फडणवीस यांचा पुण्यात माध्यमांशी संवाद
विविधफडणवीस यांचा पुण्यात माध्यमांशी संवाद कार्यक्रमांसाठी आज पुण्यात आलो असताना दुपारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
– ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील. येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन-चतुर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे का, अशी शंका येते.
– ओबीसी आरक्षणासंदर्भात 13 डिसेंबर 2019 ते 4 मार्च 2021 या संपूर्ण कालावधीत राज्य सरकारने काय कारवाई केली, हा प्रश्न विचारला का? कुणी कसेही वागले तरी विचारवंतांवर आम्ही टीका करीत नाही.
– एम्पिरिकल डेटा गोळा करणे हे 4 महिन्यांचे काम. हे काम सहज होऊ शकणारे आहे. मी हेच म्हटले की, जर तुम्हाला जमत नसेल तर मला सूत्र द्या, मी करून दाखवितो. आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो.
– मी असो की डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे तयार झालेले कार्यकर्ते. पंकजाताईंनी मांडलेली भूमिका हीच भाजपाची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे.
– केंद्रात सहकार खाते नव्हते, तर म्हणायचे केंद्र सरकार सहकाराला मारतं आहे. आता 70 वर्षांनी पहिल्यांदा सहकार खाते तयार झाले, तर म्हणतात की, सहकाराचा केंद्राशी काय संबंध? या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह हे राजकारणात येण्यापूर्वी सहकारात होते. गुजरातमध्ये सहकारात त्यांनी केलेले काम अतिशय मोठे आहे. त्यामुळे स्वाभाविकच हे खाते त्यांच्याकडे गेले.
– अतिशय जबाबदारीने सांगतो, भाजपाच्या एकाही आमदाराने पिठासीन अध्यक्षांना शिवी दिलेली नाही. शिवी कुणी दिली, हे मी योग्यवेळी सांगीन.