23.1 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeमनोरंजनदि काश्मीर फाईल्स:उत्तम चित्रपट

दि काश्मीर फाईल्स:उत्तम चित्रपट

सिनेमा सिनेमा

लातूरला ‘अभिजात फिल्म सोसायटी’च्या माध्यमातून ‘दि काश्मीर फाईल्स’ पाहिला. शिवाय, उत्तम चित्रपट गांभीर्यानं बघणाऱ्या प्रेक्षक वर्गासोबत, रसभंग न होता बघण्याचा अनुभव ‘अभिजात फिल्म सोसायटी’सारख्याच माध्यमातून मिळू शकतो.

चित्रपट पाहून सुन्न झालो. चित्रपटगृहातून बाहेर पडताना अननुभूत शांततेतच प्रत्येकाच्या मनातली ही सुन्नता, अस्वस्थता जाणवत होती. एरवी गप्पागोष्टी, ताबडतोबीने व अहमहमिकेने चित्रपटाबद्दल मतप्रदर्शन करण्याची मानसिकताच राहिली नव्हती.

माझ्या दृष्टीने तर – मग ती कथा-कविता-कादंबरी असो, की चित्र-चित्रपट-नाटक-संगीतसभा असो – अस्वस्थ करते तीच खरी कला. हा अनुभव ह्या चित्रपटाने दिला.

अर्थात, त्याला विचारभावनांची पूर्वपीठिका होतीच, पण चित्रपट त्याला न्याय देण्यात खरा उतरला ही पावतीही आहेच. कारण, चित्रपट पाहून बाहेर येताना मुळातले विचारवाद, सामाजिक-राजकीय-वैचारिक बांधिलकी, थोडेफार गैरसमज, पूर्वग्रह, शंका-कुशंका सगळं सगळं गळून पडलं. मनात आक्रोश, उद्विग्नता निर्माण झाली आणि कितीही क्रौर्यकथा वाचल्या, पाहिल्या असल्या तरी आपल्या देशाच्या शिरावर असलेल्या सौंदर्यमुकुटाआतले हिणकस काटे जिव्हाळ्याच्या जखमा करत गेले.
‘काश्मिरी पंडित’ हे आपले, भारतीय लोक असूनही आपण त्यांच्याबाबतीत इतके उदासीन कसे राहिलो, ह्याबाबतही लाज, चिंता, खंत, दुःख, कबुली अशा भावनांच्या गर्दीत मानवी छळाबाबतचा करुण सूर उमटत राहिला. कसला धर्म, कसला देशप्रदेश, कसली संस्कृती आणि कसली अस्मिता आपण साम्राज्यमालकीच्या हव्यासापायी बाळगतो, याची अपराधी भावना एकवटली. हे सगळं घडत असताना आपणही ह्याच काळात जगत होतो, माजत होतो याबद्दल खेद वाटला. मानवी अमानुषतेचे अत्याचार आणि अपरंपार क्रौर्याचा बलात्कार प्रत्यक्ष भोगत असलेला एक मानवी समाज इतिहासात वाचला, चित्रपटांतून पाहिला – पण तो आपणही जिवंत असताना होता आणि दुर्लक्षित होत होता. पशूही इतके क्रूर आणि भावनाशून्य असत नाहीत. धर्मावरून अत्याचार करणं हे घृणास्पदच. अत्याचार भोगत असलेल्याचा धर्म बघणे हाही अत्याचारच खरं तर. पण तो घडतो, घडवला जातो आणि सोयीनुसारच दडपला किंवा उघड केला जातो, हे असह्य आहे. हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. पाहिजे तेवढा हा चित्रपट उघड, बेडर आहेच पण तरीही तो आततायी नाही. ‘फाईल्स’ असल्या तरी चित्रपट अहवालपट, माहितीपट नाही. तो जातो मानवी मूल्यांच्या आणि भावभावनांच्या अंगानं.
ही किमया साधली गेली आहे, ती प्रांजळपणामुळे. आव आणण्यासाठी अकारण भेदक करण्याचा प्रयत्नही कुठे दिसून येत नाही. अकारण विनोदपेरणी करून किंवा अकारण भय किंवा कारुण्य निर्माण करणारे प्रभावयुक्ती वापरलेली नाही.

