विकासपुरुष स्व.हरिभाऊ इदलकंटे प्रवेशद्वाराचे महा-कर्नाटक सिमेलगत लोकार्पण
लातूर जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपाचा झेंडा फडकणार
शिरोळ येथील विविध विकास कामाच्या उद्धाटन प्रसंगी आ. रमेशअप्पा कराड
लातूर दि.०६–
भाजपाच्या नेतृत्वा खालील लातूर जिल्हा परिषदेने विविध विभागामार्फत केलेल्या कामातून आपला वेगळा ठसा संपूर्ण राज्यात निर्माण केला आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मतदार संघात कोटयावधीची विकास कामे झाली आहेत. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका भाजपा ताकतीने लढणार असून जिल्हयातील सर्व नेत्यांच्या समन्वयातून पुन्हा एकदा लातूर जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
उदगीर तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या शिरोळ (जा) येथे लोकसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य घालविलेल्या विकास पुरुष स्व. हरिभाऊ आत्माराम इदलकंटे स्वागत कमानीचे लोकार्पण, भाजपा कार्यालयाचे उद्धाटन आणि जिल्हा परिषद व इतर शासनाच्या योजनेतील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते शनिवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे होते. या कार्यक्रमास भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, प्रदेश भाजपाचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जिपच्या उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, विक्रम शिंदे, तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, पंडितराव सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड आणि भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड यांनी अत्यंत देखण्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिरोळ गावातील आणि पंचक्रोशीतील दहा-बारा गावातील सरपंच चेअरमन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे गावात आगमन होताच फटाके फोडून, वाजत गाजत मोठया जल्लोषाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले.
गावाला विकासाच्या दिशेने घेवून जाणारे स्व. हरीभाऊ इदलकंटे त्यांच्यात दैवी गुण असल्याने सर्वजण कौतूक करतात. बापुराव राठोड यांनी स्वखर्चातून त्यांचे स्मरण व्हावे यासाठी उभारलेली स्वागत कमान निश्चितपणे प्रेरणा देईल. कर्तूत्व आणि दातृत्व असलेल्या बापुराव राठोड यांना जातीपातीच्या पलिकडे जावून सर्वांचे आशिर्वाद आहेत असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना मोठया प्रमाणात विविध योजनेचा लाभ मिळवून दिला. अनेक अभिनव उपक्रम राबविले. जी काही कामे आज ग्रामीण भागात सुरू आहेत ती सर्व कामे केंद्र शासन आणि जिपच्या माध्यमातून होत आहेत. गेल्या अडीच वर्षात राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कसल्याही प्रकारचा ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी दिलेला नाही. तेव्हा येणाऱ्या काळात होणाऱ्या जिप पंस निवडणुकीत विकास कामाच्या पाठीशी राहून भाजपला साथ द्यावी, समर्थन द्यावे असे आवाहन आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.
भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अनेक योजना चुलीपर्यंत पोहंचविल्या तर भाजपाच्या द्वेशातून सत्तेवर आलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात विकास कामांना निधी दिला नाही अथवा कोणती नवी योजना आणली नाही. उलट देवेंद्रजीच्या काळातील अनेक चांगल्या योजना बंद पाडल्या असे सांगून भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की, प्रत्येक उंबरठयाचा विकास हाच आमचा ध्यास याप्रमाणे लातूर जिल्हा परिषदेचे काम अत्यंत उल्लेखनीय काम झाले असून बोलक्या शाळा निर्माण केल्या, शेतकऱ्यांच्या बांधावर बैठका घेतल्या, अंगणवाड्या सक्षम केल्या, आरोग्य कर्मचारी आणि औषध पुरवठा आरोग्य केंद्रांना मुबलक केला असल्याचे सांगून येत्या काळात भाजपाला साथ द्यावी असे आवाहन केले.
राज्यातील ठाकरे सरकारमुळेच ओबीसीचे आरक्षण गेले. आज राजकीय आरक्षण नाकारले, उद्या शैक्षणिक आरक्षण गेल्याशिवाय राहणार नाही अशी भिती व्यक्त करून जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत निवडणुका नको ही भाजपाची भूमिका असून येत्या ९ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या ओबीसी बांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे यांनी केले तर माजी आमदार सुधाकर भालेराव, जिपचे अध्यक्ष राहूल केंद्रे, पंडीतराव सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टिका केली.
प्रारंभी प्रास्ताविक करताना बापुराव राठोड म्हणाले की, जातीपातीच्या पलिकडे जावून मतदारांनी मला मोठया प्रमाणात साथ दिल्याने शिरोळसह जिप मतदार संघातील सर्वच गावात कोटयावधी रूपये खर्चाच्या विविध योजना राबविल्या असून या सर्कलमध्ये असलेल्या आठ दहा सर्वच बंजारा वस्तीत सेवालाल भवन उभारले. वस्त्यांना जोडणारे रस्ते केले. पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. या सर्व कामामुळे सर्कलमधील जवळपास सर्वच सरंपच भाजपाचे आहेत अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किशोर पाटील यांनी केले तर शेवटी योगीराज कानडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, बालाजी गवारे, शेषराव ममाळे, सतीश आंबेकर, भागवत सोट, शिवाजी बैनगिरे, साईनाथ चिमेगावे, दिलीप मजगे, अमोल निडवदे, उदयसिंह ठाकुर, विजय पाटील, पंडित सुकळीकर, शिरोळच्या सरपंच संगिता काळगापुरे, सुभाष पाटील, प्रल्हाद मद्दे, रामदास काळगापुरे, संदिप जाधव, गंगाधर बिरादार, रामभाऊ जवळगे, शन्मुख कानडे, अस्लम पटेल यांच्यासह शिरोळ आणि आजूबाजूच्या गावातील सरपंच, चेअरमन, भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.