कोविडविषयक सन्मानकार्यात लातूर जिल्हाधिकारी कार्यालय सदैव तत्पर :
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
लातूर :
लातूर जिल्ह्यात कोविडकाळात सर्व थरांतून नागरिकांनी विलक्षण सामाजिक जाणिवेचा परिचय दिला असून, वैद्यकव्यवसायी व कर्मचारी यांच्यासोबत पोलीस व महापालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांनी आपापसांत खूप सलोख्याने सहकार्य दिले, त्याबद्दल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रशंसोद्गार काढले व अजूनही कोविडविषयक कार्यात प्रशासनाचे तत्पर सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. कोविडविषयक शास्त्रोक्त माहिती देवून जनजागृती व जनमानस बांधणीचे कार्य अतिशय मोलाचे असल्याची प्रतिक्रिया देवून सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या कार्याची वाखाणणी केली.
सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागाच्या ‘कोरोना जागर’ या जनजागृती परिसंवाद मालिकेतील वैद्यकव्यवसायी साधन व्यक्तींचा प्रतिष्ठानच्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त कृतज्ञतापर सन्मान आयोजित करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात लातूरच्या एम. आय. एम. एस. आर. वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी.एस. नागोबा, जनआरोग्य वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मुकुंद भिसे, शरीररचनाशास्त्र विभागाचे डॉ. महेश उगले, औषधनिर्माणशास्त्र विभागाचे डॉ. अभिजीत मुगळीकर, लातूर येथील कृष्णा विश्लेषक प्रयोगशाळेच्या डॉ. ऋजुता अयाचित, अतिदक्षतातज्ज्ञ डॉ. शिरीष पाटील, डॉ. सौ. सुनिता पाटील, डॉ. अरुण मोरे, मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. सौ. अनघा राजपूत, डॉ. दिनेश पाटील व मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. प्रिया देशपांडे या मान्यवर अनुभवी व संशोधक तज्ज्ञांचा त्यांच्या ‘कोरोना जागर’ या उपक्रमातील निर्व्याज योगदानाबद्दल जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, कोविडमृतांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या लातूर महापालिकेतील सेवाकर्मी स्वच्छता निरीक्षक श्री. सिद्धाजी अंबादास मोरे यांचाही याप्रसंगी हृद्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष . डॉ. श्री. विश्वास कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात कोविडकाळातील शल्यचिकित्सेची नियमावली सांगून अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व लातूरमधील ‘स्पंदन’ या लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची माहिती दिली. प्रमुख पाहुणे डॉ. श्री. अशोक आरदवाढ यांनीही अल्पावधीतच आपल्या कार्याच्या सत्त्यातून नावारूपाला आलेल्या प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा केली. याप्रसंगी, प्रा. मनोहर कबाडे यांच्या प्रास्ताविकासह सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या ‘कोरोना जागर’ या उपक्रमातून निर्माण करण्यात आलेल्या कोरोनाविषयक साहित्याची व इतर उपक्रमांची चित्रफितीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे अतिशय रंगतदार सूत्रसंचालन रंगकर्मी श्री. संजय अयाचित यांनी केले. डॉ. शारंग कुलकर्णी यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले. याप्रसंगी डॉ. अनुजा कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रदीप नणंदकर, गोपाळ कुळकर्णी, अनेक प्रतिष्ठित नागरिक कोविडविषयक नियमांचे पालन करून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ममता हॉस्पिटलमधील श्री. सोमनाथ हुमनाबादे व सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.