पण एक मात्र वाटते, की एकतर अजूनही हा चित्रपट चांगला होवू शकला असताच.

दुसरे म्हणजे, राजकारण हा विषय ह्या चित्रपटात चर्चिला गेला आहेच. तो समजून घेणे आवश्यक आहे. एकाच राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात त्याचा प्रचारासाठी वापर होवू नये. हा त्या चित्रपटाला दिलेल्या हाताळणीवर अन्याय ठरेल. एकूणच लोकांच्या खऱ्या प्रश्नांकडे धाडसाने आणि संवेदनशीलतेने न बघणाऱ्या राजकीय सवयी, सोयी आणि विकृतींचाच पर्दाफाश ह्या चित्रपटात आहे. त्यावर आपल्या पोळ्या भाजणाऱ्या हिणकस विचारसरणीचाही पर्दाफाश आहे. पण तरीही, बळी पडलेल्यांची तुलनेनं दुर्लक्षित कैफियत जाहीरपणे, प्रभावीपणे आणि भडकपणा टाळून, शक्य तितक्या संतुलित व संयत पद्धतीने पडद्यावर मांडणे हाच चित्रपटाचा उद्देश असावा, असे पटकथेच्या संगीत, चित्रीकरण, संवाद, अभिनय अशा सर्वच घटकांसह हाताळणी, मांडणीवरून वाटले. सत्यांकित घटनाप्रसंग भडक करून दाखवणे शक्य असून, संधी असूनही आणि मुख्य म्हणजे ओटीटी वा एकूणच माध्यमांच्या भरमारीमुळे प्रेक्षकांना भडकपणाची सवय झालेली असूनही हा चित्रपट मात्र मुख्य प्रश्न सत्याधोरेखित होण्याइतपत प्रामाणिकपणे मांडण्यात यशस्वी होताना दिसला. किंबहुना आविष्कारातील प्रामाणिकपणामुळेच मूळ प्रश्न अधिकाधिक स्वच्छपणे दिसत राहिला.

दुसरे यश मला अधिक आशादायी वाटले. ते म्हणजे दृश्य बघण्याबरोबरच एखादी प्रभावी तक्रार ‘ऐकून घेण्या’साठी प्रेक्षक तयार करण्याचा प्रयत्न. अधूनमधून ‘नॕरेटिव्ह’ असूनही संवाद कंटाळवाणे किंवा रुक्ष वाटत नाहीत. हे कलावंतांच्या चेहऱ्यांवरील साहजिक आणि प्रामाणिक चर्याभिनयाचं यश आहे.

एकूण, विदारक आणि भयंकर दुःख भोगणाऱ्याचे रुदन अनुभवण्याची अनुभूती ह्या चित्रपटाने दिली.
ह्या विषयावरचा हा आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट वाटला. ‘हैदर’ छान होता. ‘तहान’ ही सुंदर होता. ‘मिशन काश्मिर’, ‘फिजा’ हे व्यावसायिक चित्रपट असले, तरी प्रभावी मांडणीमुळे काश्मीर प्रश्नानं मनात एक अस्वस्थ कोपरा निर्माण केला होता. ‘शिकारा’ मात्र काश्मीर प्रश्नाचा वापर केलेली निवळ फसवणूक होती.
सारख्याच पद्धतीने सादर करण्यात आलेल्या ‘दि ताश्कंद फाईल्स’पेक्षा ‘दि काश्मिर फाईल्स’ अधिक सरस आणि सराईत वाटला. (‘दि ताश्कंद फाईल्स’ मधल्या काही इंग्रजी संवादात तर चक्क व्याकरणाच्या चुका होत्या.)

