध्ये या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मध्यवर्ती केंद्र निर्माण करण्याचे नियोजन आहे. लातूर विमानतळ लवकर सुरू होईल शिवाय येथून हाय स्पीड रेल्वे सुरू करण्याचाही प्रयत्न आहे. लातूरला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या प्रत्येकाला प्रोत्साहन आणि सहकार्य करण्याची आपली भूमिका असल्याचे यावेळी बोलताना सांगून पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सर्व क्षेत्रात वेगाने विकसित होत असलेल्या लातूरची गरज ओळखून सुरू झालेल्या डी.एस.एक्सक्लूजीव वस्त्र दालनामुळे शहराच्या वैभवात भर पडल्याचे नमूद करून यावेळी पाटील परिवाराला शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख, सचिव अभय साळुंके, माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक सुभाष सोमानी, द्वारकादास श्यामकुमार ग्रुपचे श्यामकुमार माहेश्वरी, महेश सोमानी, सदाशिव पाटील, राजू पाटील, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राम बोरगावकर, संतोष बिराजदार, डॉ. भराटे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, लक्ष्मीकांत कर्वा, योगेश कर्वा आदीसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, व्यापारी, पाटील कुटूंबीय मित्र परिवार उपस्थित होते.
यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून तुकाराम पाटील कुटुंबीयांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक द्वारकादास श्याम कुमार ग्रुपचे तुकाराम पाटील यांनी करून व्यवसायाची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले तर शेवटी आभार प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी मानले.