राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान
– खा.सुधाकरराव शृंगारे
लातूर रेल्वे स्थानकावर १०० फूट उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण
लातूर/प्रतिनिधी: राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाचा सन्मान आहे.लातूर रेल्वे स्थानक परिसरात उभारण्यात आलेला १०० फूट उंचीचा राष्ट्रध्वज राष्ट्रभक्ती तेवत ठेवण्याचे काम करेल,असे मत खा. सुधाकरराव शृंगारे यांनी व्यक्त केले. लातूर रेल्वे स्थानक परिसरात १०० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण खा. सुधाकरराव शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास रेल्वेचे सोलापूर विभाग प्रबंधक शैलेश गुप्ता, भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव,जि. प. चे सभापती रोहिदास वाघमारे,व्हीएस पॅंथर संघटनेचे अध्यक्ष विनोद खटके,प्रदीप बनसोडे,वैष्णव अभिनय,शैलेश कुमार निरंजन,अमन कुमार आदींसह रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना खा.सुधाकरराव शृंगारे म्हणाले की,तिरंगा राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान आहे.प्रत्येकाच्या मनात त्याविषयी आदर आहे. राष्ट्रभक्ती तेवत ठेवण्याचे काम राष्ट्रध्वज करतो. तिरंग्याला पाहिल्यानंतर सामान्य भारतीय सलामी देतो.स्वातंत्र्यापासून आजवर भारतीय राष्ट्रध्वज सन्मानाने डौलत आहे.भारत देशाच्या कामगिरीची पताकाही जागतिक पातळीवर फडकत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात विकास कामे गतीने केली जात आहेत.यामुळे आज जगात भारताचे नाव सन्मानाने घेतले जात असल्याचेही खा.शृंगारे यांनी सांगितले. प्रारंभी रेल्वेच्या वतीने खा. सुधाकरराव शृंगारे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.