मांजरा परिवारातील कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे
ऊसाचा भाव देवून शेतकर्यांची दिवाळी गोड करावी
अन्यथा कारखान्यासमोर पुन्हा आंदोलन आ. रमेशअप्पा कराड यांचा इशारा
लातूर दि.२८- मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी नूसार फरकाची रक्कम तात्काळ शेतकर्यांच्या खात्यात जमा करून दिवाळी गोड करावी अन्यथा परत आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे सांगून जोपर्यंत एफआरपी प्रमाणे गाळप ऊसाचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी कारखान्याच्या सर्व संबंधितांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
चालू वर्षाच्या गळीत हंगामाचे बॉयलर पेटले असून लवकरच प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात होणार आहे. मात्र गेल्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसाला किती भाव मिळणार याबाबतचा मांजरा परिवारातील मांजरा, विलास आणि रेणा यापैकी कोणत्याही कारखान्याने अद्यापपर्यंत जाहीर केलेले नाही. असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाचा दर काय निघतो याबाबत मा. साखर आयुक्त, पुणे यांनी दि.२१ ऑक्टोबर २०२१ रोजी सविस्तर माहिती दिली आहे.
साखर आयुक्तांनी दिलेल्या माहितीनूसार मांजरा परिवारातील मांजरा साखर कारखान्याची मूळ एफआरपी ३४२२/- रु. प्रतिटन ऊसाचा भाव निघतो वाहतूक ६४७/- रु. वगळता २७७५/- रु. शेतकर्यांना प्रतिटन भाव देणे आपेक्षित आहे. विलास साखर कारखान्याची मूळ एफआरपी ३३३१/- रु. प्रतिटन ऊसाचा भाव निघतो वाहतूक ६३२/- रु. वगळता २६९९/- रु. शेतकर्यांना प्रतिटन भाव देणे आपेक्षित आहे तर रेणा सहकारी साखर कारखान्याची मूळ एफआरपी ३४८२/- रु. प्रतिटन ऊसाचा भाव निघतो वाहतूक ६२६/- रु. वगळता २८५६/- रु. शेतकर्यांना प्रतिटन भाव देणे आपेक्षित आहे. या साखर कारखान्यांनी ऊस गाळपास आला तेंव्हा २२००/- रु. प्रतिटन शेतकर्यांना ऊसाचे बिल दिले आहे. त्यानंतर चालू महिन्यात १००/- रुपयाचा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा केला आहे. सरासरी तिन्ही कारखान्यांनी आजपर्यंत प्रतिटन २३००/- रु. शेतकर्यांना दिले आहेत.
असंख्य शेतकर्यांचे संसार ऊस पिकावर अवलंबून आहे. रात्रंदिवस काबाड कष्ट करून मुलाबाळाप्रमाणे सांभाळलेल्या ऊसाच्या पिकाला शासनाच्या नियमानूसार एफआरपी प्रमाणे भाव मिळाला पाहिजे असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, गाळप केलेल्या ऊसाची एफआरपी नूसार मांजरा साखर कारखान्याने ऊस बिलाची उर्वरीत रक्कम ४६६/- रुपये, विलास साखर कारखान्याने ऊस बिलाची उर्वरीत रक्कम ३९९/- रुपये आणि रेणा सहकारी साखर कारखान्याने ऊस बिलाची उर्वरीत रक्कम ५५६/- रुपये शेतकर्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करुन शेतकर्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
गाळप केलेल्या ऊसाला शासनाच्या नियमानूसार एफआरपी प्रमाणे १५ दिवसांत ऊसाचे बिल शेतकर्यांना मिळाले पाहिजे मात्र नविन गाळप हंगाम चार दिवसांवर आला असतानाही अद्यापपर्यंत शेतकर्यांचे ऊसाचे संपूर्ण बिल मिळाले नाही. आम्ही भिक मागत नाहीत तर कष्टाचा, हक्काचा मोबदला मागतोय. सदरील ऊसाचे बिल दिवाळीपर्यंत शेतकर्यांना नाही मिळाल्यास नाईलाजास्तव परत आंदोलनाचे हत्यार उपसून मांजरा परिवारातील कारखान्यासमोर तीव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल. जोपर्यंत एफआरपी प्रमाणे संपूर्ण ऊसाचे बिल शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी मांजरा, विलास आणि रेणा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालकांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
———————————————————————–