भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांची प्रतिक्रिया
लातूर दि.०१– पायाभूत सुविधा बरोबरच महिला, शेतकरी, कष्टकरी युवावर्गासह सर्वच घटकांना दिलासा देणारा विषेशता शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतीच्या विविध सोयीसुविधा देणारा केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामण यांनी आज मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सर्वांचा विकास हाच नरेंद्र मोदी सरकारचा ध्यास या अर्थसंकल्पावरून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रीमंडळातील केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामण यांनी सन २०२२-२३ या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवारी संसदेत सादर केला. संपूर्ण देशवासीयांच्या अपेक्षा पुर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून कोरोनाच्या मोठया संकटानंतर देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे. संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात निर्मला सितारामण यांनी महिला, शेतकरी, कष्टकरी युवावर्गासह सर्वच घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. शेतीला प्राधान्य दिले आहे. ड्रोनच्या माध्यमातून पिकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार असून तेल बियांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषी उत्पादने स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यासाठी डिजीटल सेवा देवून शेतकऱ्यांचे धान्य मोठया प्रमाणात खरेदी करण्याची ग्वाही देवून शेतीविषयक महाविद्यालय सूरू करण्यात येणार असल्याचे या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आले.
उद्योगधंदे, रेल्वे, रस्ते, आरोग्य यासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक करणार असल्याचे घोषीत करण्यात आले आहे. पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून सुरू होणारी नेट बॅकींग सेवा ग्रामीण भागातील जनतेसाठी ही सुविधा मोठी दिलासा देणारी ठरणार आहे. अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेतून शिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे तर डिजीडल शिक्षण पध्दतीवर भर देण्यात आला आहे. मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प पुढील २५ वर्षाच्या सर्वांगीन विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याचेही आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.