काही वर्षांपूर्वी प्राचार्य
ना. य. डोळे सरांचे (मराठवाड्यातील ख्यातनाम दिवंगत समाजवादी विचारवंत व राज्यशास्त्र, समाजशास्त्र विषयांचे गाढे अभ्यासक) महाराष्ट्र अकादमी पुरस्कार विजेते पुस्तक ‘काश्मीर प्रश्न’ पारायणालाच घेतले होते. राष्ट्र सेवा दलातर्फे समाजवादी मार्गदर्शक नेते आदरणीय पन्नालालजी सुराणा यांच्यासह ऐन धगधगीतच करण्यात आलेल्या काश्मीरच्या अभ्यासदौऱ्यावरून परत आल्यावर हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यावरही त्यांच्यावर ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची टीका झाली होती. त्यात हा प्रश्न पुसटसा आला आहे, हेही खरे आहे. पण हेही खरे आहे, की ज्या हृदयनाथ वांच्छू या समाजवादी विचारवंताकडे ते राहिले, त्यांचीही हा अभ्यासदौरा संपल्यानंतर काही दिवसांतच अतिरेक्यांनी हत्या केली. वांच्छू स्थानिकांचे समन्वयवादी भूमिकेतून धीर देत मतपरिवर्तन करू पाहत होते. त्यांचा उल्लेख कुठे चित्रपटात येईल अशी भाबडी प्रतीक्षा मनोमन करत राहिलो. अर्थात, पं. वांच्छू हे वकुबानं, हुद्द्यानं फार मोठे, महत्वाचे नसतील; पण अशी मंडळी तिथं कार्य करत होती आणि तीही दहशतवाद्यांना नकोशी होती, हे मात्र ह्या घटनेतून नोंदवता येते.

आता फक्त एकच – हा चित्रपट हिंदुत्ववादी आणि (म्हणून) मुस्लिमविरोधी (किंवा त्याउलटही) असा समज होतो आहे. दुर्दैवाने अनेक बाजूंचा धार्मिक आणि राजकीय अभिनिवेश त्याला कारणीभूत ठरताना दिसतो आहे. अनेक ठिकाणी हा चित्रपट दाखवला जाऊ नये, असे प्रयत्न होत असल्याच्या वदंता आहेत. त्यामुळे ह्या चित्रपटातील मुख्य वेदना. मुख्य समस्या सौम्य व अतथ्य ठरण्यास मदत होईल असे प्रयत्न कुणी करू नयेत , ही अपेक्षा आहे. पण ते आपल्या हाती नाही.

आत्ताच काही मतमतांतरं वाचनात आली. ह्यावर चित्रपट निघावा, त्यावर निघावा. कुणी गुजरात फाईल्सची मागणी करतो आहे, कुणी दिल्लीतल्या शीख शिरकाणाची. कुणी गांधीहत्येनंतरच्या दंगलीच्या फाईल्सची, कुणी कोठेवाडी-खैरलांजी फाईल्सचीही करील. अशा अनेक ‘फाईल्स’ इतिहासाने गिळल्या आहेत, त्यामुळे असे चित्रपट निघतीलही. पण त्यामागच्या प्रेरणा ध्रुवांकित नसतील तर फक्त सूडाचे पुढचे अध्याय लिहिले जातील.

… आणि प्रामाणिक प्रेरणांनी, सत्य मांडण्याच्या जिद्दीने व धाडसाने तटस्थ कलावादी राहून निर्माण झाले, तर मात्र त्यातून डकार फक्त मानवी नृंशसतेचा, क्रौर्याचाच आणि हुंकारही मानवी वेदनेचाच आहे, असेल. हे लक्षात घेवून हे चित्रपट पाहून व्यथित होणाऱ्यांनी काय घ्यायचं हे शिकवणारा संस्कारपट ह्या चित्रपटांनी दिला, तर ते खरं परिवर्तन असेल, ती खरी चळवळ असेल.

… अर्थात, अशा विषयांवरच्या प्रश्नांना चित्रपटबाह्य, कलाबाह्य घटक अभावितपणे, संभावितपणे जोडले जाणारच. जेवढ्या न्याय्य आणि संयतपणे चित्रकथानक दाखवले गेले आहे व एक महत्वाचा दुर्लक्षित प्रश्न मांडण्यात आला आहे, तितकेच आपण किती न्याय्य आणि संयतपणे त्याला प्रतिसाद, प्रतिक्रिया देतो ह्यावर त्याचे यश ठरणारे असू शकते.

संतोष कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]