लातूरचे प्रतिष्ठीत डॉक्टर आनंद गोरे यांना काल शिवाजी चौकात किरकोळ प्रकरणावरुन वाहतूक पोलिसांने घातलेला वाद आणि केलेली मारहाण ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सरकारी सेवकाने डॉक्टरांशीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांबरोबर सौजन्यानेच वागले पाहीजे. लातूरमधील जनता ही पोलिस प्रेमी आहे. शहराची गुंडगिरी मोडून काढणाऱ्या नवीन पटनाईक यांचे लातूरकर नेहमी स्मरण करतात. त्यामुळे पोलिसांची जरब नागरिकांवर नाही तर आरोपींवर पाहीजे. पण डॉ. गोरे प्रकरणात पोलिसांकडून संयम सुटला आणि ही दुर्दैवी घटना घडली. अशा घटना लातूरच्या संस्कृतीला धक्का देनाऱ्या आहेतच, पण पोलिसांच्या प्रतिमेलाही डाग लावणाऱ्या आहेत. म्हणून पोलिसांनी आणि नागरिकांनी या दोघांनी आपल्या शहराच्या संस्कृतीला धक्का बसेल असे वर्तन करायला नको असते.
महिला मध्ये आल्याने अचानक गाडी थांबविली म्हणून एखादे प्रकरण किती वाढवायला हवे ? हे वाढू नये याची काळजी घेतली गेली असती तर ही घटनाच घडली नसती. डॉक्टर ही समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. याचा अर्थ त्यांना कायदा नाही, असा होत नाही. परंतु किरकोळ प्रकरणावरून एखाद्या गोष्टीचे भांडवल करुन त्यांना मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून पोलिसांना माझी विनंती आहे की अशा घटना सामोपचाराने मिटवायला हव्यात. पोलिस आणि नागरिक यांच्यातील मैत्री वाढविण्यासाठी अशी प्रकरणे संयमाने हाताळली तर लातूरच्या एकोप्याच्या संस्कृतीची नक्की जपणूक होईल.
अजय ठक्कर