शेतकर्यांच्या ऊस प्रश्नासाठी न्यायालयात रीट याचिका दाखल करणार
पत्रकार परिषद : माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची माहिती
लातूर दि.७
लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्यामुळे ऊसाचे लागवड क्षेत्रही मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. परंतु कारखान्याच्या मनमानीपणामुळे शेतकरी सभासद असतानाही त्यांचा ऊस वेळेत कारखान्याला जात नाही. कारखान्याच्या फायद्यासाठी गेटकेन प्रक्रियेद्वारे कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणला जात आहे. त्यामध्ये सभासद व कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत सहकार क्षेत्रातील कारखानदारांनी शेतकर्यांचा ऊस वेळेत घेवून जावा, शेतकर्यांच्या ऊसाला एफआरपीप्रमाणे भाव द्यावा. 14 दिवसानंतरही ऊसाचे बील वेळेत न मिळाल्यास पंधरा टक्के व्याजदरासह शेतकर्यांची ऊस बीलाची रक्कम अदा करावी लागेल. तरीही शेतकर्याला न्याय न मिळाल्यास मा.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून शेतकर्याला न्याय मिळवून देऊ, असे प्रतिपादन भाजपा नेते भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य तथा गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या लातूर मार्केट यार्ड लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बँकेचे सल्लागार संचालक निळकंठराव पवार, भाजपाचे जिल्हा चिटणीस बाबासाहेब देशमुख, शिवराम कदम, जननायक संघटनेचे लातूर तालुकाध्यक्ष राजाभाऊ मुळे, एम.एन.एस.बँकेचे कार्यकारी संचालक अमरदीप जाधव, जॉईंट एम.डी.बाळासाहेब मोहिते यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, साखर उपायुक्त नांदेड यांच्या माहितीनुसार 2020-21 मध्ये मांजरा कारखान्याने 2300 भाव दिलेला असून त्यापैकी 475 देणे बाकी आहे. विकास ने 2300 दिला असून 399 देणे बाकी आहे. रेणानेही 2300 दिलेला असून 556 देणे बाकी आहे. हे लातूर जिल्यातील कारखानदारीचं वास्तव असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना या कारखान्याच्या माध्यमातून सर्वसमावेशक न्याय मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी हिताचा विचार करून शेतकर्यासाठी विवेकानंद शुगर कारखान्याची उभारणी इथेनॉलसहीत करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दिले.
चाळीस वर्षात एकही उद्योग नाही.
लातूर शहर व जिल्ह्याचे राजकारण करणार्यांनी आठ वर्ष मुख्यमंत्री पद अन् वीस वर्ष मंत्री पदावर काम केले. तरीही लातूरसारख्या प्रगतशील शहरामध्ये साधा एकही उद्योग त्यांना आणता आलेला नाही. शरदराव पवार साहेबांनी बारामती व बँगलोरच्या धर्तीवर पुण्याचा विकास करून आयटीमध्ये पुणे शहराला देशात क्रमांक एकवरती आणण्याचे काम केलेला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, तत्कालिन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व आ.अभिमन्यू पवार यांनी लातूरात बोगीचा कारखाना आणून पाच हजार तरूणांना रोजगार देण्याचे काम केलेले आहे. ही आनंदाची बाब आहे. परंतु लातूरचे राजकारण करणार्या सत्ताधार्यांनी मात्र साडेआठ वर्ष मुख्यमंत्री व वीसवर्ष मंत्री पदावर काम करूनही गेल्या चाळीस वर्षात लातूरकरांसाठी एकही उद्योग आणलेला नाही. त्यामुळे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशी टिकाही भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.